मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
श्रीकृष्ण

देवताविषयक पदे - श्रीकृष्ण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११२४.
( चाल-साधुसंतां मागणे० )
परब्रह्म अवतार भूमिवरी । प्रगटला हा गौळियाचे घरी ॥१॥
कृष्णरुपे धरिले कृष्णनाम । गोपीगोपाळाचे पूर्ण करी काम ॥२॥
देवां रक्षुनि दानवां उद्धरील । ऐसे जातक सांगती ऋषिकुळ ॥३॥
व्यास नारद आदरे ज्यासि गाती । त्याची खांदी कांबळी काठी हाती ॥४॥
शशिसूर्यसम कांति ज्याची कळा । त्यासी म्हणती सांवळा आणि काळा ॥५॥
गोविंदाची कृपा जाली आतां । दास म्हणे गोविंदगुण गातां ॥६॥

११२५.
( चाल-धर्म जागो० )
माभळभट्टा पिढेदान । देतो भगवंत आपण । निंदा द्वेष कामा नये ।
तेणे होतसे कठिण ॥ध्रु०॥
गोकुळींचा पुरोहितु । गोंवळ्या सांगतो हितु । बाळकु कुळासी घातु ।
याचा करा निःपातु ॥१॥
सर्वांसि लविला वेधु । त्याचा मानिला खेदु । स्वार्थमूळ पोटासाठी ।
केला देवासी विरोधु ॥२॥
पराधिक सोसवेना । चाळे करिते कल्पना । कुष्टपुष्ट उणे पुरे ।
दास म्हणे हे मानेना ॥३॥

११२६.
( चाल-धर्म जागो० )
नंदाचे मूल काळे । त्यासी नेले काळे ।
कोणीएक काळे । चालले उफाळे ॥ध्रु०॥
कां करिसी धिटाई । कां करिसी खोटाई ।
कां करिसी चाटाई । जगदीशाचे ठायी ॥१॥
नंदाचा खिल्लारी । नेतो सुंदर नारी ।
अखंड घरोघरी । करितो रसचोरी ॥२॥
न कळे त्याची लीळा । करणे ते अवलीळा ।
सकळांहूनि वेगळा । कोण जाणे कळा ॥३॥
न कळे कैसा भोगी । न कळे कैसा त्यागी ।
दास म्हणे वीतरागी । कुळासी जाला योगी ॥४॥

११२७.
( राग-कल्याण; ताल-त्रिताल; चाल-अरे नर सार० )
तांडवनृत्य करी, देवाधिदेव ॥ध्रु०॥
थैया थैया धमक जातसे । सरी न दिसे दुसरी ॥१॥
नटनाट्यकळा सकळ जाणे । चाकाटल्या किन्नरी ॥२॥
गीतनृत्यवाद्यघनस्वरादिक । दास म्हणे विवरी ॥३॥

११२८.
( चाल-निरुपम रामाबाई० )
गोपाळ सांवळी उभी कदंबवृक्षातळी वो ।
परब्रह्म पुतळी भाग्ये अवतरली गोकुळी वो ॥ध्रु०॥
स्वानंदमयमुनातटी बोधद्रुमाचे तळवटी वो ।
जगदीश नरनटी उभी येक पदाचे नेटी वो ।
द्वितीय पद उफराटी स्पर्शूनियां अगुष्ठी वो ।
त्वं पद तत्पर कर कटी वो ।
कांखे खोउनी तत्वकाठी वो ॥१॥
चिद अतसी कुसुम त्याहुनी तनुतेज सुशाम वो ।
अति सकुमारपणे शब्द कठीण वाटे व्योम वो ।
पूर्णानंदसरोजी वरील तैसे ते मुखपद्म वो ।
गोपीनयन मधुकर जेथे पावती निज विश्राम वो ॥२॥
वेणु वाहे मधुकर शब्देवीण गाय अक्षर वो ।
कोंदले अंबर खेचर जाले तदाकार वो ।
समग्र धरणीधर तृण समीर तरुवर वो ।
रामीरामदासी तन्मय जाले सचराचर वो ॥३॥

११२९.
( चाल-साधुसंतां मागणे० )
हरिपदपंकजी मानस मधुकरे । विसांवा गर्जतसे झुंकारे ॥ध्रु०॥
गाई चारितसे यमुनेपाभळी । वेणु वाजवी सुरस वनमाळी ।
जळे थोकली यमुना तयेकाळी । व्रजनायका पीटिती करताळी ॥१॥
उभा देहुडा पाउली जगजेठी । आंगी बाणली वो चंदनाची उटी ।
बाहुभूषणे हो केयूराची थाटी । कांखे टेकुनियां सुंदर वेताटी ॥२॥
वेणु वाजवितो सर्वांगे सुंदरु । कांसे कांसिला रुळतो पीतांबरु ।
वांकी चरणी हो ब्रीदांचा तोडरु । रामदासाचा स्वामी मनोहरु ॥३॥

११३०.
( राग-कल्याण; ताल-त्रिताल )
हरिवीण काय रे उद्धवा ॥ध्रु०॥
ज्ञान न माने ध्यान न माने । आणीक व्यर्थ उपाय ॥१॥
नित्य निरंजन ध्याती मुनिजन । मानस तेथे न जाय ॥२॥
निर्गुण ते खुण अंतर जाणे । दास गुणगण गाय ॥३॥

११३१.
( राग-केदार; ताल-त्रिताल )
कईं येईल हरि रे उद्धवा ॥ध्रु०॥
अशन शयन भाषण न मने । यदुविर गेला बहुत दुरि रे ॥१॥
रात्रिंदिवस निजध्यास मनाचा । सौख्य कळा न दिसे दुसरी रे ॥२॥
यदुकुळटिळक प्राण आमुचा । दास म्हणे आतां कोणेपरी रे ॥३॥


११३२.
( राग-कानडा; ताल-दादरा )
समजत वेधिले मना । धन्य धन्य मोहना ॥ध्रु०॥
दिसत भासे रम्य विळासे । अगणित गुण गणना ॥१॥
चमकत चित्त चकित चि जाले । लीन तल्लीन निवाले ॥२॥
अंतरिचा हरि अंतरल्यावरि । मग काय भूषण ॥३॥
त्याविण हा जीव जाइल माझा । दास म्हणे मरणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP