मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
सौरी

भारूड - सौरी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९९४.
उगिच राहे रांडे शब्द चाळ भांडे ॥ध्रु०॥
काजळ कुंकू लेवूनि रांडे किती करिसी नखरा ।
भिल्लिण होऊनि रुद्र नेला ठकविले शंकरा ॥१॥
साही त्रिकुट अठरा रांडे तेही वेडावली ।
चौघीजणी वाद केला तेही धुंडावली ॥२॥
दुर्वासासी गर्व केला तेथे जालिस घोडी ।
कोठे म्हणतां लाज नाही डांगवी बांदोडी ॥३॥
शुकापाशी जाउनि रांडे काय उजेड केला ।
मारुनियां बाण तुझा मोहरा फिरविला ॥४॥
रामदासे पर्णुनि तुला लग्न टाकुनि दिले ।
साधुसंत जाणुनियां फार फजीत केले ॥५॥

९९५.
निरंजना सुख होइल मना ॥ध्रु०॥
सकर शेला पिवळी चोळी नाकी मोती साजे ।
जगामध्ये नागवी हिंडे घरामध्ये लाजे ॥१॥
काजळ कुंकू लावुनि गेली केतकीचे वना ।
सोळा जण लेंकुरे व्याली दादला नये मना ॥२॥
घर नाही दार नाही रागामध्ये हिंडे ।
जेव्हां तेंव्हा निजपतीला जगांत केले भंडे ॥३॥
टाकुनि लुगडी दाउनि उघडी रामदास म्हणे ।
जन्मोजन्मी येणे जाणे आम्हां नाही जाण ॥४॥

९९६.
तुझा धणी जीवे गे निजबोधरुका येवो गे ॥ध्रु०॥
देहभावाचे व्यसन गेले । वासना कापिली पेळू ।
संते सौरी ओढुनि नेली । मोडिला संसार खेळू ॥१॥
भक्तिधवला टाचघोळ जाला । वैराग्य बाणली चोळी ।
ज्ञान काजळ घालुनि डोळां । रंगणी उभी ठेली ॥२॥
संसार ऐसे चिरगुटाचे गोळे । लटिक्याच घातल्या पाखा ।
नाचतां रंगणी वेगळ्या दिसती । सेखिं त्या उघड्या काखा ॥३॥
अनिर्वाच्य शब्द निःशंक बोले । स्वानंदे नाचति जाली ।
स्वानुभवे धाक तोडितां । भवरी खंडुनि गेली ॥४॥
रामीरामदासा सौरिया सौरसे । भुमिका जाली वाड ।
डौराचेनि नादे नाचतां । उद्बोध पुरले जीविंचे कोड ॥५॥

९९७.
कोठे ग बाई तुझा दारवंटा । बग की गे नव्या भोंकावाटा ।
दिसनास के गे बाई मला । कां गे गडद पडली तुला ।
इकडे कधी आले नाही । तरी कां गे पुसतीस बाई ।
कळले तरी सांगावे ना । दिवसराती जागावे ना ।
बाई मला झोंप येती । तर तुला बाई तेच खाती ।
घेउनि जाय जशी तशी । येवढी मोठी कशी माशी ।
तुझी वाट दाव की ग । लहान होउनि लव की ग ।
ते तर मला होतां न ये । तर तुला येतां न ये ।
कैशा आहेत तुझ्या वाटा । मोड की ग देहताठा ।
अगड बगड तुझी बोली । समुद्राहूनि उंच खोली ।
मला वाटते कठीण बहु । विचारितां दगड मऊ ।
सांगनास तरी बला गेली । तूंच कष्टी होशिल मुली ।
दासा बुच्ची पुसूं आली । जशी आली तशी गेली ॥१॥

९९८.
आगे बाई । पाप थोर की पुण्य थोर । दोन्ही बाई बरोच बर ।
पाप म्हणजे स्वर्ग पुण्य त्यावरी दिसे । फिरुन त्याच्याच उरावरी बसे ।
आगे बाई ॥
पापपुण्य दोन्ही झगडती । त्या दोहींसबी योगीच रगडती ।
योग्याचा जीव तरी कसला ग असतो । आग बाई ।
त्याला मुळीच जीव नसतो । खाते पिते हागते मुतते ।
काय गे सांगती । मृगजळाचे पाणी देखूनि मृगचि हागति ।
तेभी मानुस आम्ही भी मानुस । आम्हास भाव तसला असावा ना ।
आगे रांडे गुरुस जाऊन पुसावा ना । आग बाई ।
गुरु तरी कोणता करावा । भाव बळकट तरी दगड वरावा ।
तर तिथ काय आडळल । याच बोलाच नांव पडळल ।
आसे बाई कोण करीत आस जे म्हणत ।
त्याच्याच बोच्यांत सिरत । उर्‍हाट वाणी बोलसी ।
जात चि तुं हटकरीन ग । जीव दाल्ला जीवे चि मारिला
आतां माळ्याची जाली पाटकरीन ग ।
कंटाळवाणी बोलसी आंग माझे कांपत ।
फणसवारे कांटे माशाची गोंगाण आंत पाहावे तर चोखट दर्पत ।
तुजा ठाव ठिकाणा गाऊं ग । खालत डोक वरत पाय उदकांत
आम्ही राहुं ग । चाल गा आस बोलुं नको तुला हंसतील लोक ।
सार्‍या लोकाच उत्पन्न मूळ बगानास कां ग ते भोंक ।
शास्त्री नाही पुराणी नाही काय गे सांगती कथा ।
शास्त्रांवांचुन अधिक बोलुं तर कोट पाप माथा ।
आमच शास्त्र आस नाही तर तुझे कोणते कळले ।
ते तूं म्हण की । हरि ॐ ॥
कोठे ग बाई उमटल । तरि हे लै दिसा सांगतो ब्रह्मा जोसी ।
प्रत्यक्ष इथ बोलसी आतां कां ग तिकडे कोलसी ।
आसो बाई आम्हास आसे कंटाळा ।
व्यशथ्रा यजमाना हा घांड मन्या हो खट्याळ्या ।
बोलि भाषा दासा गोड । सद्गुरु माय करी कोड ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP