मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग.

विविध विषय - भक्तिपर अभंग.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


४२१ .

करी चापबाण माहेश्वरी । रुप हे सगुण राघवाचे ॥१॥

राघवाचे रुप निर्गुण जाणावे । सगुण स्वभावे नाशिवंत ॥२॥

नाशिवंत देव कदा म्हणूं नये । निर्गुणासी काय पाहशील ॥३॥

पाहतां निर्गुण देवांसी दुल्लभ । याचा होय लाभ पूर्वपुण्ये ॥४॥

पूर्वपुण्ये लाभ ब्रह्मादिकां जाला । कैवारी जोडला रामचंद्र ॥५॥

रामचंद्र रुप नाम हे मायिक । बोलिला विवेक वेदशास्त्री ॥६॥

वेदशास्त्री भक्ति राघवाची सार । तेणे पैलपार पाविजेतो ॥७॥

पाविजेतो पार आत्मनिवेदने । भक्तीची लक्षणे नवविधा ॥८॥

नवविधा भक्ती करितां तरले । जीव उद्धरले नेणो किती ॥९॥

नेणोनियां देव मायिक भजतां । मुक्ति सायुज्यता अंतरली ॥१०॥

अंतरली भक्ति मुक्तिमागे धांवे । राघवाच्या नांवे निरंतर ॥११॥

निरंतर देव अंतरो नेदावा । विवेक पहावा सज्जनाचा ॥१२॥

सज्जनसंगती चुके अधोगति । राम सीतापतीचेनि नामे ॥१३॥

नाम ज्याचे घ्यावे त्यासी ओळखावे । देवासी धुंडावे आदरेसी ॥१४॥

आदरेसी जपे रामनाम वाणी । स्वये शूळपाणी महादेव ॥१५॥

महादेवे गुरुगीता निरोपिली । तेथे मन घाली आलया रे ॥१६॥

आलया संसारी रामनाम तारी । दुजे पृथ्वीवरी आढळेना ॥१७॥

आढळेना परी संतसंग धरी । तेणे तूं अंतरी निवशील ॥१८॥

निवाले अंतर रामसी भजतां । दुजे कांही आंता आढळेना ॥१९॥

आढळेना जया संतांची संगती । तया अधोगती गर्भवास ॥२०॥

गर्भवास माझे राम चुकवील । मज सोडवील अनाथासी ॥२१॥

अनाथांचा नाथ पतितपावन । मज सोडवील अनाथासी ॥२२॥

दाखविती वाट संत निजधामी । माझे मन रामी विश्वासले ॥२३॥

विश्वासले परी रामासी नेणवे । तो राम जाणवे संतसंगे ॥२४॥

संगसंग करी निःसंग होईजे । मग तो जाणीजे राम केवी ॥२५॥

रामासी मिळतां संतांचे मिळणी । मग दुजेपणी उरी नाही ॥२६॥

उरी या रामाची जन्मोजन्मी असो । मन हे विश्वासो रामपायी ॥२७॥

रामपायी मन होतसे उन्मन । तेथे भिन्नभिन्न ऐक्यरुप ॥२८॥

ऐक्यरुप ज्ञान ते मज नावडे । गाईन पवाडे राघवाचे ॥२९॥

राघवासी गुण नाही तो निर्गुण । ठायी पडे खूण संतसंगे ॥३०॥

संतसंगतीचा निर्गुण पवाड । मज वाटे गोड रामकथा ॥३१॥

कथा निरुपण श्रवण मनन । होय समाधान संतसंगे ॥३२॥

संगसंगे बोध होय निर्गुणाचा । मोडे सगुणाचा भक्तिभाव ॥३३॥

भक्तिभावे करी निर्गुण पावावे । मग काय व्हावे सांग बापा ॥३४॥

बापमाये राम विश्वास आधार । भक्तां निरंतर सांभाळितो ॥३५॥

सांभाळितो काय प्रालब्ध वेगळे । होणार न टळे ब्रह्मादिकां ॥३६॥

ब्रह्मादिकां मान्य तो नव्हे सामान्य । असावे अनन्य सगुणासी ॥३७॥

सगुणासी उरी उरेना कल्पांती । म्हणोनी सांगती संतजन ॥३८॥

संतजन ज्ञानी पूर्ण समाधानी । तेही जपध्यानी सर्व काळ ॥३९॥

सर्वकाळ ध्यान करिती सज्जन । परी ते निर्गुण ध्यान त्यांचे ॥४०॥

ध्यानी आकळेना मानसी कळेना । तयासी कल्पना केंवी धरी ॥४१॥

धरिला विश्वास साधूचे वचनी । अवस्था उन्मनी तेणे गुणे ॥४२॥

गुणेंचि निर्गुण कळे सर्व खुण । म्हणोनि सगुण देव धरी ॥४३॥

धरावा सगुण निर्गुणाकारणे । तयाविण येणे चाड नाही ॥४४॥

चाड नाही ऐसे कासया म्हणावे । सगुणे पावावे निर्गुणासी ॥४५॥

निर्गुणासी पावे सगुणाकरितां । सगुण पाहतां तेथे नाही ॥४६॥

नाही कां म्हणसी सद्गुरु सगुण । आणि निरुपण बहुविधा ॥४७॥

बहुविध रुप नव्हे सद्गुरुचे । निर्गुण ठायीचे जाण बापा ॥४८॥

जाण बापा आतां तूं तरी सगुण जालासी शरण सद्गुरुसी ॥४९॥

सद्गुरुसी गेला जो कोणी शरण । तयासी सगुण कोण म्हणे ॥५०॥

म्हणशील काय सगुणावांचोनी । सर्वही करणी सगुणाची ॥५१॥

सगुणाची नव्हे निर्गुणाची सत्ता । निर्गुणाकरितां सर्व जाले ॥५२॥

सर्व जाले जेव्हां निर्गुणाकरितां । तेव्हा निर्गुणता सगुणासी ॥५३॥

निर्गुण हे सर्व करुनी वेगळा । ऐसी आहे लीळा निर्गुणाची ॥५४॥

निर्गुणाची लीळा वांझेची कुमरी । बोलतां चतुरी मानिजेना ॥५५॥

मानिजेना तरी सृष्टीसी रचिले । सर्व कोण केले तयाविणे ॥५६॥

तयाविणे दुजे काय सत्य आहे । अनुभवे पाहे आलया रे ॥५७॥

आपुला विचार निर्गुणी सर्वदा । निर्गुणासी कदा विसंभेना ॥५८॥

विसंभणे घडे सत्संग नसतां । संग विचारितां सगुण की ॥५९॥

सगुणाचा संग ज्ञानियांसी नाही । ज्ञानिया विदेही पुरातन ॥६०॥

पुरातन देही तरीच विदेही । देहाविण नाही विदेहता ॥६१॥

विदेहता बोली स्वभावे लागली । निर्गुणाची खोली कोण जाणे ॥६२॥

जाणे सुखदुःख जाणे गुणागुण । तयासी निर्गुण बोलवेना ॥६३॥

बोलवेना परी निर्गुण कळावे । विवेकी मिळावे निर्गुणासी ॥६४॥

निर्गुणासी गुण मिळतां संकट । व्यर्थ खटपट कां करिसी ॥६५॥

कां करिसी भक्ति सगुण देवाची । तुज निर्गुणाची शुद्धि नाही ॥६६॥

शुद्धि नाही झाली जया आनंदाची । तया विवादाची उरी आहे ॥६७॥

उरी नाही कदा निर्गुणी भजतां । निर्गुण सर्वथा सार आहे ॥६८॥

सार ते आकार भक्तिचा निर्धार । भक्ति पूर्वापार सगुणाची ॥६९॥

सगुणाची भक्ति अज्ञाने करावी । सज्ञाने करावी निर्गुणाची ॥७०॥

निर्गुणाची भक्ति या नांव अभक्ति । अव्यक्तासी व्यक्ति लावूं नये ॥७१॥

लावूं नये भाव सगुण देवाशी । व्यर्थ पाषाणासी काय काज ॥७२॥

काज कारण हा विवेक पाहिजे । भावार्थे लाहिजे सर्व कांही ॥७३॥

सर्व कांही नाही जैसे मृगजळ । वांया खळखळ कां करिशी ॥७४॥

कां करिसी सर्व देहाचा संबंध । जरी जाला बोध निर्गुणाचा ॥७५॥

निर्गुणाचा बोध संसार निरसी । तेथे अज्ञानासी रीग नाही ॥७६॥

रीग नाही जया भावार्थभजनी । तया हृदयशून्यी शून्याकार ॥७७॥

शून्याकार होय विवेके वासना । मग समाधान काय उणे ॥७८॥

उणे जाले दुणे निर्गुणाच्या गुणे । अभाविकां कोणे उद्धरावे ॥७९॥

उद्धरावे एका सज्जनसंगती । ऐसे वेदश्रुती बोलताती ॥८०॥

बोलताती परी नाही आठवण । म्हणोनि सगुण आवडेना ॥८१॥

आवडेना मिथ्या माईक भजन । असत्यासी मन विश्वासेना ॥८२॥

विश्वासेना मन सगुणासी जरी । तयासी कैवारी देव कैंचा ॥८३॥

कैंचा देव भक्त कल्पना आपुली । ते सर्व नाथिली ज्ञानियासी ॥८४॥

ज्ञानियासी देव दुरी अंतराला । संदेह पडिला अंतकाळी ॥८५॥

अंतकाळ कैंचा अनंत ठाईंचा । संदेह देहाचा मिथ्याभूत ॥८६॥

मिथ्या शब्दज्ञाने माया ओसरेना । अभक्त तरेना मायापुरी ॥८७॥

माया मोहपुर दुस्तर संसार । अद्वैतविचार जंव नाही ॥८८॥

जंव नाही भावे श्रीहरी अर्चिला । तंव नव्हे भला ज्ञानगर्वी ॥८९॥

ज्ञानगर्वी नव्हे ज्ञानियां सुल्लभ । जयाचेनि लाभ स्वरुपाचा ॥९०॥

स्वरुप रामाचे मनी आठवावे । नाम उच्चारावे रात्रंदिस ॥९१॥

दिस ना रजनी मन ना उन्मनी । ज्ञाता जनी वनी सारिखाची ॥९२॥

सारिखाचि भाव तया भेटे देव । येर सर्व वाव शब्दज्ञान ॥९३॥

ज्ञानेविण सर्व व्यर्थचि जाणावे । जंव नाही ठावे आत्मज्ञान ॥९४॥

ज्ञानदाता हरी मनी दृढ धरी । तोचि यमपुरी चुकवील ॥९५॥

चुकवील ज्ञान सर्वही अज्ञान । पाविजे विज्ञान संतसंगे ॥९६॥

संतसंगे धरी सगुणभजन । स्वधर्म साधन क्रिया कर्म ॥९७॥

क्रिया कर्म कैचे ज्ञानियांचे आंगी । मुक्त ज्ञानी जगी विचारितां ॥९८॥

विचारितां देही तो कीजे सर्वही । क्रिया कर्म कांही सांडू नये ॥९९॥

सांडूं नये भक्ती स्वधर्म विरक्ति । ब्रह्मज्ञानप्राप्ती रामदासी ॥१००॥

रामदास म्हणे रामउपासकां । भक्ती सांडूं नका राघवाची ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP