मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
निंदक

विविध विषय - निंदक

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


१६५

संसार करितां म्हणती हा दोषी । न करितां आळसी पोटपोसा ॥१॥

ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥२॥

भक्ति करुं जातां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥३॥

आचारें असतां म्हणती नाक धरी । येर अनाचारी पापरुपी ॥४॥

सत्संग धरितां म्हणती हा उपदेसी । येर अभाग्यासी ज्ञान कैचें ॥५॥

अभाग्यासी म्हणती ठायींचा करंटा । समर्थासी ताठा लावीतसे ॥६॥

बहु बोलों जातां म्हणती हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥७॥

भेटीस नवजातां म्हणती हा निष्ठुर । जातां म्हणती घर बुडविलें ॥८॥

धर्म न करितां म्हणती हा सांचितो । करितां काढीतो दिवाळें कीं ॥९॥

लग्न करुं जातां म्हणती हा मातला । न करितां झाला नपुंसक ॥१०॥

निपुत्रिका म्हणती पाहा हा चांडाळ । पातकाचें फळ पोरवडा ॥११॥

मुखें नाम घेतां करिती टवाळी । नेघतां ढवाळी सर्वकाळ ॥१२॥

दिसां मरो नये रात्रीं मरों नये । कदां सरों नये मागांपुढां ॥१३॥

मर्यादा धरीतां लाजाळु चोखट । न धरितां धीट म्हणती लोक ॥१४॥

लोक जैसा ओक धरितां धरेना । अभक्ति सरेना अंतरींची ॥१५॥

दास ह्मणे मज तुझाचि आधार । दुस्तर संसार तरीजेल ॥१६॥

१६६

ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं । देवा तुझी भेटि केंवि घडे ॥१॥

भक्तांसी निंदिती अभक्त दुर्जन । दुर्जनासी जन निंदिताती ॥२॥

भिन्न उपासना भिन्न संप्रदाव । एकमेकां सर्व निंदिताती ॥३॥

क्रियेसी निंदिती क्रियाभ्रष्ट ज्ञानी । क्रियाभ्रष्टा जनीं निंदिताती ॥४॥

निस्पृहा निंदिती संसारिक जन । संसारिका जन निंदिताती ॥५॥

पंडितां पंडितां विवाद लागला । पुराणिकां जाला कलह थोर ॥६॥

वैदिकां वैदिक भांडती निकुरें । योगी परस्परें भांडताती ॥७॥

प्रचंचीं परमार्थी भांडण तुटेना । लोभ हा सुटेना तेणें गुणें ॥८॥

स्मार्त ते वैष्णव शाक्त आणि शैव । निंदिताती सर्व परस्परें ॥९॥

स्वजाति विजाति भांडण लागलें । दास म्हणे केलें अभिमानें ॥१०॥

१६७

स्नान नाहीं संध्या नाहीं । देव नाहीं धर्म नाहीं ॥१॥

उगाचि बैसोनियां घरीं । सज्जानाची निंदा करी ॥२॥

तीर्थ नाहीं क्षेत्र नाहीं । दान नाहीं पुण्य नाहीं ॥३॥

वेद नाहीं शास्त्र नाहीं । मंत्र नाहीं गायत्री नाहीं ॥४॥

पोटीं नाहीं निस्पृहता । नाहीं विद्येनें पुरता ॥५॥

रामदास सांगे खुणा । पापी सर्वांपरी उणा ॥६॥

१६८

उदंड सेना रायापाशीं । न ये कुत्र्याच्या मनासी ॥१॥

रागें रागें मागें मागें । आवरेना भुंको लागें ॥२॥

मारुं जातां केंकाटतें । अधिक भुंकोंचि लागतें ॥३॥

साधुसंत महानुभाव । मनामाजीं धरी डाव ॥४॥

नेणें रंक अथवा राव । सदा भुंकणें स्वभाव ॥५॥

दास म्हणे श्वानापरी । दुर्जन भुंक भुंक करी ॥६॥

१६९

चोरा चांदणें न साहे । सदा अंधकारीं राहे ॥१॥

तैसा अभक्त दुर्जन । नेणे देवाचें भजन ॥२॥

रविबिंब प्रगटलें । दिवाभीत तें पळालें ॥३॥

राजहंसांचें पंगती । तेथें वायस कोठें येती ॥४॥

सभा देखोनि अनेक । पळोनि गेलें निर्नासिक ॥५॥

रामीरामदास म्हणे । महा यागीं कैसें सुणें ॥६॥

१७०

एक म्हणती कां पळावें । एक म्हणती कां बैसावें ॥१॥

लोक बोलती मत्सरें । काय मानावें तें खरें ॥२॥

एक म्हणती कां सांडावें । एक म्हणती कां मांडावें ॥३॥

दास म्हणे हें तत्वतां । जाण अवघी बाष्कळता ॥४॥

१७१

स्वयें आचरावें पाप । विशेष निंदा वज्रलेप ॥१॥

निंदा मत्सर टवाळी । मायबापांसी ढवाळी ॥२॥

अनाचारी परद्वारी । मना आलें तेंचि करी ॥३॥

रामीरामदास म्हणे । ऐसें जीतचि मरणें ॥४॥

१७२

डुकराचे घरीं डुकर पाहुणी । गाढवी मेहूणी गाढवाची ॥१॥

भुंकती गाढव कुंकाति डुकर । सुख परस्परें वाटतसे ॥२॥

खरांचा गोंधळ लाथांचा सुकाळ । डुकरीं कोल्हाळ मांडियेला ॥३॥

डुकराचें नाक कुतर्‍याचा कान । दास देतो मान निंदकासी ॥४॥

१७३

अवघा डोंगर जळाला । आहाळोनि काळा जाला ॥१॥

तरी तेथें बहुरंग । तैसें अविद्येचें जग ॥२॥

दुर्जनांसीं बरें केलें । नानाप्रकारीं रक्षिलें ॥३॥

रामीरामदास म्हणे । जीवें ओंवाळिलें सुणें ॥४॥

१७४

श्वानाचिया पुत्रें कोल्हाळ मांडिला । कलह लागला एकसरां ॥१॥

भुंकतां भुंकतां वासिताति तोंडें । वरतीं थोबाडें करुनियां ॥२॥

एक तें हांसती एक तें रडती । दास म्हणे गती निंदकाची ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP