मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
योगनिद्रासन *

योगनिद्रासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. ३९१)
निद्रा म्हणजे झोप. योगनिद्रा म्हणजे झोप आणि जागेपण यांच्यामधली एक स्थिती. युगाच्या समाप्तीच्या वेळी विष्णू जी निद्रा घेतो तिलाही योगनिद्रा असे म्हणतात. या आसनात मानेच्या मागच्या बाजूला दोन्ही पावले एकमेकात अडकविली जातात आणि हात जमिनीवर टेकलेल्या पाठीच्या मागे गुंफलेले असतात. पावले ही योग्याची उशी आणि पाठ हे योग्याचे अंथरुण असते. हे आसन केल्यामुळे सबंध शरीरामध्ये अतिशय वेगाने उष्णता पसरते. त्यामुळे खूप उंचावरच्या ठिकाणी वस्ती करणारे योगी शरीर उबदार राहाण्यासाठी हे आसन करतात.

पध्दती
१. जमिनीवर उताणे निजा. (चित्र क्र. २१९)
२. दोन्ही गुडघे वाकवा आणि पाय डोक्यावर आणा.
३. श्वास सोडा. उजवे पाऊल दोन्ही हातांनी पकडा आणि उजवा पाय उजव्या खांद्याच्या पाठीमागून आणून मानेच्या मागच्या बाजूवर एकपाद शीर्षासनातल्याप्रमाणे (चित्र क्र. ३८९) ठेवा.
४. अनेकदा श्वसन करीत उजव्या पायाची ही स्थिती टिकवून धरा.
५. श्वास सोडा आणि डाव्या तळहाताच्या मदतीने डावा पाय डाव्या खांद्याच्या मागून नेऊन उजव्या पायाखाली ठेवा. (चित्र क्र. ३९०) घोटयांपाशी दोन्ही पावले एकमेकांमध्ये अडकवा.
६. दोन्ही खांदे चांगले वर उचलून धरा. हात पाठीच्या मागे न्या. हाताची बोटे एकमेकामध्ये गुंफा. (चित्र क्र. ३९१) आता दंडांची मागची बाजू मांडय़ांच्या मागच्या बाजूला स्पर्श करील. काही वेळ श्वास घ्या.
७. श्वास सोडा. छाती चांगली वर उचला आणि मान मागच्या बाजूला ताणा. ही या आसनाची अखेरची स्थिती. (ही सुप्त कूर्मासनाच्या [चित्र क्र. ३६८] बरोबर उलट स्थिती आहे.). नेहमीप्रमाणे श्वसन करण्याचा प्रयत्न करीत या स्थितीत ३० ते ६० सेकंद राहा.
८. श्वास सोडा आणि पाठीमागे गुंफलेली हातांची बोटे मोकळी करा, त्याचप्रमाणे मानेच्या मागची पावलांची घडी मोडा.
९. पाय सरळ समोर पसरुन थोडा वेळ जमिनीवर विसावा घ्या.
१०. यानंतर मानेच्या पाठीमागे प्रथम डावा पाय व त्याच्याखाली उजवा पाय ठेवून हे आसन आधीइतकाच वेळ पुन्हा करा.
११. हात आणि पाय पकडीतून मोकळे करा आणि जमिनीवर विसावा घ्या.
१२. दोन्ही पायांची आधी मांडी घालून ती मानेमागे नेऊ नका कारण त्यामुळे या आसनाचा योग्य अनुभव अचूकपणे मिळणार नाही. स्मरणपूर्वक प्रथम एक पाय मानेच्या पाठीमागे आणि नंतर दुसरा पाय पहिल्या पायाच्या खाली आणा. दोन्ही पाय मानेच्या पाठीमागे ठेवण्यापूर्वी मान आणि पाठीच्या कण्याचा छातीमागचा भाग वर उचला. त्याचप्रमाणे खांदेही ताणून धरा. नाहीतर छाती आणि पाय यांच्या मध्ये खांदे चिणले जातील. ही काळजी घेतल्यास हे आसन खात्रीपूर्वक निर्दोषपणे होईल.

परिणाम
या आसनात पाठीच्या कण्याला पुढच्या दिशेने पूर्ण ताण दिला जातो आणि पाठीमध्ये आल्हादकारक संवेदना निर्माण होते. पुढच्या बाजूला वाकून करावयाच्या उत्कृष्ट आसनांपैकी हे एक आहे. योगनिद्रासन अचूक आणि निर्दोष रीतीने केल्यामुळे व्यायाम, सुखसमाधान आणि विसावा यांचा जितका अनुभव मिळतो तितका पश्चिमोत्तानांसनातल्या (चित्र क्र. १६०), शरीराला मिळणार्‍या जास्तीत जास्त ताणामुळेही लाभत नाही. पाठ वाकवून करावयाच्या आसनांमध्ये फुफ्फुसे आणि पोटाचे स्नायू जास्तीत जास्त विस्तारले जातात. उलट या आसनामध्ये फुफ्फुसे आणि पोटाचे स्नायू जास्तीत जास्त आकुंचन पावतात. या आसनाच्या अभ्यासामुळे अल्पकाळात मूत्रपिंड, यकृत, प्लीहा, आतडी, स्वादुपिंड, प्रोस्टेट ग्रंथी आणि मूत्राशय सुदृढ बनतात. हे आसन सातत्याने चालू ठेवले तर पोटातील अवयव रोगमुक्त राहातात. या आसनामुळे जननग्रंथींना व्यायाम मिळतो आणि शरीरसंस्थेमध्ये चैतन्य आणि जिवंतपणा पसरु लागतो. शिरांना विसावा मिळतो आणि अधिक चांगले चिंतन व अधिक चांगले काम होण्याच्या दृष्टीने शक्तीचा संचय शरीरामध्ये होऊ लागतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP