मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


८८१.
राम अवघाचि आपण । दुजे कैंचे कोठे कोण ॥१॥
द्वैत अद्वैताचे ठायी । भासमात्र हे नवई ॥२॥
हो कां द्वैतासारिखे । काय अद्वैत पारखे ॥३॥
रामदास आदिअंती । एकामध्ये कैंची भ्रांती ॥४॥

८८२.
देवेंविण आतां मज कंठवेना । कृपाळू तो नाना ठायी वसे ॥१॥
नाना ठायी देव आहे जेथे तेथे । तयाविण रिते स्थळ नाही ॥२॥
स्थळ नाही रिते ब्रह्म ते पुरते । जेथे जावे तेथे मागे पुढे ॥३॥
मागे पुढे ब्रह्म सर्वत्र व्यापक । दास तो निःशंक तेणे गुणे ॥४॥

८८३.
चिंता काय आतां स्वप्नींचे सुखाची । सर्व चाले तोंचि ब्रह्म दिसे ॥१॥
ब्रह्म दिसे तरी ज्ञाते न मानिती । दास म्हणे चित्ती पालटेना ॥२॥

८८४.
सकळांसी आधार पृथ्वीचा । पृथ्वीस आधार शेषाचा ।
शेषास आधार कूर्माचा । आणि वराहो ॥१॥
तिघां आधार आवर्णोदकाचा । आवर्णोदकासी आधार तेजाचा ।
तेजास आधार वायोचा अनुक्रमे ॥२॥
सकळांस आधार भगवंताचा । महिमा कळेना जयाचा ।
रुप पाहतां मनाचा । वेग राहे ॥३॥

८८५.
प्रगट ना गुप्त । व्यक्त ना अव्यक्त । आदि मध्य अंत । सारिखेचि ॥१॥
सारिखेंचि वाटे । देह जेथे आटे । दुजेपण तुटे । एकत्वेसी ॥२॥
एकी एकपण । उजेडासी आले । तेणे गुणे गेले । दुजेपण ॥३॥
एक दोन तीन । पांच पंचवीस । खेळे सावकाश । मायादेवी ॥४॥
माया हे माईक । सबळ वाटे तया । आत्मज्ञान जया । प्राप्त नाही ॥५॥
नाही ओळखिले । आप आपणांसी । माया अज्ञानासी । वेढा लावी ॥६॥
वेढा लावीयेले । मायेने जीवासी । आत्माजीवपदासी । आला नाही ॥७॥
आले मेले गेले । आपणा कळले । तयातीत राहिले । आपरुप ॥८॥
रुप अनुभवितां । नाही ज्ञेय ज्ञाता । अनुभव तत्त्वतां । तोही नुरे ॥९॥
रामीरामदास । रामरुपी विरे । पाहे राही नुरे । जो जो दिल्हा ॥१०॥

८८६.
स्वानुभवाचे पालवे । शून्य गाळिले आघवे ॥१॥
सघनी हारपले गगन । सहज गगन सघन ॥२॥
शुद्धरुप स्वप्रकाश । अवकाशवीण आकाश ॥३॥
रामीरामदास म्हणे । स्वानुभवाचिये खुणे ॥४॥

८८७.
अवघे ब्रह्ममय रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव नोहे कैसा ॥१॥
सगुण हे ब्रह्म निर्गुण हे ब्रह्म । पाहतां मुख्य वर्म ब्रह्ममय ॥२॥
नाही द्वैत भेद मिथ्या कां भ्रमसी । सत्य माया ऐसी मानूं नये ॥३॥
मृगजळ डोळां दिसे परि नासे । तैसा हा विलास दिसताहे ॥४॥
दास म्हणे देहबुद्धि हे त्यागावी । एकत्वे रंगावी मनोवृत्ति ॥५॥

८८८.
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी ॥१॥
आपणासी भेटी जाली बहुदिसां । तुटला वळसा मीपणाचा ॥२॥
मीपणाचा भाव भावे केला वाव । दास म्हणे देव प्रगटला ॥३॥

८८९.
मत्स्ये जावे कोणीकडे । पाणी जिकडे तिकडे ॥१॥
आंत पाणी बाह्य पाणी । नाही पाणियाची वाणी ॥२॥
पुढे पाणी मागे पाणी । वाम सव्य अवघे पाणी ॥३॥
पाणीयाचा मासा जाला । देहभाव हारपला ॥४॥
रामदास पाणी जाला । नामरुपा हरपला ॥५॥

८९०.
माझे मीतूंपण विवेकाने नेले । देवाजीने केले समाधान ॥१॥
मी देह म्हणतां केल्या येरझारा । चुकविला फेरा चौर्‍यांसीचा ॥२॥
आपुल्या सुखाचा मज दिल्हा वांटा । वैकुंठीच्या वाटा कोण धांवे ॥३॥
देवासी नेणतां गेले बहु काळ । सार्थकाची वेळ एकाएकी ॥४॥
एकाएकी एक देव सांपडला । थोर लाभ जाला काय सांगो ॥५॥

८९१.
योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला एकाएकी ॥१॥
एकाएकी एक त्रैलोक्यनायक । देखिला सन्मूख चहुंकडे ॥२॥
चहुंकडे देव नित्यनिरंतर । व्यापुनी अंतर समागमे ॥३॥
समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी ॥४॥
देशधडी केला विवेके वियोग । रामदासी योग सर्वकाळ ॥५॥

८९२.
अलभ्याचा लाभ अकस्मात जाला । देव हा वोळला एकाएकी ॥१॥
एकाएकी सुख जाहले एकट । व्यर्थ खटपट साधनांची ॥२॥
साधनाची चिंता तुटली पाहतां । वस्तुरुप होतां वेळ नाही ॥३॥
वेळ नाही मज देवदरुशणा । सन्मुखचि जाणा चहूंकडे ॥४॥
चहूंकडे मज देवाचे स्वरुप । तेथे माझे रुप हरपले ॥५॥
हरपले चित्त देवासी चिंतीतां । दास म्हणे आतां कोठे आहे ॥६॥

८९३.
आतां किती बोलो धालो तृप्त जालो । विवेके विरालो परब्रह्मी ॥१॥
परब्रह्मी जातां ब्रह्मचि तत्त्वतां । विचारे पाहतां आपणचि ॥२॥
आपणचि असे कोणीच न दिसे । संशयाचे पिसे वाव जाले ॥३॥
वाव जाले भय सर्व संसारीचे । लाधले हरीचे निजधाम ॥४॥
निजधाम बोधे विवेके पहावे । दास जीवेभावे सांगतसे ॥५॥

८९४.
धन्य माझे भाग्य जाले सफलित । देव सप्रचित जेथे तेथे ॥१॥
जेथे तेथे देव येर सर्व माव । माझा अंतरभाव निवळला ॥२॥
निवळला भाव निर्गुणी लागतां । विवेके जाणतां नित्यानित्य ॥३॥
नित्यानित्य बरे शोधुनी पाहिले । मन हे राहिले समाधाने ॥४॥
समाधाने मन जाहेले उन्मन । शुद्ध ब्रह्मज्ञान रामदासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP