मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४९१ .

ओंवीचेनि भिसे देव आठवावा । हृदयी धरावा सर्वकाळ ॥१॥

सर्वकाळ मनी स्वरुपाचा वेधु । तेणे भवसिंधु तुटईल ॥२॥

तुटईल व्याधी या जन्मकर्माची । जरी राघवाची भक्ति घडे ॥३॥

भक्ति घडे भावे सगुण देवाची । संगति देहाची जंव आहे ॥४॥

आहे देव तंव सगुणी भजावे । सस्वरुप व्हावे आपणचि ॥५॥

आपणचि देव आपणचि भक्त । संतसंगे मुक्त आपणचि ॥६॥

आपणचि सर्व आपणचि वाव । मीपणाचा ठाव आपणचि ॥७॥

आपण तूंपण जंवरी अंतरी । तंव भक्ति करी सगुणाची ॥८॥

सगुणाची भक्ति लोभाची विरक्ति । निर्गुणाची मुक्ति सायुज्यता ॥९॥

सायुज्यता मुक्ति तुटला संदेहो । बंधनचि वाव दास म्हणे ॥१०॥

४९२ .

गणेश नमावा आणि सरस्वती । मारुति गभस्ती चंद्रमौळी ॥१॥

विष्णु खंडेराव भगवती भैरव । पांडुरंगी भाव शामराज ॥२॥

हरिदिनी निराहार पापाचा संहार । व्रते सोमवार थोर आहे ॥३॥

गोमुख गोकर्ण गोमय गोमूत्र । गोशृंग पवित्र तर्पणासी ॥४॥

तुळसी काळोत्री बेल गंगावती । रुद्राक्ष विभूति पाप नासी ॥५॥

विष्णु द्वारावती तुळशीच्या माळा । पाहिजे गोपाळा दहीभात ॥६॥

आषाढी कार्तिकी आवळीची बने । घालावी भोजने ब्राह्मणासी ॥७॥

ब्राह्मणाच्या तीर्थे पापक्षय होतो । जन उद्धरतो विप्रवाक्ये ॥८॥

लिंगाची लाखोली लिंगा अभिषेक । येणे ही विवेक पाविजेतो ॥९॥

अश्वत्थाची पूजा आणि प्रदक्षिणा । ध्यावा क्षणक्षणा नारायण ॥१०॥

शालिग्रामी पुण्य बहुतचि जोडे । नर्मदे रोकडे हनुमंत ॥११॥

बाण चक्रांकित सोमसूर्यकांत । तांदळे दुरित नासताती ॥१२॥

अन्न ब्रह्म आहे विचारुनि पाहे । शरीर हे राहे तयाचेनि ॥१३॥

आपोनारायण सकळांचे जीवन । कारण पर्जन्य पाहिजे तो ॥१४॥

चंदनाची काष्ठे आणि बेलकाष्ठे । थोर दंड काष्ठे पळसांची ॥१५॥

मृगाचे कातडे डुकराचे केश । कमळाक्ष भद्राक्ष पुण्यमाळा ॥१६॥

भूमंडळी तीर्थे ते किती सांगावी । सर्वही फिरावी कोणी एके ॥१७॥

आघाडा दुरुवा कोमळा अपूर्वा । तेणेचि पूजावा लंबोदर ॥१८॥

रुई मांदारांची फुले कण्हेराची । आणि जास्वंदीची आरगुंद ॥१९॥

भूमंडळावरी थोर सीळोदके । नासती पातके ततक्षणी ॥२०॥

कांउंजी भीउंजी पाठोरे पीठोरे । हत्ती गा पुजारे एकभावे ॥२१॥

डाउते अनंत थोर शाकाव्रत । द्विदळे नेमस्त सेवूं नये ॥२२॥

भोजनाचे वेळी एकवाढी करा । आणि मौन धरा स्वयंपाकी हो ॥२३॥

स्नानसंध्या प्रदक्षणा नमस्कार । श्राद्ध पक्ष थोर सांडूं नये ॥२४॥

ब्राह्मणासी वैश्वदेव उपासना । करावे तर्पणा आदरेसी ॥२५॥
करावी आलोड्ये वेद आणि शास्त्रे । मंत्र स्तुतिस्तोत्रे नानापरी ॥२६॥

तपे पुरश्चरणे ध्यानस्थ बैसावे । सांग संपादावे देवार्चन ॥२७॥

धरणो पारणी नित्य उपोषणे । तेणे हाती क्षीण महादोष ॥२८॥

काव्ये अभ्यासावी पुराणे सांगावी । कवित्वे करावी सावकाश ॥२९॥

फाल्गुनमहात्म्ये तेंही संपादावी । देवके करावी सावकाश ॥३०॥

मांगिणी जोगिणी राहाण गोंधळ । डाकांचे कुल्लाळ जेवूं घाले ॥३१॥

बुलगावा मुंज्या नरसीयां झोटिंग । पूजा कीजे सांग देवतांची ॥३२॥

देवते ते भूते सिद्धसीवकाळा । पूजावा आगळा पंचाक्षरी ॥३३॥

नाना तीर्थे व्रते सांग संपादावी । अघोरे करावी नाना कर्मे ॥३४॥

बगाडे कुलुपे राडी आणि बेडी । कामना रोकडी पुरतसे ॥३५॥

गळही टोंचावे नींबही नेसावे । खोडे ही घालावे हाती पायी ॥३६॥

गुगुळ जाळावे पोतही खेळावे । जोगी ते पूजावे भैरवांचे ॥३७॥

दया दानधर्म करावा स्वधर्म । चुकवावे वर्म संसाराचे ॥३८॥

संसाराचे वर्म तोडितां तुटेना । मार्गचि फुटेना विवेकाचा ॥३९॥

विवेकाचा मार्ग संगसंगे कळे । उदंड निवळे विवेकाने ॥४०॥

भ्रष्ट शाक्त मुक्त अविवेकी नसावा । कवळ दंडावा अनाचारु ॥४१॥

अनाचारे ज्ञान कदा निवळेना । इहलोक कळेना परलोक ॥४२॥

परलोक माया सांडुनी पहावा । अष्टधेचा गोंवा घालूं नये ॥४३॥

घालूं नये वाद वाउगा वेवाद । तेणे गुणे खेद होत आहे ॥४४॥

होत आहे पुढे जयास कल्पांत । सर्व नाशिवंत सांडा मार्गे ॥४५॥

सांडा मागे बंड पाषांड थोतांड । चिंतावा अखंड गुणातीत ॥४६॥

गुणातीत देव त्रिगुणापरता । तेथे तूं सरता होई बापा ॥४७॥

बापमाय सखे कोण्ही कामा नये । धुंडाळावी सोय मुळाकडे ॥४८॥

मुळाकडे फळ फळाकडे मूळ । मूळचि निर्मूळ भक्तियोगे ॥४९॥

भक्तियोगे ज्ञान वैराग्य पाहिजे । परत्र लाहिजे दास म्हणे ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP