मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
वीरभद्रासन १ *

वीरभद्रासन १ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १४)
१. दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ केला; पण आपली मुलगी सती आणि तिचा पती महादेव यांना आमंत्रण केले नाही. तरीही सती यज्ञाला उपस्थित राहिली. परंतु तेथे तिचा अपमान करण्यात आला, त्यामुळे तिने अग्नीत उडी घेऊन प्राण दिला. शंकराच्या कानी ही गोष्टी गेली तेव्हा तो अत्यंत प्रक्षुब्ध झाला, आणि आपल्या जटेतून एक केस उपटून तो त्याने जमिनीवर आपटला. त्यातून वीरभद्र नावाचा एक सामर्थ्यवान योध्दा उत्पन्न झाला आणि शंकराच्या आज्ञेची प्रतीक्षा करीत उभा राहिला. दक्षावर चालून जाणार्‍या आपल्या सैन्याचे आधिपत्य स्वीकार आणि यज्ञाचा विध्वंस कर, अशी आज्ञा त्याला मिळाली. दक्षाकडे जमलेल्या लोकांमध्ये वीरभद्र सैन्यासह वादळासारखा घुसला. त्याने यज्ञाचा विध्वंस केला. इतर देवांना आणि ऋत्विजांना त्याने पळवून लावले आणि दक्षाचा शिरच्छेद केला. सतीच्या विरहामुळे दु:खी झालेल्या शिवाने कैलासगमन केले आणि तपश्चर्या सुरु केली. हिमालयाच्या घरी सती ही उमा म्हणून जन्मली. तिने शंकराची पुन्हा एकदा आराधना केली आणि त्याला प्रसन्न करुन घेतले. ‘कुमारसंभव’ या महाकाव्यात कालिदासाने ही कथा सांगितली आहे. आपल्या जटेतील केसातून शंकराने निर्माण केलेल्या सामर्थ्यवान वीराचे नाव या आसनाला दिले आहे.

पध्दती
१. ताडासनात उभे राहा. (चित्र क्र. १)
२. दोन्ही हात डोक्याच्यावर उंच करा, ताणा आणि तळहात एकत्र जुळवा. (चित्र क्र. १२).
३. दीर्घ श्वास घ्या आणि उडी मारुन पावलामध्ये चार ते साडेचार फूट अंतर राहील, अशा बेताने उभे राहा.
४. श्वास बाहेर सोडा आणि उजवीकडे वळा. एकाच वेळी पाऊल ९० अंशांनी व डावे पाऊल जरासे उजवीकडे वळवा. (चित्र क्र.१३) उजवी मांडी जमिनीशी समांतर होईल आणि पायाची नडगी जमिनीशी काटकोनात राहील अशा बेताने उजवा गुडघा वाकवा. त्यामुळे उजवी मांडी आणि उजवी पोटरी या एकमेकींशी काटकोन करतील. वाकवलेला गुडघा घोटयापेक्षा पुढे जाता कामा नये. तो टाचेच्या रेषेत असावयास हवा.
५. डावा पाय ताठ कराअ आणि गुडघ्यापाशी घट्ट आवलून धरा.
६. चेहरा, छाती आणि उजवा गुडघा हे चित्रात दाखविल्याप्रमाणे उजव्या पावलाच्या दिशेला असावयास हवेत. डोके वर करा. पाठीचा कणा त्रिकास्थीपासून ताणून धरा आणि जुळलेल्या तळहातांवर दृष्टी खिळवा. (चित्र क्र. १४)
७. या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करीत २० सेकंद ते अर्धे मिनिट राहा.
८. ४ ते ६ या स्थिती उलटया म्हणजे डाव्या बाजूने पुन्हा करा.
९. श्वास सोडा आणि उडी मारुन ताडासनात या. (चित्र क्र. १)
*** उभे राहाण्याची सर्व आसने श्रमाची असतात. हे आसन तरे विशेषच मेहनतीचे आहे. ज्यांचे हृदय अशक्त असेल त्यांनी हे आसन करण्याचा प्रयत्न करु नये. सशक्त व्यक्तींनी सुध्दा या आसनात जास्त वेळ राहू नये.

परिणाम
या आसनामध्ये छाती पूर्ण फुगवली जाते आणि त्यामुळे दीर्घ श्वसनाला मदत होते. खांदे आणि पाठ यांचा ताठरपणा नाहीसा होतो. घोटे आणि गुडघे सुदृढ बनतात. ताठरलेली मान सैल होते आणि कंबर व नितंबाजवळचा मेद कमी होतो.

N/A

References : N/A
Last Updated : September 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP