मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नवविधा भक्ति.

विविध विषय - नवविधा भक्ति.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५१० .

पृथ्वी आप तेज वायु ते आकाश । ऐसे सर्व दृश्य नाशिवंत ॥१॥

नाशिवंत सृष्टी पाहे ज्ञानदृष्टी । सांगतो मी गोष्टी शास्त्रमते ॥२॥

शास्त्रमती सृष्टिप्रळय बोलिला । विचारे पाहिला संतजनी ॥३॥

संतजनी नित्यानित्य विचारुनी । सत्य वोळखोनि मुखी जाले ॥४॥

सुखी जाले संत शोधितां अनंत । कल्पनेचा प्रांत परब्रह्म ॥५॥

परब्रह्म संतसंगे ओळखावे । बोधे विवरावे सस्वरुपी ॥६॥

सस्वरुपी पंचभूते नासिवंत । देव तो शाश्वत सत्य जाण ॥७॥

सत्य मिथ्या ऐसा करावा विचार । सत्याचा निर्धार निःसंदेह ॥८॥

निःसंदेह भक्ति केल्या होय मुक्ति । दास म्हणे युक्ति सावधान ॥९॥

सावधान आता हे वृत्ति करावी । भक्ति वोळखावी नवविधा ॥१०॥

नवविधा भक्ति सांगाईन आतां । श्रवणी दुश्चिता राहो नको ॥११॥

राहो नको कदा श्रवणावांचुनी । सर्वकाळ मनी विचारणा ॥१२॥

विचारणा करी श्रवण मनन । ध्यासे समाधान पाविजेते ॥१३॥

पाविजेते सर्व केलिया श्रवण । भक्तिचे लक्षण हेंचि बापा ॥१४॥

हेचि बापा भक्ति प्रथम जाणावी । दुजी ओळखावी हरीकथा ॥१५॥

हरीकथा भक्ति थोर कलियुगी । कीर्तनाचे रंगी देव आहे ॥१६॥

देव आहे सदा तिष्ठत कीर्तनी । भक्ति श्रेष्ठ जनी हरीकथा ॥१७॥

हरीकथा भक्ति श्रवण कीर्तन । येणे बहुजन उद्धरती ॥१८॥

उद्धरले श्रोते वक्ते नेणो किती । दृढ धरा चित्ती हरीकथा ॥१९॥

कथा निरुपण श्रवण करावे । येणे उद्धरावे संसारी ॥२०॥

संसारी सुटीजे केल्याने श्रवण । कदा विस्मरण पडो नये ॥२१॥

पडो नये भ्रांति नामस्मरणाची । तृतीये भक्तीची ओळखण ॥२२॥

ओळखण होय नाम उच्चारितां । उद्धर बहुतां रामनामे ॥२३॥

रामनामे गति प्राणियांसी अंती । सांगे उमापती महादेव ॥२४॥

महादेव स्वये निवाला अंतरी । म्हणोनियां धरी रामनाम ॥२५॥

रामनामे मुक्त क्षेत्र वाराणसी । शिव उपदेशी रामनाम ॥२६॥

रामनाम वाणी त्या नाही जाचणी । माने बहु प्राणी उद्धरले ॥२७॥

उद्धरले संत सज्जन शोधीतां । हेचि जाण आता चौथी भक्ति ॥२८॥

भक्ति सज्जनाची हे वाट मुक्तीची । येथे संदेहाची उरी नाही ॥२९॥

उरी नाही दोषा सज्जन सेवितां । मुक्ति सायोज्यत पाठी लागे ॥३०॥

पाठी लागे मुक्ति संतांचे संगती । उद्धरले किती सांगो आतां ॥३१॥

सांगो आतां भक्ति पांचवी अर्चन । ते पूजाविधान विधीयुक्त ॥३२॥

विधीयुक्त पूजा देवाब्राह्मणाची । संतसज्जनाची सर्वकाळ ॥३३॥

सर्वकाळ गोडी अर्चनी आवडी । येणे होय जोडी ईश्वराची ॥३४॥

ईश्वराची जोडी अर्चने होतसे । बहु जन ऐसे उद्धरले ॥३५॥

उद्धरले देवां ब्राह्मणां वंदितां । साहावी ते आतां भक्ति जाण ॥३६॥

भक्ति जाण सार सर्वां नमस्कार । घाली अधिकार पाहोनियां ॥३७॥

पाहोनियां सर्व आचरतां सुख । मूर्खपण दुःख होत आहे ॥३८॥

आहे आतां भक्ति सातवी ते कैसी । सेवा सर्वस्वेसी दास्य जाण ॥३९॥

दास्य करुनियां देवासी पावले । ऐसे उद्धरले नेणो किती ॥४०॥

नेणो किती जन या रिती तरले । दास्य उतरले भवसिंधु ॥४१॥

भवसिंधु नाही हरीच्या दासांसी । दासां हृषीकेशी उपेक्षीना ॥४२॥

उपेक्षीना देव हे सत्यवचन । अष्टमी ते जाण सख्य भक्ति ॥४३॥

सख्यत्व देवाचे भाग्येवीण कैंचे । सांगावे जीवीचे देवापासी ॥४४॥

देवापासी सुखदुःख ते सांगावे । कैवारी करावे ईश्वरासी ॥४५॥

ईश्वरी टाकितां संसारीचा भार । मग हा संसार सुखरुप ॥४६॥

सुखरुप भक्ति आठवी बोलिली । ऐसी गती जाली बहुतांसी ॥४७॥

बहुतांचे भक्ति पावे नारायण । नववे लक्षण सांगईन ॥४८॥

सांगईन भक्ति सर्वांमधे सार । पावती साचार मुक्ति जेणे ॥४९॥

मुक्ति जेणे होय ते भक्ति नवमी । जेथे नाना ऊर्मी मावळती ॥५०॥

मावळे अज्ञान होय शुद्ध ज्ञान । आत्मनिवेदन भक्ति सार ॥५१॥

भक्ति सार आहे जेथे द्वैत राहे । संतसंगे लाहे निज भक्ति ॥५२॥

निजभक्ति जेथे विभक्ति नाढळे । ऐक्यरुप कळे ज्ञान होतां ॥५३॥

ज्ञान होतां तुटे संसारबंधन । नाही समाधान ज्ञानेवीण ॥५४॥

ज्ञानेवीण सीण सर्वथा नाथिला । नाही ओळखिला साच देव ॥५५॥

साच देव कळे संतांचे संगती । चुके अधोगती गर्भवास ॥५६॥

गर्भवास चुके यातना यमाची । जरी शाश्वताची सोय लागे ॥५७॥

सोय लागे मनी तोचि धन्य जगी । आत्मनिवेदनी तदाकार ॥५८॥

तदाकार होणे आत्मनिवेदने । मग येणे जाणे निरसले ॥५९॥

निरसले दृश्य विवेके पाहातां । स्वरुपी राहातां स्वरुपची ॥६०॥

स्वरुपची असे येर सर्व नासे । ऐसे हे विश्वासे गुरुमुखे ॥६१॥

गुरुवाक्ये ज्ञान होय समाधान । आत्मनिवेदन याचे नाव ॥६२॥

नांव रुप धरी ते माया सुंदरी । तये अभ्यंतरी सस्वरुप ॥६३॥

स्वरुपाची प्राप्ती संताचे संगती । बोलिली हे भक्ति नवविधा ॥६४॥

नवविधा भक्ति केल्या होय मुक्ति । चळेना कल्पांती सायोज्यता ॥६५॥

सायोज्यता मुक्ति चिरंजीव आहे । येरी सर्व पाहे नासिवंत ॥६६॥

नासिवंत मुक्ति जाण चतुर्विधा । तया अनुवादा चित्त देई ॥६७॥

चित्त देई येकी मुक्ति सलोकता । दुजी समीपता सत्य जाण ॥६८॥

सत्य जाण मुक्ति तिजी स्वरुपता । चौथी सायोज्यता सांगईन ॥६९॥

मुक्ति जाण बापा सर्व नासिवंत । मांडतां कल्पांत भस्म होती ॥७०॥

भस्म होती मुक्ती सर्व कोणे परी । तेहि अवधारी सांगईन ॥७१॥

सांगईन बापा तेथे चित्त द्यावे । मग तूं स्वभावे बुझसील ॥७२॥

बुझसील आतां मुक्ति सलोकता । वैकुंठी तत्त्वता ठाव होय ॥७३॥

ठाव हा स्वलोकी तेचि मुक्ति येकी । दुजी समीप की समीपता ॥७४॥

समीपता मुक्ति समीप असावे । स्वरुपता व्हावे स्वरुपचि ॥७५॥

स्वरुप स्वगुण होईजे आपण । श्रीवत्सलांछन तेथे नाही ॥७६॥

नाही मुख्य रमा ते चि स्वरुपता । आतां सायोज्यता सांगईन ॥७७॥

सायोज्यता मुक्ति ज्ञानाचेनि द्वारे । आपण निर्धारे सस्वरुप ॥७८॥

सस्वरुपी नाही पूर्वीचे बंधन । तेथे मुक्ति कोण कासयासी ॥७९॥

कासयासी मुक्ति बंधनावांचूनि । मुक्तिदाता जनी आपणची ॥८०॥

आपणचि स्वये अचळ अढळ । निर्मळ निश्चळ आपणचि ॥८१॥

आपणचि होणे मुक्ति द्यावी कोणे । मुक्ति येणे गुणे नासिवंत ॥८२॥

नासिवंत मुक्ति सज्जन जाणती । स्वरुपाची स्थिती अनिर्वाच्य ॥८३॥

अनिर्वाच्य ब्रह्मी मुक्ति नासिवंता । प्रळयहि आतां सांगईन ॥८४॥

सांगईन आतां सृष्टीचा संहार । तेणे तूं निर्धार पावसील ॥८५॥

पावसील खूण निखळ निर्गुण । तेंचि निरुपण प्रळयाचे ॥८६॥

प्रळयाचे काळी शत संवत्सर । अनावृष्टि थोर ओढवेल ॥८७॥

ओढवे प्रळय सूर्य बारा कळी । तेणे होय होळी वसुंधरा ॥८८॥

वसुंधरा बुडे प्रळय उदकी । जाले येकायेकी जळमय ॥८९॥

जळमय जाले ते तेजे सोखीले । तेज झडपीले समीराने ॥९०॥

समीर आकाशी सर्व वितुळला । त्याचा नाश केला तमोगुणे ॥९१॥

तमोगुणा रज ग्रासुनियां जाय । रजोगुणा खाय सत्वगुण ॥९२॥

सत्वगुण माया माये मूळमाया । गुणसाम्य तिया निर्दाळील ॥९३॥

निर्दाळील गुणसाम्य ते निर्गुणी । ऐसी संहारणी विवेकाची ॥९४॥

विवेके पाहातां सर्व सृष्टी नासे । तेथे लोक कैसे वांचतील ॥९५॥

वांचतीना लोक ते महा प्रळई । तेथे मुक्ती काई साच होती ॥९६॥

साच होती मुक्ती हे कई घडावे । सर्व बिघडावे प्रळयाने ॥९७॥

प्रळयाचे अंती देवची नासती । तेथे कैंच्या मुक्ती राहातील ॥९८॥

राहातील ज्ञानी आत्मनिवेदनी । पूर्ण समाधानी सस्वरुपी ॥९९॥

सस्वरुपी ऐक्यरुप चिरंजीवी । जाणे अनुभवी अनुभवे ॥१००॥

अनुभवी ज्ञानी तेचि समाधानी । आत्मनिवेदनी रामदास ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP