मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पांगुळ

भारूड - पांगुळ

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९५८.
विवेकाचे पाय गेले रे मी वैभवहीन ।
लागलो प्रपंचसंगा दुःख भोगितो दारुण ॥१॥
विषयवैभवदारी मी घेतो धरणे ।
देहपांग सोडवेना यासि काय करणे ॥२॥
रामदास म्हणे देवा तुज शरण आलो ।
भक्तिभावविरहित दास डिंगर जालो ॥३॥

९५९.
भरत गा खंडामाजी । शरयूतीर गांवो ॥
धर्माचे नगर तेथे । राज्य करी रामरावो ॥
पांगुळा पाय देतो । देवी जानकीचा नाहो ॥
जाईन मी तयां ठाया । देवां दुर्लभ ठावो ॥१॥
राघवाचा धर्म जागो । अधर्म रे भागो ॥
अज्ञान निरसुनियां । विज्ञानी लक्ष लागो ॥२॥
मीपणाचे मोडले पाय । म्हणोनि पांगुळ जालो ॥
तूंपणाची कीर्ति देईं । ऐकुनियां शरण आलो ॥
मीतूंपणे निरसी माझे । भक्तिभिंतीवरि बैसलो ॥
प्रेमफडके पसरुनियां । कृपादान मागो आलो ॥३॥
जगी एक तूंचि दाता । म्हणोनि आलो मागावया ॥
मागणे निरसे जेणे । ऐसे दे गा रामराया ॥४॥
तुझे कृपेचा कांबळा । दे मज पांगुळाकारणे ॥
मायामोह हींव वाजे । हे निवारेल जेणे ॥
निष्कामभाकरी देई । कामनाक्षुधा हरे जेणे ॥
बोधाचे ताक पाजी । शब्द खुंटे धालेपणे ॥५॥
दासीहाती देववीसी । ते मी नेघे सर्वथा ॥
द्वैतदान नेघे जाण । दोही वेळ आणितां ॥
आपणाऐसे दान देईं । तूं तंव इच्छेचा दाता ॥
अपूर्ण दान नेघे । पूर्ण करी निष्कामता ॥६॥
रामदास पांगुळासी । रामे दिधलिया दान ॥
देणेची निरसे जेथे । कैंची घेण्याची खूण ॥
देणे घेणे निरसुनियां । अपूर्ण करी परिपूर्ण ॥
दाता ना याचकु । तेथे सहजी सहज संपूर्ण ॥७॥

९६०.
राघवाचा धर्म गाजो । कीर्ति अद्भुत माजो ॥
ठाईं ठाईं देवालये । भक्तमंडळी साजो ॥ध्रु०॥
शक्ति आहे तोचि फावे । दोनी लोक साधावे ॥
इहलोक परलोक । शत्रु सर्व रोधावे ॥१॥
संसारीचे दुःख मोठे । हे मी कोणाला सांगो ॥
जन्म गेला तुजवीण । आणिक काय मी मागो ॥२॥
मागता समर्थाचा । तेणे कोणा सांगावे ॥
रामेवीण कोण दाता । कोणामागे लागावे ॥३॥
रामदास म्हणे देवा । आतां पुरे संसार ॥
असंख्य देणे तुझे । काय देतील नर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP