मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
करुणा प्रार्थना

विविध विषय - करुणा प्रार्थना

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३६१ .

जन्मोनियां तुज भजलो याचि बुद्धी । कळे वोळखण न सांगतां ॥१॥

न सांगतां जाणे अंतरीचा हेत । पुरवी आरत सर्व कांही ॥२॥

सर्व कांही जाणे चतुरांचा राणा । धन्य नारायणा लीला तुझी ॥३॥

तुझी लीला जाणे ऐसा कोण आहे । विरंचि तो राहे चाकाटला ॥४॥

चाकाटला मनु देवासी पहातां । दास म्हणे आतां हद्द जाली ॥५॥

३६२ .

जोडलासी बापा धरिलासी भावे । आतां तुज जीवे विसंबेना ॥१॥

विसंबेना देवा नित्य निरंतर । मेलिया विसर पडो नेदी ॥२॥

पदो नेदी वाचा रामनामेविण । देव हा सगुण रामदासी ॥३॥

३६३ .

माझे सर्व जावे देवाने रहावे । देवासी पहावे भक्तपणे ॥१॥

भक्तपणे मज देवचि जोडला । अभ्यास मोडला सर्व कांही ॥२॥

सर्व कांही जावो येक देव राहो । माझो अंतरभावो ऐसा आहे ॥३॥

असे अंतरभावो तैसाचि जाहला । दिवस पाहला कोण्ही येक ॥४॥

कोण्ही येक पुण्य जे सांचिले । दास म्हणे जाले समाधान ॥५॥

३६४ .

माझा देह तुज देखतां पडावा । आवडी हे जीवा फार आहे ॥१॥

फार होती परी पुरली पाहातां । चारी देह आतां हारपले ॥२॥

हारपले माझे सत्य चारी देह । आतां निःसंदेह देहातीत ॥३॥
देहातीत जाले देवा देखतांचि । चिंतिले आतांचि सिद्ध जाले ॥४॥

सिद्ध जाले माझे मनीचे कल्पिले । दास म्हणे आले प्रत्ययासी ॥५॥

३६५ .

तूंचि कर्ता आणि करविता । सर्व ठायी तुझी सत्ता ॥१॥

तुझ्या ठायी नसे अन्य । अनन्यभावे कैचे दैन्य ॥२॥

दास म्हणे साक्षीभूता । न विसंबावे शरणांगता ॥३॥

३६६ .

तुझे नाम आणि रुप । तूंचि अद्वैत तूं अरुप ॥१॥

धांव धांव भक्तकाजा । स्वतःसिद्ध महाराजा ॥२॥

तूंचि सबाह्य अंतरी । येणे जाणे कैचे दुरी ॥३॥

तूंचि आत्मा विश्वभावे । दास म्हणे न विसंबावे ॥४॥

३६७ .

येई रामराया भेटावे सखया । भवरोग लया पाववावा ॥१॥

व्यापक तूं खरा बोलती सर्वही । मज लाभ काई यांत जाला ॥२॥

उसामध्ये गुळ दुग्धी तूप असे । परिपाके कैसे उपयोगी ये ॥३॥

काष्ठी वन्हि से तिळामाजी तेल । प्रसंगिक वेळ नये कामा ॥४॥

निजलक्ष दासा द्यावे कृपादान । अनन्याची खूण चालवावी ॥५॥

३६८ .

उपेक्षा ही माझी नको करुं आतां । सांभाळी अनंता नारायणा ॥१॥

प्रपंच दुस्तर घोर हा संसार । मन अनिवार विषय लोभी ॥२॥

नावडे भजन पूजन परमार्थ । रात्रंदिवस स्वार्थ विषयाचा ॥३॥

परी तुझा दास म्हणवीत आहे । कृपादृष्टी पाहे दीनानाथ ॥४॥

दास म्हणे ब्रीद सांभाळी आपुले । माझे काय गेले लाज तुज ॥५॥

३६९ .

नलगे गायनकळा नलगे रंगमाळा । भक्तीचा जिव्हाळा मज दे रामा ॥१॥

नलगे मज प्रतिष्ठा कुतर्क करुं चेष्टा । आपुले चरणी निष्ठा मज दे रामा ॥२॥

नलगे मज संपत्ति बरवीया विपत्ती । नामविक्रयविकृती मज दे रामा ॥३॥

नलगे मजला सौभाग्य यौवनता आरोग्य । संसारी वैराग्य मज दे रामा ॥४॥

रामदास म्हणे इतुके तुज मागणे । देई उदारपणे दीननाथ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP