मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन *

पार्श्वपिंडासनयुक्त सर्वांगासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २७० आणि २७१)
पार्श्व म्हणजे कूस किंवा बाजू. आधी सांगितलेल्या पिंडासनाचा हा एक वेगळा प्रकार आहे. या आसनात वाकविलेले दोन्ही गुडघे एका बाजूस नेले जातात आणि धडाच्या एकाच बाजूला टेकविले जातात. पिंडासनयुक्त-सर्वांगासनाचा हा एका बाजूला मुरड देऊन करण्याचा प्रकार आहे.

पध्दती
१. पिंडासनातील (चित्र क्र. २६९) हाताचा वेढा सोडल्यानंतर हात मागे आणा. आणि बरगडयांच्या मागच्या बाजूला तळहात ठेवा. (चित्र क्र. २६८).
२. कंबर उजव्या बाजूला वळवा. श्वास सोडा. दोन्ही गुडघे खाली जमिनीवर आणा. डावा गुडघा उजव्या कानाच्या बाजूला असला पाहिजे. (चित्र क्र. २७०).
३. डावा खांदा सुरवातीला जमिनीवरुन वर उचलला जाईल. खांदा जमिनीवर जोराने दाबा आणि डावा हात पाठीवर जोराने रेटा. असे केले नाही तर तोल जाईल आणि आपण एका बाजूला घरंगळू.
४. अशा तर्‍हेने एका कुशीला मुरड दिल्यामुळे छाती व पोट यामधील पडदा दाबला जातो. त्यामुळे श्वसन जलद होऊ लागते. व ते करणे कठीण होते.
५. कानाजवळ असलेला गुडघा सुरवातीला जमिनीवर टेकणार नाही. दीर्घकाळ सराव केल्यावर तो टेकू लागेल.
६. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत २० ते ३० सेकंद राहा.
७. श्वास सोडा. उजवीकडून वर या. आणि डावे पाऊल डाव्या कानाजवळ येईल अशा पध्दतीने मांडी उजवीकडे न्या. (चित्र क्र. २७१) या स्थितीत आधीच्या इतकाच वेळ राहा.
८. पुन्हा ऊर्ध्वपद्मासनामध्ये (चित्र क्र. २६१) या. मांडी मोडून पद्मासनातून पाय मोकळे करा आणि पुन्हा सालंब सर्वांगासनात या.
९. आता मांडी बदला. आधी डावे पाऊल उजव्या मांडीवर, नंतर उजवे पाऊल डाव्या मांडीवर, अशा तर्‍हेने मांडी घाला.
१०. आधी वर्णन केल्याप्रमाणे सर्व कृती दोन्ही बाजूंनी पुन्हा करा.

सर्वांगासनाच्या ऊर्ध्वपद्मासनयुक्त आणि पार्श्वपिंडासनयुक्त प्रकारांचे परिणाम -
पायांचा क्रम बदलून मांडी घातल्यामुळे पोट आणि मोठे आतडे यांच्या दोन्ही बाजूंवर सारखा दाब दिला जातो. त्यामुळे बध्दकोष्ठ नाहीसे होते. ज्यांना बध्दकोष्ठाचा जुना विकार असेल त्यांनी पार्श्वपिंडासनामध्ये अधिक काळ राहिल्यास त्यांना लाभ होईल. प्रत्येक बाजूला एक-एक मिनिट राहिल्यास उत्कृष्ट परिणाम दिसू लागेल. पोटातील मुरडा या आसनामुळे नाहीसा होतो. ज्यांचे गुडघे अतिशय लवचिक असतात त्यांना ही आसने सहजपणाने करता येतात, परंतु पद्मासनात पायांची मांडी घालणे अनेकांना कठीण जाते. पार्श्वहलासन (चित्र क्र. २४९) या आसनात ते अधिक काळ राहिले तर मांडी घालणे अधिक सोपे जाऊ लागेल. (त्या आसनातही पाठीचा कणा आणि धड यांना एका कुशीला मुरड दिली जाते, परंतु पाय मात्र सरळ राहातात.) या सर्व आसनांमध्ये सुरवातीला श्वसन जलद आणि कठीण होईल. परंतु श्वसन नेहमीसारखे ठेवण्याचा प्रयत्न करावा.

टीप
सर्वांगासनाच्या या प्रकारांमध्ये पाठीचा कणा पुढल्या दिशेला, दोन्ही बाजूंना आणि मागच्या दिशेला खेचला जातो. हलासन, एकपाद सर्वांगासन, कर्णपीडासन आणि पिंडासन या प्रकारांमध्ये पाठीचा कणा पुढल्या दिशेने खेचला जातो. पार्श्वकपाद सर्वांगासन, पार्श्व हलासन आणि पार्श्व पिंडासन या प्रकारांमध्ये, पार्श्व सर्वांगासन आणि पार्श्व ऊर्ध्वपद्मासन यांच्यातल्याप्रमाणेच पाठीच्या कण्याला डावीकडे व उजवीकडे मुरड दिली जाते. सेतुबंध आणि उत्तानपद्‍मयूर या आसनांमध्ये पाठीच्या कण्याला मागच्या दिशेने ओढले जाते. या हालचालींमुळे पाठीच्या कण्याचे सर्व भाग सुधारतात आणि निकोप राहातात. असे सांगतात की कृतयुगामध्ये वृत्रासुराच्या नेतृत्वाखाली दानवांचा संघ युध्दामध्ये अजिंक्य ठरला. आणि त्यांनी देवांना दशदिशांना पळवून लावले. वृत्राचा नाश झाल्याखेरीज आपली सत्ता आपल्याला परत मिळणार नाही हे ध्यानात आल्यावर देव आपला पितामह जो ब्रह्मदेव त्याच्याकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना विष्णुकडे जाण्यास सांगितले. राक्षसांच्या नाशासाठी शस्त्र बनवण्याकरता दधीची ऋषींची हाडे मिळवा, असे विष्णूने त्यांना सांगितले. देव त्या ऋषीकडे आले आणि विष्णूच्या संदेशाप्रमाणे त्यांनी ऋषींना विनंती केली. देवांच्या लाभासाठी ऋषींनी आपल्या शरीराचा त्याग केला. दधीची ऋषींच्या पाठीच्या कण्यापासून वज्र नावाचे शस्त्र तयार झाले. आणि देवांचा राजा इंद्र याने हे वज्र फेकून वृत्रासुराचा वध केला. ही कथा प्रतिकात्मक आहे. दानव म्हणजे मनुष्यामधील तमोगुण आणि रोग. देव म्हणजे आरोग्य, सुसंवाद आणि शांती. तमोगुणाचा आणि त्याच्यामुळे निर्माण होणार्‍या रोगांचा नाश करण्यासाठी आणि आरोग्य व समाधान ही मिळविण्यासाठी आपण आपल्या पाठीचा कणा दधिचीच्या पाठीच्या कण्यासारखा, वज्रासारखा कठीण बनवला पाहिजे. मग आपल्याला आरोग्य, सुसंवाद आणि समाधान यांचा भरपूर प्रमाणात लाभ होईल.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP