मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
संतसंग

विविध विषय - संतसंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२७२ .

अज्ञान जनाचे देव नानापरी । त्यांची संख्या करी कोण आतां ॥१॥

कोण आतां देव पावेल तयांसी । जन्ममरणाची चुकवीता ॥२॥

चुकविला देव पाहतां दिसेना । निश्चयो असेना एके ठायी ॥३॥

एके ठायी भाव एके ठायी देव । चुकला उपाव सार्थकाचा ॥४॥

सार्थकाचा देव तरीच सांपडे । जरी कांही घडे संतसेवा ॥५॥

संतसेवा भावे करितां तरले । जन उद्धरले नेणो किती ॥६॥

नेणो किती जन साधूचे संगती । आपुले प्रचीती मुक्त जाले ॥७॥

मुक्त जाले ज्ञाने विचारे पाहतां ॥ स्वरुपी राहातां निरंतर ॥८॥

निरंतर देव फुटेना तुटेना । चळेना ढळेना कदाकाळी ॥९॥

कदाकाळी देव रचेना खचेना । येईना जाईना निरंजन ॥१०॥

निरंजन देव पहातां दिसेना । परी तो नासेना कल्पकोटी ॥११॥

कल्पकोटि गेले देवासी नेणतां । यातना भोगितां जन्मोजन्मी ॥१२॥

जन्मोजन्मी देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळी ॥१३॥

मायाजाळे कांही उमजत नाही । देव ठायी ठायी कल्पनेचे ॥१४॥

कल्पनेचे देव कल्पांती नासती । ऐसे वेदश्रुति बोलतसे ॥१५॥

बोलतसे श्रुति दृश्य नाशिवंत । जाणिजे शाश्वत परब्रह्म ॥१६॥

परब्रह्म आहे सर्वत्र व्यापक । तेंचि पाहे एक गुरुमुखे ॥१७॥

गुरुमुखे ब्रह्मविचार पहावा । निश्चयो रहावा निर्गुणाचा ॥१८॥

निर्गुणाचा ध्यास निर्गुण करील । मग उद्धरील आपणासी ॥१९॥

आपणासी पाहे जो कोणी शोधोनी । तो जन्मापासूनी मुक्त जाला ॥२०॥

मुक्त जाला देहसंबंध सोडीतां । निर्गुण धुंडितां निर्गुणचि ॥२१॥

निर्गुणचि स्वये जो कोणी जाहला । तोचि एक भला समाधानी ॥२२॥

समाधानी साधु जोडतां संकट । मिथ्या खटपट जेथे तेथे ॥२३॥

जेथे नाही माया तो मायेवेगळा । ऐसा तो विरळा ॥२४॥

संतजन तोचि जो स्वये देवचि । तेथे ये मायेची वार्ता नाही ॥२५॥

वार्ता नाही ऐसे सज्ञान जाणती । अज्ञान नेणती कांही केल्या ॥२६॥

कांही केल्या पापी पुण्य आचरेना । संसार सरेना दुःखमूळ ॥२७॥

दुःखमूळ जन्म ज्ञाने निरसावा । विवेके पहावा सारासार ॥२८॥

सार निराकार असार आकार । निराकारे पार पाविजेतो ॥२९॥

पाविजेतो परी अर्थी विवरावे । विवेके विरावे सस्वरुपी ॥३०॥

सस्वरुपी ज्ञाते जे कोणी विराले । स्वरुपचि जाले आत्मबोधे ॥३१॥

आत्मबोध स्थिति बाणलीसे जया । मग तया माया आतळेना ॥३२॥

आतळेना माया ममता अंतरी । नित्य निरंतरी निरंतर ॥३३॥

निरंतर असे परी तो न दिसे । गुप्त जाला भासे भास मात्र ॥३४॥

भासमात्र देह तया ज्ञानियांचा । अंतरी सुखाचा सुखमूर्ति ॥३५॥

सुखमूर्ति सुखदुःखाविरहित । बोलियेलो हेत कळावया ॥३६॥

कळावया हेतु शब्दे निःशब्दाची । लक्षे अलक्षाची सोय लागे ॥३७॥

सोय लागे तेथे लक्ष ना अलक्ष । देह पूर्व पक्ष बोलियेला ॥३८॥

बोलियेला शब्द अनुर्वाच्य वाचे । जाणती मुक्तीचे वांटेकरी ॥३९॥

वांटेकरी जाले अवस्थे वेगळे । श्रुतीसी नाकळे पार ज्यांचा ॥४०॥

पार ज्यांचा नाही अपार विदेही । देहातीत पाही समाधान ॥४१॥

समाधान राहे निःसंग रहातां । संग पाहो जातां कासावीस ॥४२॥

कासावीस जाले संगाचेनि गुणे । निःसंगचि होणे सर्वकाळ ॥४३॥

सर्वकाळ संग सोडावा आपुला । मीपणाच्या बोला लागो नये ॥४४॥

लागो नये कदा मना मागे मागे । कल्पनेच्या बोला लागो नये ॥४५॥

समाधान राहे संताचे संगती । वस्तूची प्रचीती वस्तुरुप ॥४६॥

वस्तुरुप जाला जो कोणी साधक । धन्य तोचि एक लोकांमध्ये ॥४७॥

लोकांमध्ये परलोकचि साधावा । भगवंत शोधावा नानापरी ॥४८॥

नानापरी सांगे रामीरामदास । भाविके विश्वास सोडूं नये ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP