मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


६६१.
माझे माझे म्हणसी सेखी सांडुन जाशी ।
कां रे भुललासी सावध होई ॥१॥
बहु दुःख पुढिलांचे दृष्टी देखतोसी ।
काम रे भुललासी ० ॥२॥
प्रपंचमैंदासी लुब्ध जाहलासी । कां रे भु० ॥३॥
जठरी नवमास जतन केलासी । कां रे भु० ॥४॥
नित्यगासी ऐकसी लुलु सांडिनासी । कां रे भु० ॥५॥
रामदास सदा सांगतो तयासी । कां रे भुललासी सावध० ॥६॥

६६२.
काया हे काळाची घेऊनी जाणार । तुझेनि होणार काय बापा ॥१॥
काय बापा ऐसे जाणोनि नेणसी । मी माझे म्हणसी वायांवीण ॥२॥
वायांवीण शीण करिसी जन्मवरी । दंभ लोकाचारी नागवण ॥३॥
नागवण आली परलोका जातां । लौकिक तत्त्वतां इही लोकी ॥४॥
केली नाही चिंता नामी कानकोंडे । आतां कोण्या तोंडे जात आहे ॥५॥
जात आहे सर्व सांडोनी करंटा । जन्मवरी ताठा धरोनियां ॥६॥
धरोनीयां ताठा कासया मरावे । भजन करावे दास म्हणे ॥७॥

६६३.
संसारासी आले देवासी चुकले । प्राणी आले गेले वायांविण ॥१॥
वायांवीण सीण केला जन्मवरी । मायामोहोपुरी वाहोनियां ॥२॥
वाहोनियां जीवे भोगिली आपदा । आत्महित कदा केले नाही ॥३॥
केले नाही आतां ऐसे न करावे । विवेके भरावे निरुपणी ॥४॥
निरुपणी सारासार विचारणे । दास म्हणे येणे समाधान ॥५॥

६६४.
कोणाचे हे घर कोणाचा संसार । सांडुनी जोजार जाणे लागे ॥१॥
जाणे लागे अंती एकले शेवट । व्यर्थ खटपट सांडुनिया ॥२॥
जन्मवरी देहे संसारी गोविले । नाही कांही केले आत्महित ॥३॥
आत्महित गेले संसाराचे ओढी । अंती कोण सोडी रामेविण ॥४॥
रामेंविण कोणी सोडवीना अंती । वायांचि रडती जिवलगे ॥५॥
जिवलगी राम दुरी दुरावला । विचार आपुला जाणवेना ॥६॥
जाणवेना पूर्व सुकृतावांचोनी । पापियाचे मनी राम कैंचा ॥७॥
राम कैंचा तया लौकिकाची चाड । पुरवीती कोड संसाराचे ॥८॥
संसाराचे कोड तेंचि वाटे गोड । जया नाही वाड अनुताप ॥९॥
अनुतापी जाले संसारी सुटले । राजे राज्य गेले सांडुनिया ॥१०॥
सांडुनीयां गेले वैभव संपत्ति । पुढे यातायातीचेनि भेणे ॥११॥
भेणे ते शरण रिघाले देवासी । नेले वैकुंठासी भक्तराज ॥१२॥
भक्तराज भावे भेटले देवासी । रामीरामदासी धन्य वेळा ॥१३॥

६६५.
दैन्यवाणा जाला प्राणी । चंद्री लागली नयनी ॥१॥
म्हणती उचला उचला । आतां भूमिभार जाला ॥२॥
घोर लागला अमूप । प्राणी जाला प्रेतरुप ॥३॥
दांतखीळ बैसली वदनी । ताठा पडिला करचरणी ॥४॥
डोळे विक्राळ दिसती । झांका झांका मुले भीती ॥५॥
रामीरामदास म्हणे । अवघी सुखाची सुणे ॥६॥

६६६.
अधिक बोलोंचि नेदिती । धरुनि जीभचि कापिती ॥१॥
तेथे चालेना की ताठा । पोटासाठी देशवटा ॥२॥
हातपाय ते कांपिती । कर्ण नासिक छेदिती ॥३॥
शिर छेदुनियां सांडिती । कित्येकांस फांशी देती ॥४॥
नानाप्रकारी यातना । अवघेंचि श्रुत आहे जनां ॥५॥
दास म्हणे सेवाचोर । साहेबाचा हरमाखोर ॥६॥

६६७.
नवस पुरवी तो देव पूजिला । लोभालागी जाला कासावीस ॥१॥
कासावीस जाला प्रपंची करितां । सर्वकाळ चिंता प्रपंचाची ॥२॥
प्रपंचाचे चिंता करितांचि मेला । तो काय देवाला उपकार ॥३॥
उपकार जाला सर्व ज्यांलागोनि । ते गेली मरोनि पाहतसे ॥४॥
पहातसे पुढे आपणहि मेला । देवासि चुकला जन्मवरी ॥५॥

६६८.
ईश्वरेसी कानकोंडे । अंती जाईल कवण्या तोंडे ॥१॥
लाजे हरिच्या रंगणी । जावयास लोटांगणी ॥२॥
नेदी फुटका कवडा । चोरी घातला दरवडा ॥३॥
धर्म न करी दुराचारी । नागविला राजद्वारी ॥४॥
म्हणे रामीरामदास । प्राणी नागवला उदास ॥५॥

६६९.
देखिला संसार तरि पाहे सार । वायां येरझार पाडूं नको ॥१॥
पाडूं नको दुःखसागरी आपणा । वेगी नारायणा ओळखावे ॥२॥
ओळखावे वेगी आपाअपणासी । संसारी सुटसी दास म्हणे ॥३॥

६७०.
माता पिता जन स्वजन कांचन । प्रिय पुत्री मन गोंवूं नको ॥१॥
गोंवूं नको मन राघवेवांचोनी । लोकलाज जनी लागलीसे ॥२॥
लागलीसे परी तुंवां न धरावी । स्वहिते करावी रामभक्ति ॥३॥
रामभक्तीविण होसील हिंपुटी । एकले शेवटी जाणे लागे ॥४॥
जाणे लागे अंती बाळा सुलक्षणा । ध्याई रामराणा दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP