मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|

सुप्त त्रिविक्रमासन **

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र.४७८)
सुप्त म्हणजे निजलेला किंवा पडलेला. त्रिविक्रम (तीन पावले) हे विष्णूचे एक नाव. या आसनाला विष्णूच्या वामनावताराचे नाव दिले आहे. त्याबद्दल पुढील कथा सांगितली जाते : बळी हा राक्षसांचा राजा असून प्रल्हादाचा नातू होता. त्याने सारे जग जिंकले. त्याने केलेल्या तपश्चर्येमुळे त्याची शक्ती इतकी वाढली की देवांना त्याच्यापासून भय निर्माण झाले. देवांनी मदतीसाठी विष्णुची प्रार्थना केली. विष्णूने ब्रह्मर्षी कश्यप आणि त्याची पत्नी अदिती यांच्या पोटी वामन म्हणजे ठेंगू मुलाच्या रुपाने जन्म घेतला. बळीने केलेल्या एका यज्ञाचे वेळी विष्णू वामनाच्या रुपाने तेथे आला आणि तीन पावले चालून मिळेल इतकी भूमी त्याने मागितली. उदारपणाबद्दल प्रसिध्द असलेल्या बळीने मागेपुढे न पाहाता ही मागणी मान्य केली. त्याबरोबर वामनाने प्रचंड आकार धारण केला आणि तीन पावले टाकली. पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली. दुसर्‍या पावलाने आकाश व्यापले, आणि तिसरे पाऊल टाकण्यास जागा उरली नाही. तेव्हा बळीने आपले डोके पुढे केले. आणि विष्णूने त्यावर आपला पाय ठेवला. विष्णूने बळीला आणि त्याच्या प्रजेला पाताळात पाठवून त्याला पाताळाचे राज्य दिले. अशा तर्‍हेने पुन्हा एकदा देवांना जगाचे राज्य मिळाले. हे आसन हनुमानासनापेक्षा (चित्र क्र.४७५) अधिक कठिण आहे. या आसनात जमिनीवर पालथे निजून पाय दोन बाजूंना पूर्णपणे पसरुन एका पायाची टाच डोक्याच्या जवळ हातांनी धरायची असते.

पध्दती
१. दोन्ही पाय सरळ ठेवून जमिनीवर उताणे निजा. (चित्र क्र.२१९).
२. उजवा पाय वर न्या. हातांची बोटे एकमेकांत गुंफा. हात लांबवा. हातांच्या ओंजळीत उजवी टाच धरा.
३. श्वास सोडा. उजवा पाय डोक्याच्या मागच्या बाजूला सरळ खाली ओढा आणि उजव्या पायाचा आंगठा टाचेवरची पकड न सोडता जमिनीवर टेका. (चित्र क्र. ४७८) उजव्या पोटरीचे आतली बाजू उजव्या कानाला स्पर्श करील आणि खांदे किंचित रुंदावले जातील. डावा पाय सर्वकाळ जमिनीवर सरळ लांबवलेला असावा.
४. नेहमीप्रमाणे श्वसन करीत विनात्रास जितका वेळ शक्य होईल तितका वेळ या आसनात राहा.
५. उजवी टाच सोडा आणि उजवा पाय खाली आणून डाव्या पायाजवळ ठेवा.
६. आता उजवा पाय जमिनीवर ठेवून आणि डावी टाच धरुन हे आसन आधीच्या इतकाच वेळ पुन्हा करा.
७. हे अवघड आसन पूर्ण झाल्यावर काही वेळ शांत बसा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनामध्ये पाय पूर्णपणे ताणले जातात. त्यामुळे अंतर्गळ या विकाराला प्रतिबंध केला जातो व तो विकार बरा होतो. या आसनामुळे कामवासना मंदावते व मनाला स्थिरता लाभते.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP