मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वैराग्य

विविध विषय - वैराग्य

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३७० .

काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा ॥१॥

कांही धांवाधांव करी । जंव तो आहे काळ दुरी ॥२॥

देह आहे जाइजणे । भुललासी कवण्यागुणे ॥३॥

मायाजाळी गुंतले मन । परि हे दुःखासि कारण ॥४॥

सत्य वाटते सकळ । परि हे जातां नाही वेळ ॥५॥

रामीरामदास म्हणे । आतां सावधान होणे ॥६॥

३७१ .

नाही पुण्याची गांठोडी । तरि तो यम डोई फोडी ॥१॥

तेव्हां पस्तावा हो घडे । प्राणी पाही चहूंकडे ॥२॥

तप्त भूमिके लोळविती । आंगी सांडस लाविती ॥३॥

दास म्हणे हे सकळ । केल्या संचिताचे फळ ॥४॥

३७२ .

देव संसारी घालितो । अंतकाळी सोडवितो ॥१॥

तया देवास चुकले । प्राणी लोभे भांबावले ॥२॥

केले जेणे चराचर । देव विश्वासी आधार ॥३॥

देव जीवाचे जीवन । देव बंधविमोचन ॥४॥

देव सर्वांचे अंतरी । सांभाळितो निरंतरी ॥५॥

रामीरामदास म्हणे । जयाचेनि धन्य होणे ॥६॥

३७३ .

नदी मर्यादा सांडती । उष्णकाळी वोसावती ॥१॥

तैसा तारुण्याचा भर । सवे होतसे उतार ॥२॥

भाग्य चढे लागवेगे । सवेंचि प्राणी भीक मागे ॥३॥

रामदास म्हणे । जयाचेनि धन्य होणे ॥४॥

३७४ .

काय करिते हे मन । साक्ष आपुला आपण ॥१॥

हित आपुले करावे । नातरी यमलोका जावे ॥२॥

काय वासना म्हणते । आपणांस साक्ष येते ॥३॥

मन आहे बारगळ । केल्या होतसे निवळ ॥४॥

सोडीना हे संसारिक । कांही पहावा विवेक ॥५॥

दास म्हणे सावधान । पदरी बाधिले मरण ॥६॥

३७५ .

नाना व्यथा उद्बवती । प्राणी अकस्मात जाती ॥१॥

मृत्यु बांधिला पदरी । होते आयुष्याचे भरी ॥२॥

काळ लागला सन्निधी । एक घडी लागो नदी ॥३॥

रामदास सांगे खूण । भेद जाणे विचक्षण ॥४॥

३७६ .

लक्ष्मी आहे रे चंचळ । हीस जातां नाही वेळ ॥१॥

सत्य मानावे उत्तर । देव नित्य निरंतर ॥२॥

नाना वैभव समस्त । येती जाती अकस्मात ॥३॥

म्हणे रामीरामदास । काय देहाचा विश्वास ॥४॥

३७७ .

पुरे पट्टणे वसती । एक वेळ ओस होती ॥१॥

तैसे वैभव हे सकळ । येतां जातां नाही वेळ ॥२॥

बहुत सृष्टीची रचना । होय जाय क्षणक्षणा ॥३॥

दास म्हणे सांगो किती । आले गेले चक्रवर्ती ॥४॥

३७८ .

सांजे ओसरतां सांत । वांया करावा आकांत ॥१॥

तैसी सखी जिवलगे । जाती एकमेकांमागे ॥२॥

चारी दिवस यात्रा भरे । सवेंचि मागुती ओसरे ॥३॥

पूर्ण होतां महोत्साव । फुटे अवघा समुदाव ॥४॥

बहु वर्‍हाडी मिळाले । जैसे आले तैसे गेले ॥५॥

एक येती एक जाती । नाना कौतुक पाहती ॥६॥

बंधु बहिण माता पिता । कन्यापुत्र आणि कांता ॥७॥

ऋणानुबंधाचे कारण । वाया शोक निष्कारण ॥८॥

एक बहुसाल जिती । एक वेळेवारी जाती ॥९॥

बहुसाल दासदासी । नाना पशु गाई म्हैसी ॥१०॥

धनधान्याचे संचित । कांही होत कांही जात ॥११॥

रामीरामदास म्हणे । संसारासी येणे जाणे ॥१२॥

३७९ .

कोणी पुत्र कामा नये । मित्र करितो उपाय ॥१॥

कैचे आपुले परावे । अवघे ऋणानुबंधे घ्यावे ॥२॥

जिवलगाचिये परी । मातेहूनि लोभ करी ॥३॥

आहे कोण जाणे कैंची । परि जिवलग जीवाची ॥४॥

जिवलग जीव घेती । त्यांसि परावी रक्षिती ॥५॥

रामीरामदास म्हणे । न कळे देवाचे करणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP