मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पश्चिमोत्तानासन *

पश्चिमोत्तानासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १६१)
(यालाच उग्रासन किंवा ब्रह्मचर्यासन असे म्हणतात.)
पश्चिम या शब्दावरुन डोक्यापासून टाचेपर्यत संपूर्ण शरीराची मागची बाजू सूचित होते. चेहर्‍यापासून पायाच्या आंगठयापर्यंतची शरीराची पुढची बाजू म्हणजे शरीराचे पूर्व अंग. डोक्याची टाळू ही शरीराची उत्तर बाजू आणि पायाचे चवडे आणि टाचा ही शरीराची खालची किंवा दक्षिण बाजू. या आसनामध्ये सबंध शरीराची मागची किंवा पश्चिम बाजू अतिशय तीव्रतेने ताणली जाते. त्यामुळे आसनाला हे नाव दिले गेले आहे. उग्र म्हणजे भयंकर किंवा शक्तिमान, भव्य किंवा उदात्त, ब्रह्मचर्य म्हणजे अध्ययन, संयम आणि अविवाहिता.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरून जमिनीवर बसा. तळहात उजव्या व डाव्या कंबरेच्या शेजारी जमिनीवर टेका. काही वेळ दीर्घ श्वास घ्या. (चित्र क्र.७७)
२. श्वास सोडा. हात लांबवाअ आणि पायांची बोटे पकडा. उजव्या हाताचा आंगठा आणि पहिली दोन बोटे यांनी उजव्या पायाचा आंगठा धरा. तसाच डाव्या हाताचा आंगठा व पहिली दोन बोटे यांनी उजव्या पायाचा आंगठा पकडा. (चित्र क्र. १५३)
३. पाठीचा कणा ताणा आणि पाठ अंतर्गोलाकार ठेवण्याचा प्रयत्न करा. सुरवातीला पाठ कुबड आल्यासारखी दिसेल, कारण पाठीचा कणा, फक्त खांद्यांच्या भागापासूनच ताणला जाईल; परंतु पाठीच्या ओटीपोटामागच्या भागापासून कणा ताणण्याचा सराव करा. आणि हातही खांद्यापासून पुढे लांबवा. त्यामुळे कुबडाचा आकार नाहीसा होईल आणि चित्र क्र. १५३ मध्ये दाखविल्याप्रमाणे पाठ सपाट होईल. काही दीर्घ श्वास घ्या.
४. श्वास सोडा. कोपरे वाकवून एकमेकांपासून दूर न्या. त्यांचा तरफेसारखा उपयोग करा. धड पुढे खेचा आणि कपाळ गुडघ्यांवर टेका. (चित्र क्र. १५४) हळूहळू कोपरे जमिनीवर टेका. मान आणि धड पुढे खेचा आणि प्रथम नाकाने व नंतर ओठांनी गुडघ्यांना स्पर्श करा. (चित्र क्र. १५५)
५. हे जमू लागले म्हणजे पायांचे चवडे पकडण्याचा प्रयत्न करु लागा आणि हनुवटी गुडघ्यांवर टेका. (चित्र क्र. १५६)
६. हेही सहजपणाने जमू लागले म्हणजे बोटे एकमेकांमध्ये गुंफून हात पकडा आणि गुडघ्यांपलीकडे नडग्यांवर हनुवटी टेकवा. (चित्र क्र. १५७)
७. स्थिती क्र. ६ ही सहजपणाने येऊ लागली म्हणजे लांबवलेल्या पावलांच्या पलीकडे उजव्या पंजाने डावा हात किंवा डाव्या पंजाने उजवा हात पकडा. पाठ अंतर्गोलाकृती ठेवा. (चित्र क्र. १५८) काही वेळ दीर्घ श्वास घ्या.
८. श्वास सोडा आणि गुडघ्यांपलीकडे नडग्यांवर हनुवटी टेका. (चित्र क्र. १५९)
९. क्र. ८ ची स्थिती सुलभतेने करता येऊ लागली म्हणजे डाव्या हाताने उजवे मनगट किंवा उजव्या हाताने डावे मनगट पकडा व गुडघ्यांच्या पलीकडे नडग्यांवर हनुवटी टेकवा. (चित्र क्र. १६०)
१०. गुडघ्यांची मागची बाजू जमिनीवर घट्ट टेकलेली राहावी याबद्दल काळजी घ्या. प्रारंभीच्या काळात गुडघे जमिनीवरुन वर उचलले जातील, परंतु मांडयांच्या मागच्या बाजूकडील स्नायू घट्ट आवळा आणि पुढे न्या. त्यामुळे गुडघ्यांमागील शिरा जमिनीवर टेकू लागतील.
११. वर सांगितलेल्यापैकी तुम्हाला जमणार्‍या कोणत्याही स्थितीत समतोल श्वसन करीत १ ते ५ मिनिटे राहा.
१२. प्रगत अभ्यासकांनी हात सरळ करुन तळहात जमिनीवर टेकवले, लांबवलेल्या पायांच्या पलीकडे आंगठे एकमेकांशी जुळवले आणि गुडघ्यांपलीकडे नडग्यांवर हनुवटी टेकली तर हरकत नाही (चित्र क्र. १६१), समतोल श्वसन करीत या स्थितीत एक ते दोन मिनिटे राहा.
१३. श्वास घ्या. डोके गुडघ्यांवरुन वर उचला आणि विसावा घ्या.
१४. पश्चिमोत्तानासन (चित्र क्र. १६२) जर निर्दोष तर्‍हेने केले तर पाठीवर कसलेही वजन अभ्यासकाला जाणवत नाही.

परिणाम
या आसनामुळे पोटातील अवयव सुधारतात आणि त्यांमध्ये मंदपणा येत नाही. या आसनामुळे मूत्रपिंड सुदृढ बनतात. पाठीच्या संपूर्ण कण्याला नवे चैतन्य लाभते आणि पचनक्रिया सुधारते. इतर प्राण्यांच्या पाठीचे कणे हे जमिनीशी समांतर असतात आणि त्यांची हृदये त्यांच्या पाठीच्या कण्याच्या खाली असतात. त्यामुळे ते प्राणी निकोप राहातात. व त्यांच्या जवळ फार मोठया प्रमाणात सहनशक्ती  असते. मनुष्यप्राण्यांमध्ये पाठीचा कणा उभा असतो आणि हृदय पाठीच्या कण्याखाली नसते. त्यामुळे श्रमांचा परिणाम मनुष्यांना फार लवकर जाणवू लागतो आणि हृदयविकार हा त्यांच्या बाबतीत अधिक संभाव्य असतो. पश्चिमोत्तानासनामध्ये पाठीचा कणा ताठ आणि जमिनीशी समांतर ठेवला जातो. आणि हृदय पाठीच्या कण्याच्या खालच्या पातळीवर असते. या आसनात बराच वेळ राहिल्यामुळे हृदय, पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू यांना मालीश केले जाते. त्यामुळे त्यांच्यात ताजेतवानेपणा येतो आणि मनाला विश्रांती लाभते. ओटीपोटाच्या भागाला जादा ताण दिला गेल्यामुळे त्या भागात आँक्सिजनयुक्त रक्त अधिक प्रमाणात खेचले जाते आणि त्या रक्तापासून जननग्रंथी आवश्यक ती पौषकद्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे जीवनशक्ती वाढते. नपुंसकत्व नाहीसे होते आणि जननेंद्रियावर ताबा येतो. यामुळेच या आसनाला ब्रह्मचर्यासन असे म्हणतात. ज्याने आपल्या लैंगिक वासनांवर ताबा मिळवला आहे अशा व्यक्तीला ब्रह्मचारी असे म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP