मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७१९.
काया माया छाया हे कांही तगेना । वैभव जगेना जन्मवरी ॥१॥
जन्मवरी लोक देखत आहेती । किती एक जाती सांडुनियां ॥२॥
सांडुनियां जाती कन्या पुत्र धन । सर्व साभिमान लौकिकांचा ॥३॥
लौकिकांचा भाव लौकिकी राहिला । प्राणिमात्र गेला एकलाचि ॥४॥
एकलाचि येतो एकलाचि जातो । मध्येचि भुलतो मायाजाळे ॥५॥
मायाजाळ माया हे कांही सुटेना । नाचवी वासना अनावर ॥६॥
अनावर मन कदा आवरेना । धरितां धरेना अनुमाने ॥७॥
अनुमाने कांही नव्हे समाधान । जव आत्मज्ञान पाविजेना ॥८॥
पाविजेना मोक्ष तुटेना बंधन । श्रवण मनन जेथे नाही ॥९॥
जेथे नाही सारासार विचारणा । या जन्ममरणा ठाव तेथे ॥१०॥
तेथे ठाव जाला देह संदेहासी । होती पापराशी अनुमाने ॥११॥
अनुमाने पाप अनुमाने पुण्य । अनुमाने धन्य होइजेना ॥१२॥
होइजेना धन्य विचारणेविण । लौकिकाचा शीण व्यर्थ जातो ॥१३॥
व्यर्थ जातो शीण देखत देखतां । लौकिक तत्त्वतां राखवेना ॥१४॥
राखवेना परी राखिला पाहिजे । मनामध्ये कीजे विचारणा ॥१५॥
विचारणा कीजे या देवांभक्तांची । कर्ता कोण तोचि ओळखावा ॥१६॥
ओळखावा कर्ता सर्वत्र सृष्टीचा । मी तो कोण कैंचा धुंडाळावा ॥१७॥
धुंडाळावे महावाक्य पंचीकर्ण । तत्त्वाचे विवरण यथासांग ॥१८॥
यथासांग व्यंग पडोचि नेदावे । अत्यंतचि व्हावे समाधान ॥१९॥
सावधानपणे देवासी पहाणे । नाशिवंत जाणे सांडुनीयां ॥२०॥
सांडुनीयां सर्व अष्टधा प्रकृति । विवेकाची गती ओळखावी ॥२१॥
ओळखावी मुख्य सज्जनाची कृपा । तेणे पुण्यपापा नातळावे ॥२२॥
नातळावे कदा दृश्य पदार्थासी । असोनी देहासी लिंपो नये ॥२३॥
लिंपो नये जैसे पद्मिणीचे पत्र । देहे डिंबमात्र चालतसे ॥२४॥
चालतसे सर्व तत्त्वांचे गांठोडे । तेथे काय वेडे गुंडाळते ॥२५॥
गुंडाळते वेडे देहासंबंधासी । भ्रमे विवेकासी सांडुनीया ॥२६॥
सांडूनियां सार घेईल असार । ऐसा अनावर भ्रम आहे ॥२७॥
भ्रम आहे जया अंतरी माजला तोंचि तो गांजला संसारी ॥२८॥
संसारी एक सुटोनीयां गेले । एक ते बांधले संकल्पाने ॥२९॥
संकल्पाने सुटे ऐसा कोण आहे । ईश्वरासी पाहे शोधुनीयां ॥३०॥
शोधुनियां पाहे तोचि देव लाहे । येर तो न राहे देवापाशी ॥३१॥
देवापाशी राहे बहुतां सुकृते । लौकिकासी भूते झडपीती ॥३२॥
झडपिती भूते सत्यचि मानितां । देव पाहो जातां भूते मिथ्या ॥३३॥
भूते मिथ्या ऐसे हृदयी बिंबले । तेव्हांचि जाहाले समाधान ॥३४॥
समाधान आहे मायातीत होतां । नाथिली अहंता घेऊं नये ॥३५॥
घेऊं नये पक्ष कदा असत्याचा । वेगी या सत्याचा पंथ धरा ॥३६॥
पंथ धरा जेणे परस्त्र पाविजे । देवासी लाविजे सन्निधान ॥३७॥
सन्निधानमात्रे तरे बहुजन । पावने पावन होइजते ॥३८॥
होईजे पावन तेंचि ते स्वहित । सोडितां पतित होइजेते ॥३९॥
होइजेते कष्टी तेंचि कां धरावे । वेगी उद्धरावे आपणासी ॥४०॥
आपणासी वैर कदा करुं नये । अंती सर्व जाय निघोनीयां ॥४१॥
निघोनियां जाय त्याचे घेसी काय । वेगी धरी सोय शाश्वताची ॥४२॥
शाश्वताची सोय सांडुनी करंटा । व्यर्थ बारा वाटा धांवतसे ॥४३॥
धांवतसे चहुंकडे अनुमाने । तया समाधाने मोकलिले ॥४४॥
मोकलिले मन ऐसे ही कळेना । मातला वोळेना मनासंगे ॥४५॥
मानीतसे मने जे जे ओळखीले । स्वरुप राहिले मनातीत ॥४६॥
मनातीत होतां होय सार्थकता । मनासवे व्हावे कासावीस ॥४७॥
कासावीस पंचभूतिकी राहतां । भूतांसी पाहातां भूतलोक ॥४८॥
अधोगति चुके ते कांही करावे । मनासवे व्हावे कासावीस ॥४९॥
कासावीस पंचभूतिकी राहतां । भूतांसी पाहातां भूतलोक ॥५०॥
भूतलोक वेगी सांडुनीयां जावे । विचारे पहावे परब्रह्म ॥५१॥
परब्रह्म तेचि आपणचि आहे । दास म्हणे पाहे अनुभवे ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP