मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
राजकपोतासन **

राजकपोतासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.५५१)
राजकपोत म्हणजे कबुतरांचा राजा. हे आसन अत्यंत आकर्षक पण कठीण आहे. डौलाने चालणार्‍य़ा कबुतराच्या सारखी या आसनात छाती फुगवली जाते, त्यामुळे हे नाव पडले आहे.

पध्दती
१. जमिनीवर सरळ पालथे निजा. कोपरे वाकवा आणि कमरेच्या दोन बाजूस दोन तळहात जमिनीवर टेका.
२. श्वास सोडा, जघन भाग आणि पाय न हालवता हात पूर्णपणे लांबवून डोके व धड वर उचला. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत काही सेकंद राहा.
३. श्वास सोडा, गुडघे वाकवा आणि पावले वर उचला. ओटीपोटाचा भाग आणि मांडया यांवर शरीराचा भार पडलेला जाणवेल. काही वेळा श्वसन करा.
४. उजव्या पंजावर भार घेऊन, जोराने एकदम श्वास सोडून डावा हात खांद्यापासून मागे झोकून द्या आणि डाव्या गुडघ्याची वाटी पकडा. (चित्र क्र.५४८) काही वेळा श्वास घ्या. पुन्हा एकदा जोराने व एकदम श्वास सोडीत उजवा हात खांद्यापासून मागे झोकून द्या व उजव्या हाताने उजव्या गुडघ्याची वाटी पकडा. (चित्र क्र.५४९)
५. छाती फुगवा आणि गुडघ्यांवरील पकड तरफेसारखी वापरुन कणा व मान आणखी मागे इतकी ताणा की डोके, टाचा व चवडे यांवर टेकावे. पावले जुळवून ठेवा आणि गुडघे शक्य तितके एकमेकांजवळ आणण्याचा प्रयत्न करा. (चित्र क्र.५५१)
६. सुमारे १५ सेकंदांच्या आसपास शक्य तितका अधिक वेळ घ्या स्थितीत राहा. कणा व छाती पूर्ण ताणलेली असतात आणि पोट जमिनीवर दाबलेले असते त्यामुळे श्वसन अतिशय जलद व कठिण होईल आणि सुमारे १५ सेकंद या स्थितीत राहानेसुध्दा युगाइतके दीर्घकाळाचे वाटेल. लघुवज्रासनाशी (चित्र क्र.५१३) या स्थितीचे साम्य बरेच आहे. फरक इतकाच की शरीराचा भार गुडघ्यांपासून बोटांपर्यंतच्या पायावर असण्याऐवजी ओटीपोटाचा भाग आणि मांडया यांवर असतो.
७. पाय पुन्हा सरळ पसरा. गुडघ्यावरील पकड सोडा आणि तळहात एकामागून एक जमिनीवर आणा. दोन्ही हात एकदम सोडले तर कण्यावरील ताणामुळे आपण तोंडावर पडू व दुखापत होईल. पुढच्या बाजूस एकेक तळहात टेकल्यावर छाती जमिनीवर टेकून विसावा घ्या.
८. हे कठिण वाटले तर तळहात जमिनीवर ठेवून टाळू पावलांवर टेका. (चित्र क्र.५५२)

परिणाम
कपोतासनामध्ये (चित्र क्र.५१२) कण्याच्या कमरेजवळच्या भागाला ताण जाणवतो. उलट राजकपोतासनामध्ये कण्याच्या कमरेजवळच्या व छातीमागच्या या दोन्ही भागांना फायदा मिळतो. मान व खांद्याचे स्नायू यांना पूर्ण ताण बसून व्यायाम घडतो. शरीराचा भार जननेंद्रियांवरच्या भागावर पडल्यामुळे तेथे रक्ताभिसरण वाढून तो भाग निकोप राहातो. पोटातील अवयव जमिनीवर दाबले जातात व त्यांना मालीश केले जाते. कंठस्थ, उपकंठस्थ, मूत्रस्थ व जनन या ग्रंथींना रक्ताचा भरपूर व संपन्न पुरवठा होतो व त्यांच्यामध्ये चैतन्य वाढते. मूत्रोत्सर्गयंत्रणेतील दोषांवर हे आसन उपयुक्त आहे. कामवासनेच्या दमनासाठी कंदासन (चित्र क्र.४७१) आणि सुप्त त्रिविक्रमासन (चित्र क्र.४७८) यांच्या बरोबर राजकपोतासन हेही लाभदायक ठरते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP