मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
षड्रिपु.

विविध विषय - षड्रिपु.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२०६ .

गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ॥१॥

दोहींकडे अंतरला । थोरपणे भांबावला ॥२॥

गेली अवचिते निःस्पृहता । नाही स्वार्थचि पुरता ॥३॥

क्रोधे गेला संतसंग । लोभे जाहला वोरंग ॥४॥

पूर्ण जाली नाही आस । इकडे बुडाला अभ्यास ॥५॥

दास म्हणे क्रोध केले । अवघे लाजिरवाणे जाले ॥६॥

२०७ .

संग स्वार्थाचा धरिला । तेणे काम बळावला ॥१॥

थोरपण हे पातले । तेणे अव्हाटी घातले ॥२॥

कामामागे आला क्रोध । क्रोधे केला बहु खेद ॥३॥

लोभ दंभाचे कारण लोभे केले विस्मरण ॥४॥

मदमत्सराचा फाटा । अहंकारे धरी ताठा ॥५॥

दास म्हणे हे सकळ । अवघे अविद्येचे मूळ ॥६॥

२०८ .

थोर अंतरी भडका । आला क्रोधाचा कडका ॥१॥

नित्य निरुपणी बैसे । अवगुण जैसे तैसे ॥२॥

लोभे भांबावले मन । रुक्यासाठी वेंची प्राण ॥३॥

दंभ विषयी वाढला । पोटी कामे खवळला ॥४॥

मदमत्सराचा फाटा । अहंकारे धरी ता‍ठा ॥५॥

दास म्हणे जाले काय । श्रोती राग मानूं नये ॥६॥

२०९ .

हात धुणे पाय धुणे । नाना उपचार करणे ॥१॥

सर्वकाळ लोभासंगे । करणे लागे हो अव्यंगे ॥२॥

वस्त्रे अलंकार पाहतां । पुढती घालितां काढितां ॥३॥

सदा इंद्रिय गळतां । त्यासि करावी शुद्धता ॥४॥

अवघा धंदाचि लागला । दिवसेंदिवस काळ गेला ॥५॥

रामदास म्हणे हित । कैसे घडावे स्वहित ॥६॥

२१० .

मत्सराचे सुणे मत्सराचे सुणे । लाभेवीण दुणे भुंकतसे ॥१॥

आपण गुंतले विषयी केकात । सज्जना भुंकत पाठीमागे ॥२॥

आशेचा तुकडा टाकितां लुडबुडी । दास म्हणे वेडी जाति ऐसी ॥३॥

२११ .

पहा दर्पणे खतेले । तेणे मुख आच्छादले ॥१॥

तैसी वृत्ति हे मलिन । होतां बुडे समाधान ॥२॥

धातुवरी आला मळ । तेणे लोपले निर्मळ ॥३॥

शेती न जातां आउत । तेणे आच्छादले शेत ॥४॥

मुखे न होतां उच्चार । तेणे बुडे पाठांतर ॥५॥

नाही दिवसाचा विचार । दास म्हणे अंधःकार ॥६॥

२१२ .

कामक्रोध आवरावा । मद मत्सर सारावा ॥१॥

सांडुनियां कुलक्षणे । शुद्ध धरावी लक्षणे ॥ध्रु०॥

लोभदंभांसी टाकावे । मीपणासि आटोपावे ॥२॥

विवेक वैराग्य विश्वास । धरणे म्हणे रामदास ॥३॥

२१३ .

हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ॥१॥

तैसे संसाराचे सुख । आदि अंती अवघे दुःख ॥२॥

सुखासारिखे दिसत । उदंड दुःख आले तेथ ॥३॥

दास म्हणे हा वळसा । कोण तो सावा गळसा ॥४॥

२१४ .

कडु विष आणि वावडे । तयासि लडोनि पडे वेडे ॥१॥

तैसे संसाराचे सुख । आदि अंती अवघे दुःख ॥२॥

सुखासारिखे दिसत । उदंड दुःख आले तेथ ॥३॥

दास म्हणे हा वळसा । कोण तो सावा गळसा ॥४॥

२१५ .

ज्याच्या निरुपणे संदेह पडती । त्यागा ते संगति दुर्जनाची ॥१॥

दुर्जनाची कळा सज्जनाचे परी । मैंदाची सरी ब्राह्मणासी ॥२॥

ब्राह्मणासी नाही सर्वदा मत्सर । शुद्ध निरंतर दास म्हणे ॥३॥

२१६ .

निरुपणी जागवेना । काम क्रोध त्यागवेना इतुक्यावेगळे साधन । देवा अवघेचि करीन ॥ध्रु०॥

आतां ठाकेना अभ्यास । तोडवेना आशापाश ॥२॥

रामीरामदास म्हणे । रामनाम उच्चारणे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP