मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


७११.
पतित हे जन करावे पावन । तेथे अनुमान करुं नये ॥१॥
करुं नये गुणदोष उठाठेवी । विवेके लावावी बुद्धि जना ॥२॥
बुद्धि सांगे जनां त्या नांव सज्ञान । पतितपावन दास म्हणे ॥३॥

७१२.
बद्धाचा मुमुक्षू प्रबोधे करावा । मग उद्धरावा ज्ञानमार्गे ॥१॥
ज्ञानमार्गे घ्यावे सत्य समाधान । तरी मग जन पाठी लागे ॥२॥
पाठी लागे त्याचे अंतर जाणावे । आपुले म्हणावे दास म्हणे ॥३॥

७१३.
पोट भरावया मांडिले उपास । जाला कासावीस लाभेविण ॥१॥
राजा पावावया प्रजा धुंडाळीतो । कासावीस होतो वाउगाचि ॥२॥
द्रव्य साधावया निर्द्रव्याचा संग । तेथे कैचे मग द्रव्य मिळे ॥३॥
ब्रह्म साधावया कर्ममार्गे गेला । तंव कर्मे केला कासावीस ॥४॥
सुटका व्हावया बंधनचि केले । तेणे ते सुटले केंवि घडे ॥५॥
केंवी घडे दृढ रोगे आरोग्यता । कुपथ्याने व्यथा वाढतसे ॥६॥
एक व्यथा एक औषध घेतले । दास म्हणे जाले तयापरी ॥७॥

७१४.
आपुली पारखी सर्व पारखिली । नाही कामा आली रामेविण ॥१॥
रामेविण जाण हे सर्व पीसुणे । मावेचे करणे नाथिलेचि ॥२॥
नाथिलेची आहे जनाचे साजणे । तणाचे तापणे तयापरी ॥३॥
तयापरी ऐसा निश्चय जाणावा । सतीचा बोळावा लोक आहे ॥४॥
लोक नाना रंग नाणोनि वोरंग । रामदासी संग सोडियेला ॥५॥

७१५.
अर्थेंविण पाठ कासया करावे । व्यर्थ कां मरावे घोकुनीयां ॥१॥
घोकुनीयां काय वेगी अर्थ पाहे । अर्थरुप राहे होउनीयां ॥२॥
होउनीयां अर्थ सार्थक करावे । रामदास भावे सांगतसे ॥३॥

७१६.
तुजला तूं थोर मजला मी थोर । मी थोर तूं थोर कामा नये ॥१॥
कामा नये कोणा अंगी मीतूंपण । पहा थोरपण ईश्वराचे ॥२॥
ईश्वराचे रुप पहातां निवावे । मीतूंपण द्यावे सोडूनियां ॥३॥
सोडूनियां द्यावे ते काय आपणा । शाश्वताच्या खुणा पाहे बापा ॥४॥
पाहे बापा देव कोण निरवयव । दास म्हणे भाव तेथे ठेवी ॥५॥

७१७.
सुख पाहो जातां कोठेचि न दिसे । संसार हा असे दुःखमूळ ॥१॥
दुखमूळ जन्म नर आणि नारी । पाहतां संसारी सुख नाही ॥२॥
सुख नाही कदा शाश्वतावांचोनि । जाणतील ज्ञानी दास म्हणे ॥३॥

७१८.
दृश्य हे काशाचे कोणे उभारीले । मज निरुपिले पाहिजे हे ॥१॥
पाहिजे हे दृश्य भूतपंचकाचे । उभारले साचे मायादेवी ॥२॥
मायादेवी कैसी कोण ओळखावी । आणि हे त्यागावी कोणेपरी ॥३॥
परी हे मायेची कैसी ओळखावी । जाणोनि त्यागावी ज्ञानबोधे ॥४॥
ज्ञानबोधे माया जाणोनि त्यागिली । परि नाही गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरुपण संतांचे संगती । तेणे शुद्ध मती होत असे ॥६॥
होत असे परी तैसेचि असेना । निश्चयो वसेना मनामध्ये ॥७॥
मनामध्ये सदा विवेक धरावा । निश्चयो करावा येणे रीती ॥८॥
रीति विवेकाची पाहतां घडीची । जातसे सवेचि निघोनियां ॥९॥
निघोनियां जाय विवेक आघवा । तो संग त्यागावा साधकाने ॥१०॥
साधकाने संग कोणाचा त्यागावा । सदृढ धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरे धरी सज्जनाचा । त्यागी दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP