मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
बंध नाडया आणि चक्रे

बंध नाडया आणि चक्रे

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


प्राणायामाच्या पध्दती नीट कळण्यासाठी बंध, नाडया आणि चक्रे यांची काही माहिती असणे आवश्यक आहे. बंध म्हणजे बंधन, जोडणे, दावे लावणे किंवा पकडणे. ज्यामध्ये काही इंद्रिये किंवा शरीराचे भाग आकुंचित व नियंत्रित केले जातात, असे आसन हाही ‘बंध’ चा अर्थ आहे. नाडी म्हणजे शरीरामध्ये शक्तीचा संचार ज्यांमधून होत असतो असे नलिकारुप मार्ग. चक्रे म्हणजे चाके किंवा वर्तुळे. शरीराच्या यंत्रणेतील ही गतिचक्र (चक्की) असतात. जेव्हा बीज निर्माण होते, तेव्हा ती इष्ट स्थळापर्यंत पोचवण्यासाठी ट्राँन्सफाँर्मर्स, कंडक्टर्स, फ्यूजेस, स्विचेस आणि वेष्टित तारा यांची जरुरी असते. या साधनांखेरीज ती उत्पन्न केलेली वीज प्राणघातक ठरेल. त्याचप्रमाणे प्राणायाम केल्यामुळे योग्याच्या शरीरात जेव्हा प्राणाचा संचार होऊ लागतो, तेव्हा शक्तीची उधळमाधळ होऊ नये व इतरत्र कसले नुकसान न करता ती इष्ट भागांमध्ये पोचावी यासाठी बंधांची योजना करणे योग्याला आवश्यक होते. बंधांच्या अभावी, प्राण हा घातक ठरतो. प्राणायामासाठी उपयुक्त असलेले मुख्य तीन बंध आहेत :
(१) जालंधरबंध;
(२) उड्डियानबंध आणि
(३) मूलबंध.

योग्याने प्रथम जालंधरबंध आत्मसात करावा. जाल म्हणजे जाळे, नक्षीची जाळी कोळ्याचे जाळे. किंवा गवाक्ष. जालंधरामध्ये मान व गळा आकुंचित केली जातात आणि हनुवटी गळपट्टीच्या हाडांच्यामध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकवली जाते. सर्वांगासन (पाहा : पृ. १२९-१३४) आणि चक्र करताना बंध शिकता येतो. कारण त्या वेळीही हनुवटी उरोस्थीवर दाबली जाते. हृदय, मानेतील ग्रंथी आणि मेंदूसह डोके यांच्याकडे जाणारा रक्त आणि प्राण यांचा प्रवाह जालंधरबंधामुळे नियंत्रित केला जातो. जालंधरबंधाखेरीज जर प्राणायाम केला तर हृदय, डोळ्यांच्या कवडयांमागची बाजू कानांतील पोकळी यांवर दाब जाणवू लागतो आणि डोके गरगरु लागते. पूरक, कुंभक आणि रेचक या प्राणायामाच्या तीन प्रक्रियांसाठी जालंधरबंध अत्यावश्यक असतो. उड्डियान म्हणजे वर उडणे. छाती व पोट यांमधील पडदा छातीकडे वर उचलणे व पोटातील अवयव पाठीमागे कण्याच्या दिशेने खेचणे ही उड्डियानबंधाची प्रक्रिया असते. सुषुम्ना नाडी हा मज्जाशक्तीच्या वाहनाचा मुख्य मार्ग असून ही नाडी मेरुदंडांमधून म्हणजेच पाठीच्या कण्यामधून जाते. उड्डियानबंधाच्या साहाय्याने महान प्राणरुपी पक्ष्याला सुषुम्ना नाडीमधून वर उड्डाण करायला लावले जाते, असे, म्हणतात. उड्डियान हा सर्वोत्कृष्ट बंध असून गुरुने शिकवल्याप्रमाणे हा बंध जी व्यक्ती नित्य करीत असते तिला पुन्हा तारुण्य प्राप्त होते. असे सांगतात की मृत्यूरुपी हत्तीला ठार मारणारा बंध म्हणजे जणू सिंहच मानला जातो. रेचकानंतरचा बाह्य कुंभक करतानाच फक्त हा बंध करावा. छाती व पोट यामधील पडदा व पोटातील अवयव यांना या बंधामुळे व्यायाम घडतो. पडदा उचलल्यामुळे निर्माण झालेली पोकळी हृदयाच्या स्नायूना हळुवारपणे मालीश करते व त्यामुळे ते सुदृढ बनतात. आंतरकुंभकामध्ये, म्हणजे कुंभकानंतर रेचक करण्यापूर्वी श्वास आत कोंडून ठेवलेला असताना, उड्डियानबंध कधीही करु नये. केल्यास हृदय व पडदा यांवर ताण पडेल व डोळे बाहेर पडू लागतील. मूल म्हणजे पाळ, उगम, कारण किंवा पाया. मूलबंधाचे क्षेत्र म्हणजे गुदद्वार आणि वृषण यांमधला भाग. हा भाग आकुंचित केला म्हणजे नेहमी खालच्या दिशेकडे जाणारा अपान वायू वरच्या दिशेला वळतो व छातीच्या भागात वसणार्‍या प्राणवायूमध्ये मिसळून जातो. मूलबंध प्रथम आंतरकुंभक करताना शिकावा. बेंबी आणि गुदद्वार यांच्या मधला पोटाचा खालचा भाग कण्याच्या अंगाला आकुचित केला जातो व पडद्याच्या दिशेने वर खेचला जातो. उड्डियानबंधामध्ये गुदद्वारापासून पडद्यापर्यंतचा उरोस्थीपर्यंतचा सर्व भाग मागे कण्याकडे, तसेच वरच्या दिशेला खेचला जातो. पण मूलबंधामध्ये गुदद्वारापासून नाभीपर्यंतचा पोटाचा सर्व खालचा भाग आकुंचित केला जातो, मागे कण्याकडे खेचला जातो व पडद्याच्या दिशेने वर उचलला जातो. गुदसंकोचक स्नायू आकुंचित करण्याने, म्हणजेच अश्विनीमुद्रेच्या सरावामुळे मूलबंधावर प्रभुत्व मिळण्यास साहाय्य होते. अश्व म्हणजे घोडा. घोडयाच्या मूत्रविसर्जनाप्रमाणे ही क्रिया असल्यामुळे तिला अश्विनीमुद्रा हे नाव पडले आहे. वेगवेगळी आसने, विशेषत: ताडासन, शीर्षासन, सर्वांगासन, ऊर्ध्व धनुरासन, उष्ट्रासन आणि पश्चिमोत्तानासन ही आसने करताना अश्विनीमुद्रा शिकावी. या बंधाच्या अभ्यासामुळे शरीराचे सोळा आधार बंद होतात असे म्हटले जाते. आधार म्हणजे टेकू, महत्त्वाचा भाग. शरीराचे सोळा महत्त्वाचे अवयव म्हणजे - आंगठे, घोटे, गुडघे, मांडया, शिस्नाचे टोपण, जननेंद्रिये नाभी, हृदय, मान, कंठ, आटाळा, नाक, भिवयांचे केंद्र, कपाळ, मस्तक व ब्रह्मरंध्र (टाळूमधील या छिद्रामधून मृत्यूच्या वेळी आत्मा देहाचा त्याग करतो असे म्हणतात. उड्‍डियानबंध किंवा मूलबंध अनुभवी गुरुच्या किंवा शिक्षकाच्या वैयक्तिक देखरेखीखेरीज केवळ स्वत:वर विसंबून शिकण्याचा प्रयत्न करणे अतिशय धोक्याचे असते. उड्डियानबंध चुकीच्या पध्दतीने केल्यास इच्छेविरुध्द वीर्यपात होईल व चैतन्यहीनता येईल. चुकीच्या पध्दतीने केल्यास इच्छेविरुध्द वीर्यपात होईल व चैतन्यहीनता येईल. चुकीच्या मूलबंधामुळेही अभ्यासकाला अशक्तता येईल व पौरुषाची हानी होईल. मूलबंध अचूक रीतीने करण्यानेही काही धोके संभवतात. पौरुषाची हानी होईल. मूलबंध अचूक रीतीने करण्यानेही काही धोके संभवतात. त्याच्यामुळे लैंगिक स्तंभनशक्ती वाढते व त्यामुळे या शक्तीचा गैरवापर करण्याचा मोह अभ्यासकाला होऊ लागतो. जर तो या मोहाला बळी पडला तर त्याचा सर्व नाश ठरलेलाच. त्याच्या अंगच्या सर्व सुप्त वासना जाग्या होतात आणि काठीचा प्रहार केलेल्या सुप्त सर्पाप्रमाणे खवळून प्राणघातक बनतात. वरील तीन बंधांवर प्रभुत्व मिळाले की योगी आपल्या भवितव्यतेच्या तिवाठयाशी येऊन ठेपतो. एक मार्ग भोगाकडे नेतो, तर दुसरा योगाकडे. ऐहिक सुख-भोगांचे आकर्षण जबरदस्त असते. मात्र योग्याला त्यांच्या कर्त्याविषयी अधिक आकर्षण असते. इंद्रिये बहिर्मुख असतात व त्यामुळे विषयांकडे आकर्षित होतात आणि भोगाकडे वळतात. इंद्रियांची दिशा बदलून त्यांना अंतर्मुख केले तर ती योगमार्गाने जाऊ लागतात. सर्व सृष्टीचा उगम जो परमेश्वर, त्याच्या भेटीसाठी योग्याची इंद्रिये वळण घेतात. अभ्यासकाला या तीन बंधांवर प्रभुत्व मिळाले की त्या वेळीच गुरुची खरी आवश्यकता असते. कारण, योग्य मार्गदर्शन लाभले, तर या परिवर्धित सामर्थ्याचा उपयोग उच्चतर व उदात्त कार्यासाठी होऊ लागतो व त्याचे उदात्तीकरण होते. यामुळे अभ्यासक ‘ऊर्ध्वरेतस’ बनतो किंवा ब्रह्मचारी होतो. आपल्या पौरुषाची तो उधळमाधळ करीत नाही. मग त्याला नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य लाभते. त्याच्या अंगचे हे बल सूर्याप्रमाणे बाहेर प्रकाशू लागते. मूलबंध करताना सर्व सृष्टीच्या खर्‍या मुळाकडे किंवा उगमाकडे जाण्याचा योग्याचा प्रयत्न असतो. मन, बुध्दी आणि अहंकार मिळून होणार्‍या चित्ताचे पूर्ण नियमन करणे हे त्याचे ध्येय असते. मानवी देह हे संपूर्ण विश्वाचेच छोटे प्रतिरुप असते. ‘हठ’ या शब्दातल्या ‘ह’ आणि ‘उ’ ही अक्षरे अनुक्रमे सूर्य आणि चंद्र या अर्थाची आहेत. अनुक्रमे उजव्या आणि डाव्या नाकपुडीपासून निघून कण्याच्या खालच्या टोकापर्यंत जाणार्‍या पिंगला आणि इडा या मुख्य नाडयांमधून अनुक्रमे सूर्यशक्ती व चंद्रशक्ती वाहते असे म्हणतात. पिंगला ही सूर्यनाडी असून इडा ही चंद्रनाडी असते. या दोघींच्या मधून सुषुम्ना ही अग्निनाडी जाते. आधी सांगितल्याप्रमाणे सुषुम्ना ही मज्जाशक्तीची प्रमुख वाहिका असून ती मेरुदंडामधून म्हणजेच पाठीच्या कण्यामधून जाते. पिंगला व इडा या परस्परांना व सुषुम्नेलाही अनेक ठिकाणी छेदून जातात. या सांध्यांच्या जागांना चक्रे म्हणतात. ही चक्रे इंजिनातील गतिनियांमक चक्रांप्रमाणे शरीर व्यापारांचे नियमन करतात.
मुख्य चक्रे पुढीलप्रमाणे आहेत :
मूलाधार चक्र गुदद्वाराच्या वर ओटीपोटाच्या भागात असते (मूल = पाळ, कारण, उगम; आधार = टेकू किंवा महत्त्वाचा भाग);
स्वाधिष्ठान चक्र जननेंद्रियाच्या वर असते. (स्व = आत्मा; अधिष्ठान = आसन किंवा स्थान);
मणिपूरक चक्र नाभीमध्ये वसलेले असते. (मणिपूर = नाभी); मनस् आणि सूर्य ही चक्रे नाभी व हृदय यांच्यामध्ये असतात; अनाहत चक्र हृदयाच्या भागात असते. (अनाहत = हृदय);
विशुध्द चक्र कंठात असते; आज्ञा चक्र भुवयांच्या मध्ये असते;
सहस्त्रार चक्राला सहस्त्रदल कमळ म्हणतात. हे मेंदूच्या पोकळीत असते व ललात चक्र हे कपाळाच्या वरच्या बाजूला असते. शरीरयंत्रणेला हार्मोन्स व इतर आंतरिक स्त्राव पुरवणार्‍या अंत:स्त्रावी ग्रंथी म्हणजे कदाचित ही चक्रे असतील. मूलाधार व स्वाधिष्ठान चक्र म्हणजेच कदाचित जननग्रंथी असतील (पुरुषांमध्ये वृषण, शिस्न व प्रोटेस्ट आणि स्त्रियांमध्ये अंडाशय, गर्भाशय व योनी); : या दोन चक्रांमध्ये कामदेवाचे स्थान - कामरुप हे जननेंद्रियांचे आसन असते. जठर, प्लीहा, यकृत व स्वादुपिंड हे पोटातले अवयव बहुधा मणिपूरक चक्राशी जुळते असावेत. सूर्य व मनस् या चक्रांनी दोन मूत्रस्थ (अँड्रीनल) ग्रंथी सूचित होतात. अनाहत चक्र म्हणजे हृदय व त्याच्या भोवतीच्या प्रमुख रक्तवाहिन्या. विशुध्द चक्र म्हणजे कंठस्थ, उप-कंठस्थ व बाल्य (थायमस) या ग्रंथी असाव्यात. आज्ञा, सहस्त्रार व ललाट ही चक्रे म्हणजे मेंदूचे द्रव्य आणि मस्तक व मज्जा या ग्रंथी असणे शक्य आहे. आपल्या शरीरामधील दिव्य विश्वशक्ती म्हणजे कुंडलिनी. ती जागृत करणे हे प्राणायामाचे उद्दिष्ट असल्याचे तांत्रिक ग्रंथांचे म्हणणे आहे. पाठीच्या कण्याच्या तळाशी असलेल्या सर्वात खालच्या मूलाधार चक्रामध्ये वेटोळे करुन झोपलेली नागीण हे कुंडलिनीचे प्रतीक. या सुप्त शक्तीला जागृत करावे लागते व तिला पाठीच्या कण्यातून सर्व चक्रांचा भेद करीत सहस्त्रार चक्रापर्यंत जायला लावून परमात्म्याशी तिचा संयोग घडवून आणावा लागतो. वर वर्णन केलेल्या उड्डियान व मूलबंधांच्या अभ्यासामुळे उपलब्ध होणारी प्रचंड शक्ती - विशेषत: लैंगिक शक्ती अशा प्रकारे प्रतीक रुपाने वर्णिलेली असावी. कुंडलिनी जागृत करुन तिला वर जाण्यास भाग पाडणे हे कदाचित लैंगिक शक्तीच्या उन्नयनाचे प्रतीक असावे.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP