मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


६४१.
आम्ही नेणो दुजेपण । लोक भाविती आपण ॥१॥
माझे आहे तेंहि माझे । आणि तुझे तेंहि माझे ॥२॥
स्वतः आपण जेविले । जन सज्जनचि धाले ॥३॥
रामदास म्हणे खुळे । केले स्वार्थाने आंधळे ॥४॥

६४२.
आम्ही भगवंताची भोळी । बाह्य अंतरी मोकळी ॥१॥
क्रोध आला तो राहेना । उणे उत्तर साहेना ॥२॥
आम्हां बोलो शके कोण । बोटासाठी वेचूं प्राण ॥३॥
दास म्हणे नीचोत्तरे । दुःख आहे जन्मवरी ॥४॥

६४३.
आम्ही भगवंताची वेडी । नेणो बोलाची परवडी ॥१॥
आम्हां घ्यावे ऐसे कळे । फिरो द्यावे ते नाकळे ॥२॥
घ्यावे एकाचे बुडवावे । येथे वाईटपण द्यावे ॥३॥
दास म्हणे नीचोत्तरी । दुःख आहे जन्मवरी ॥४॥

६४४.
आळसे पिंडाचे पाळण । परी अवघे अप्रमाण ॥१॥
देह केले तैसे होते । वंचील जे करीना ते ॥२॥
शक्ति आहे तो करावे । विश्व कीर्तने भरावे ॥३॥
पुण्यवंत तो साक्षेपी । आळशी लोकी महापापी ॥४॥
दास म्हणे सांगो किती । लोक पाठीच लागती ॥५॥

६४५.
सलगीचेनि जाणेना । पुढे कोणासी मानेना ॥१॥
आळशी निकामी माणूस । पुढे होतो कासावीस ॥२॥
उगेचि नटते मुरडते । कोण पुसते तयाते ॥३॥
आपणांस अवकळिले । ज्याचे त्यास कळो आले ॥४॥
आधी कष्टावे रबडावे । कार्य बहुतांचे करावे ॥५॥
बहुतांसि मिळोनि जाणे । त्यास मानिती शाहणे ॥६॥
बहुतां मानेल तो ल्याख । वरकड जाणावे नल्याख ॥७॥
गुण उदंड निवती । अवगुण वायां जाती ॥८॥
आहे प्रगट उपाय । दास म्हणे सांगो काय ॥९॥

६४६.
कष्ट करितां मानी वीट । तरि तो कळेल शेवट ॥१॥
कष्टे उदंड आटोपावे । मग पुढे सुखे व्हावे ॥२॥
सदा पराधीन वेडे । काय निवेल बापुडे ॥३॥
शाहणे उदंड कष्टती । वडील उपकारे दाटती ॥४॥
बहुत राखिला लौकिक । त्याचे जिणे अलौकिक ॥५॥
ज्यास त्यास पाहिजे तो । जनी वाट्यांस न ये तो ॥६॥
मनोगत जाणे सूत्र । जेथे तेथे जगमित्र ॥७॥
न सांगतां काम करी । ज्ञाने उदंड विवरी ॥८॥
स्तुति कोणाची न करी । प्राणिमात्र लोभ करी ॥९॥
कदा विश्वास मोडीना । कोणी माणूस तोडीना ॥१०॥
जनी बहुतचि साहतो । कीर्तिरुपेचि राहतो ॥११॥
दास म्हणे नव्हे दुःखी । आपण सुखी लोक सुखी ॥१२॥

६४७.
कपटी कुटिळ आळशी । घरी मिळेना खायासी ॥१॥
उगाच धरितेसी ताठा । पापी दरिद्री करंटा ॥२॥
पोरे म्हणती काय खावे । स्त्री म्हणे कोठे जावे ॥३॥
रामीरामदास म्हणे । अवघी हांसती पिसुणे ॥४॥

६४८.
सुंदर आळशाची बाईल । पुढे काय रे खाईल ॥१॥
ज्याचे वडील आळशी । कोणे शिकवावे तयासी ॥२॥
घरी खाया ना जेवाया । नाही लेया ना नेसाया ॥३॥
यत्नी उदंडचि खाती । आळशी उपवासी मरती ॥४॥
दास म्हणे सांगो काय । हा तो प्रगट उपाय ॥५॥

६४९.
स्वार्थ केला जन्मवरी । लोभे राहिला श्रीहरि ॥१॥
धनधान्ये अहर्निशी । गाई म्हैशी घोडे दासी ॥२॥
शेतवाडे घर ठाव । राणी जीवी धरी हांव ॥३॥
मातापिता बहिण भ्राता । कन्या पुत्र आणि कांता ॥४॥
व्याही जांवई आपुले । इष्टमित्र सुखी केले ॥५॥
दास म्हणे रे शेवटी । प्राप्त जाली मसणवटी ॥६॥

६५०.
जन्मवरी शीण केला । अंतःकाळी व्यर्थ गेला ॥१॥
काया स्मशानी घातली । कन्यापुत्र मुरडली ॥२॥
घरवाडा तो राहिला । प्राणी जातसे एकला ॥३॥
धनधान्य ते राहिले । प्राणी चरफडीत गेले ॥४॥
इष्टमित्र आणि सांगाती । आपुलाल्या घरा जाती ॥५॥
दास म्हणे प्राणी मेले । कांही पुण्य नाही केले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP