मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
वैराग्य

विविध विषय - वैराग्य

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३८० .

कोणकोणास रडावे । एकामागे एके जावे ॥१॥

एक वेळ गेली माता । एक वेळ गेला पिता ॥ध्रु०॥

द्रव्य दारा जाती पुत्र । जिवलगे आणि मित्र ॥२॥

प्राणी संसारासी आला । तितुका मृत्युपंथे गेला ॥३॥

पूर्वज गेले देवापाशी । तेचि गति आपणसी ॥४॥

रामदास म्हणे लोक । करी गेलियाचा शोक ॥५॥

३८१ .

जे जे संसारासी आले । ते ते तितुके एकले ॥१॥

वांया आपुली मानिली । सेखी दुरी दुरावली ॥२॥

सखी सांडुनियां देशी । मृत्यु पावला विदेशी ॥३॥

खाती व्याघ्र आणि लांडगे । तेथे कैची जिवलगे ॥४॥

घरी वाट पाहे राणी । आपण मेला समरंगणी ॥५॥

रामीरामदास म्हणे । अवघी जाणावी पीसुणे ॥६॥

३८२ .

ज्याचे होते तेणे नेले । तेथे तुझे काय गेले ॥१॥

वेगी होई सावधान । करी देवाचे भजन ॥२॥

गति न कळे होणाराची । हे तंव इच्छा भगवंताची ॥३॥

पूर्व संचिताचे फळ । येती दुःखाचे हळाळ ॥४॥

पूर्वी केले जे संचित । तेंचि भोगावे निश्चित ॥५॥

दास म्हणे पूर्वरेखा । प्राप्त न टळे ब्रह्मांदिकां ॥६॥

३८३ .

रात्रंदिवस हे गव्हार । फिरतसे दारोदार ॥१॥

आपुले मन आटोपावे । नाही तरि फजीत पावावे ॥२॥

कल्पनेची भरोवरी । करुं नये तेंचि करी ॥३॥

दास म्हणे ओढाळ । आटोपीना तो चांडाळ ॥४॥

३८४ .

जाले देह हो गलित । आले संसारा लळित ॥१॥

सावधान सावधान । पुढे नाही व्यवधान ॥२॥

आतां मन आटोपावे । आपुल्या निजधामा जावे ॥३॥

राहे देवाच्या स्मरणे । रामीरामदास म्हणे ॥४॥

३८५ .

वय जाले वाताहत । अविचारे केला घात ॥१॥

देव नाही ओळखिला । पुढे विषय देखिला ॥२॥

बाळपणे मूर्खपण । कांही नेणे चि आपण ॥३॥

होतां तारुण्याचा भार । पुढे जाला कामातुर ॥४॥

वृद्धपणी संकोचित । देह जालासे गलित ॥५॥

रामीरामदास म्हणे । देह गेला मूर्खपणे ॥६॥

३८६ .

शतवर्षांची मर्यादा । तितुका व्यर्थ गेला धंदा ॥१॥

देह संसारी गोंविला । नाही देव आठविला ॥२॥

कायावाचामनोभावे । अवघे प्रपंची लावावे ॥३॥

कांतापुत्राची संगति । तेणे मानिली विश्रांती ॥४॥

नीच सेवकाचे परी । सेवा केली जन्मवरी ॥५॥

दास म्हणे विषयगोडी । अंतकाळी कोण सोडी ॥६॥

३८७ .

देहालागी कष्ट केले । परि ते अवघे व्यर्थ गेले ॥१॥

देह देवाचे कारणी । होतां देव होतो ऋणी ॥२॥

पाणी लोभे गुंडाळला । पुढे अंतकाळ आला ॥३॥

जे जे कांही कष्ट केले । ते ते अवघे व्यर्थ गेले ॥४॥

नानापरी सांभाळिली । पुढे काया हे जाळिली ॥५॥

दास म्हणे मूर्खपण । पुढे जन्मासी कारण ॥६॥

३८८ .

अंतकाळ येतां येतां । तेणे न ये चुकवितां ॥१॥

अकस्मात लागे जावे । कांही पुण्य आचरावे ॥२॥

पुण्येविण जाता प्राणी । घडे यमाची जाचणी ॥३॥

रामदास म्हणे जना । कठिण यमाची यातना ॥४॥

३८९ .

कामक्रोधे खवळला । तेणे संनिपात जाला ॥१॥

त्यास औषध करावे । पोटी वैराग्य धरावे ॥२॥

कुपथ्य अवज्ञेचे जाले । मग ते पुढे उफाळले ॥३॥

मर्यादेने निर्बुजले । वारे अभिमान घेतले ॥४॥

दडपणेचा घाम आला । प्राणी उठोनि पळाला ॥५॥

रामदास म्हणे भले । लोक म्हणती पिसाळले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP