मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नवल

भारूड - नवल

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९५५.
( राग-केदार; ताल-धुमाळी )
रातीदीस पीठ चांदिणे अखंडीत पडले ।
चंद्र सूर्य दोन्ही लोपले अघटीत घडले ॥१॥
लखलखाट चहुंकडे सर्व उजेडे ब्रह्मांड चि मढिले ।
कोटि घनप्रकाश हे सावकाश वाटे दृश्य जडले ॥२॥

९५६.
( राग खमाज; ताल धुमाळी )
एक थोर नवलाव देखिला । स्त्रियां पुरुष गाभिणा केला ।
बाळकू माते लागुनि व्याला । निर्धारितां जाला तोचि बाप ॥१॥
त्याचे गांवी निद्रेचा पडिभरु । जागतचि निजेला परिवारु ।
स्वप्नेवीण दाटलासे घोरु । सुखेचि थोरु शिणतसे ॥२॥
स्वप्नामाजी म्हणे बाळाग्रचि माझे । येर हे शरीर पारिखे तुझे ।
वोसणतां उठोनि बैसोनि फुंजे । एक ते राजे रंक जाले ॥३॥
एकी सुख म्हणोनि दुःख मानिले । एकी ऐसे देखुनि चेवविले ।
एकी जागेपणे डोळे झांकिले । घोरो लागले टेकुनियां ॥४॥
एक हांका देउनि वोसाणिती । एक ते सैराट धांवती ।
नीट वाट सांडूनि अव्हाटे जाती । होतां विपत्ति दुःख वाटे ॥५॥
एक ते घुमी बहु व्यापिले । एक दुःस्वप्ने जाजावले ।
नाना अभिनव देखोनि भ्याले । एक ते मेले निजोनियां ॥६॥
ऐसा निद्रिस्त जगडंबरु । त्यांत जागा एक सत्य सद्गुरु ।
रामदास म्हणे त्याचा तो जागरु । येर परिवारु निद्रिस्ताचा ॥७॥

९५७.
( राग-शंकराभरण; ताल-धुमाळी )
खाणोरी घरभेद्या आला । दोर कापून खुंटा नेला ।
राहोसी ग्रहण लागला । खग्रास जाला ॥१॥
पांगुळे बहु खंगली । ब्रह्मांड भेदुनी गेली ।
पालट जालिया खुंटली । तयांची गती ॥२॥
अंधारे दुमाल केला । प्रकाश लोपुनि गेला ।
अंधारी लपोनि राहिला । न दिसे कोणा ॥३॥
लष्करी पारिखे जाले । तरवारेसी घाय केले ।
मृगजळी बुडोनि गेले । हत्तीचे भार ॥४॥
दिगस उगवला । माहाल रायांत गेला ।
उलके कोठार खाउनि ठाव पाहिला ॥५॥
आपुली साउली ज्याली । विक्राळ रुपे धांविली ।
कितेके बापुडी खादली । संख्या हि नाही ॥६॥
विष हे खाऊनि जिती । मज आहे प्रचीती ।
अमृत खाउनि मरती । बापुडे एक ॥७॥
पक्षीराज भरंगळले । उदक सेवूं लागले ।
दुग्धाची परिक्षा नेणती । भुलोनि गेले ॥८॥
दिवस मावळला । अत्यंत अंधार जाला ।
रायांतुनि महाल आला । मागुती सये ॥९॥
रामदासाचिये माये । पुत्राच्या पोटांत जाय ।
वंध्या एकली एकट । करील काय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP