मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
हलासन *

हलासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. २४४)
हल म्हणज नांगर. हे आसन नांगरासारखे दिसत असल्यामुळे हे नाव दिले गेले आहे. सर्वांगासन १ चाच हा एक भाग असून त्याचा पुढला टप्पा आहे.

पध्दती
१. सालंब सर्वांगासन १ करा. (चित्र क्र. २२३). छातीचे हाड हनुवटीवर घट्ट दाबले जाऊ द्या.
२. हनुवटी मोकळी करा. धड किंचित खाली आणा. हात आणि पाय डोक्यावरुन पलीकडे न्या. पायाची बोटे जमिनीवर टेका. (चित्र क्र. २३८).
३. मांडयांच्या मागचे जोडस्नायू वर खेचून गुडघे आवळा आणि धड वर उचला. (चित्र क्र. २३९)
४. हाताचे पंजे पाठीच्या मध्यभागी ठेवा. आणि धड जमिनीशी काटकोनात ठेवण्यासाठी पाठीवर दाब द्या. (चित्र क्र. २४०)
५. पायांच्या विरुध्द दिशेला हात जमिनीवर, लांबवा. (चित्र क्र. २४१)
६. आंगठयांचा हूक करा आणि हात व पाय ताणा. (चित्र क्र. २४२)
७. बोटे एकमेकांत गुंफा. (चित्र क्र. २४३) आंगठे जमिनीला टेकतील अशा तर्‍हेने मनगटे वळवा. (चित्र क्र. २४४). बोटांबरोबरच तळहातांना ताण द्या. हात कोपरापाशी घट्ट आवळा आणि ते खांद्यापासून ओढून धरा.
८. पाय आणि हात विरुध्द दिशांना ताणले जातात आणि त्यामुळे पाठीचा कणा पूर्णपणे ताणला जातो.
९. बोटे गुंफताना मधून मधून त्यांचा क्रम बदलून गुंफावीत. समजा, उजवा आंगठा जमिनीला प्रथम लागत असेल तर तो त्या स्थितीत एक मिनिट ठेवा. नंतर पकड सैल करा आणि प्रथम डावा आंगठा जमिनीला टेकू द्या. बोटेसुध्दा या नव्या पध्दतीने पुन्हा गुंफा आणि आधीच्याच इतका वेळ हात लांब ताणा. यामुळे दोन्ही खांदे, कोपरे व मनगटे ही समतोलपणे विकसित होतील आणि लवचिक बनतील.
१०. सुरवातीला बोटे एकमेकांमध्ये गुंफणे कठीण जाईल, परंतुअ वर उल्लेखिलेल्या कृतींचा सराव ठेवला तर हळू हळू बोटांची गुंफण सहजपणे करता येऊ लागेल.
११. प्रारंभी पायाची बोटे डोक्याच्या मागच्या दिशेला जमिनीवर घट्ट टेकून धरणे हेही कठीण जाईल. परंतु या आसनात जाण्यापूर्वी सर्वांगासन १ (चित्र क्र. २२३) हे आसन अधिक काळ, आणि अंग अधिक ताणून, जर केले तर पायाची बोटे जमिनीवर अधिक काळ टेकलेली राहातील.
१२. या स्थितीमध्ये नेहमीसारखे श्वसन करीत १ ते ५ मिनिटे राहा.
१३. हात मोकळे करा. पाय उचलून सर्वांगासन १ मध्ये या. व हळू हळू खाली उताणे झोपा आणि विसावा घ्या.

परिणाम
हलासनाचा परिणाम सर्वांगासन १ (चित्र क्र. २२३) या आसनासारखाच होतो. त्याशिवाय पोटातील अवयव आकुंचित होत असल्यामुळे त्यांना नवा जोम येतो. पुढे वाकल्यामुळे पाठीच्या कण्यामधला रक्तप्रवाह वाढतो आणि पाठदुखी थांबते. बोटे एकमेकांत गुंफून हाताचा पंजा व बोटे ताणल्यामुळे हातांतील पेटके बरे होतात. ज्यांना ताठरलेले खांदे आणि कोपरे, लंबँगो आणि पाठीचा कणा आर्थरायटीस हे वातविकार असतील, त्यांना या आसनामुळे आराम मिळतो. वायूमुळे पोटात निर्माण होणारे दुखणे कमी होते आणि लगेच एक प्रकारचा ह्लकेपणा जाणवू लागतो. तीव्र रक्तदाबाची प्रवृत्ती असलेल्या लोकांना हे आसन लाभदायक ठरते. आधी हलासन करुन त्यांनी नंतर सर्वांगासन १ केले तर रक्तप्रवाहाला वेग येणार नाही किंवा डोके जडावल्यासारखे वाटणार नाही. हलासन हे पश्चिमोत्तानासनाच्या (चित्र क्र. १६०) पूर्वतयारीचे आसन आहे. हलासन चांगल्या तर्‍हेने येऊ लागले म्हणजे पाठीच्या स्नायूमध्ये जी चपलता येते, तिच्यामुळे पश्चिमोत्तानासन चांगल्या रीतीने साधू लागते.
टीप : - तीव्र रक्तदाबाचा विकार असलेल्यांनी सालंब सर्वांगासन १ करण्यापूर्वी पुढे दिलेल्या पध्दतीप्रमाणे हलासन करावे.
१. जमिनीवर सरळ उताणे पडा.
२. श्वास सोडा. पाय हळू हळू उचलून काटकोनात आणा. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत सुमारे १० सेकंद राहा.
३. श्वास सोडा. पाय डोक्यावरुन पलीकडे न्या. पायाची बोटे जमिनीवर टेका. बोटे घट्ट टेकलेली राहू द्या. आणि पाय गुडघ्यांशी घट्ट आवळलेले असू द्या.
४. पायाची बोटे जमिनीवर टेकलेली ठेवणे कठीण वाटले तर, डोक्याच्या मागच्या बाजूला एखादी खुर्ची किंवा स्टूल ठेवा आणि त्याच्यावर पायाची बोटे टेका.
५. श्वास जड किंवा वेगाने होऊ लागला तर पायाची बोटे जमिनीऐवजी खुर्चीवर अथवा स्टुलावरच टेका. त्यामुळे डोक्यात जडपणा किंवा दाब जाणवणार नाही.
६. हात डोक्यावरुन पलिकडे लांबवा, जमिनीवर ठेवा आणि या स्थितीत नेहमीसारखे श्वसन करीत ३ मिनिटे राहा.
७. हे आसन करीत असताना सर्व वेळ डोळे मिटून नजर नाकाच्या बोंडीवर खिळवा.

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP