मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कलिवर्णन

विविध विषय - कलिवर्णन

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१६१

वेळे पाऊस पडेना । नासकवणी उघडेना ॥१॥

ऐसें कुळवाड्याचें भंड । दुःख जाहलें उदंड ॥२॥

बहु पडी आले शेत । रेड्यापाड्याचें आउत ॥३॥

कांहीं केल्यानें पिकेना । धान्य वेळेसि विकेना ॥४॥

फाळा लाविला उदंड । अवघें जाहलें थोतांड ॥५॥

वारीं रोगांचीं वाजतीं । नाना आभाळें फिरती ॥६॥

टोळ पक्षी मूषकादिक । खाती श्वापदें अनेक ॥७॥

दावेदाराची यातना । चोर चोरटें राहेना ॥८॥

नित्य पोटाचा मजूर । वेठीखालें निघे बूर ॥९॥

घर कोपट मोडकें । एक फटकर फाटकें ॥१०॥

बरेंगानें गुरें गेलीं । धारणेनें मुलें मेलीं ॥११॥

सर्व संसार बुडाला । दास म्हणे जोगी जाला ॥१२॥

१६२

शांतिमाता हे मारिली । तेथें भ्रांति प्रतिष्ठिली ॥१॥

ऐसे लोक कलियुगींचे । भय न धरिती पापाचें ॥ध्रु०॥

विवेकगुरु तो मारिला । तेथें क्रोध प्रतिष्ठिला ॥२॥

नीतिअमृत सांडिलें । अनीतिमदिरापान केलें ॥३॥

दयावधु संहारिली । निंदामातंगी पाळिली ॥४॥

पुत्रविचार दवडिले । दासीपुत्र प्रतिष्ठिले ॥५॥

सत्यब्राम्हण मारिला । दोष धीवर पाळिला ॥६॥

ज्ञानपक्वान्न सांडिलें । मांसअज्ञान सेविलें ॥७॥

भक्तिलक्ष्मी त्यागिली । अभक्ति अवदशा घेतली ॥८॥

मित्रविश्वास सोडिला । शत्रु विकल्प जोडिला ॥९॥

भेदचोरटें पाळिलें । अभेदराजे दुराविले ॥१०॥

रामीरामदास म्हणे । हेचि दोषांचीं लक्षणें ॥११॥

१६३

जेणें संसारीं घातलें । पापी त्यासी विसरलें ॥१॥

स्त्री सांडूनियां दारा । भजे दासीच्या डिंगरा ॥ध्रु०॥

मायबापें दुरावलीं । चोर आपुलीं मानिलीं ॥२॥

फोडूनियां शालिग्राम । वेश्या सेवितो अधम ॥३॥

सांडुनियां कुलगुरु । शुद्ध मानिला धीवरु ॥४॥

रामीरामदास म्हणे । जळो अभक्तांचें जिणें ॥५॥

१६४

रामा विसरला प्राणी । कामलोभें केली हानी ॥१॥

कामधेनू मोकलिलें । घरीं गाढव पाळिलें ॥ध्रु०॥

उपटूनि कल्पतरु । केला शेराचा आदरु ॥२॥

सांडूनियां चिंतामणि । वेंची दहिंवराचें पाणी ॥३॥

गेलें हातींचें निधान । केलें कवडीचें साधन ॥४॥

परीस रागें हुंडारिला । हातीं पाषाण घेतला ॥५॥

सार अमृत सांडलें । दैन्यवाणें कांजी प्यालें ॥६॥

सोनें सांडोनि आदरें । वेंचों लागला खापरें ॥७॥

रत्नें टाकुनियां खडे । गेले म्हणोनि दुःखें रडें ॥८॥

केली साखर परती । सुखें तोंडीं घाली माती ॥९॥

म्हणे रामीरामदास । तैसी संसाराची आस ! । १०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP