मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
साग्निकाला विशेष

तृतीय परिच्छेद - साग्निकाला विशेष

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां साग्निकाला विशेष सांगतो -

अथसाग्नेर्विशेषः कारिकायां कृष्णपक्षेप्रमीयेतयद्यह्निप्रातराहुतीः शेषास्तुजुहुयाद्दर्शपर्यंताः पक्षहोमवत् प्रतिपत्प्रातर्होमांताइत्यर्थः यद्याहिताग्निरपरपक्षेम्रियेताहुतिभिरेनंपूर्वपक्षेहरेयुरित्याश्वलायनोक्तेः तदानीमेवजुहुयात्सायंकालाहुतीरपि सायंम्रियेतचेत्सायमाहुतीर्जुहुयादथ तदानीमेवजुहुयात्प्रातः कालाहुतीरपि सकृद्गृहीतमंत्रेष्टंभिन्नतंत्रंचहोमयोः दार्शंचापिप्रकुर्वीतस्थालीपाकंतदैवतु छंदोगपरिशिष्टे हुतायांसायमाहुत्यांदुर्बलश्चेद्गृहीभवेत् प्रातर्होमस्तदैवस्याज्जीवेच्चसपुनर्नवा इदंशुक्लपक्षपरं दुर्बलोमुमूर्षुः त्रिकांडमंडनः दर्शेष्टिंचतदाकुर्यादिष्टिर्यदिनसंभवेत् देवतानांप्रधानानामेकैकस्यहुनेत्पृथक् पुरोनुवाक्यायाज्याभ्यांचतुरात्तघृताहुतीः तथा अग्नावरण्योरारुढेप्रमीयेतपतिर्यदि प्रेतंस्पृष्ट्वामथित्वाग्निंजप्त्वाचोपावरोहणं घृतंचद्वादशोपात्तंतूष्णींहुत्वाशवक्रिया विच्छिन्नश्रौताग्नेर्मृतौतुप्रेताधानंतत्रैवोक्तं प्रेतंस्वाग्न्यालयेक्षिप्त्वामथिताग्न्यानलेरणी सन्निधायारणीमंथेद्यस्येतियजुषाततः यस्याग्नयोजुह्वतोमांसकामाः संकल्पयंतेयजमानमांसं जायंतुतेहविषेसादितायस्वर्गलोकमिमंप्रेतंनयंत्वितिमंत्रतः प्रणीयपावकंतूष्णींद्वादशोपात्तसर्पिषा तूष्णींहुत्वाततः कुर्यात्प्रेतेमाल्याइतिक्रियां नष्टेष्वग्निष्वथारण्योर्नाशेस्वामीम्रियेतचेत् आहरेदरणिद्वंद्वंमनोज्योतिऋचाततः ।

कारिकेंत - " जर आहिताग्नि कृष्णपक्षांत दिवसा प्रातः मरेल तर दर्शपर्यंत शेष प्रातराहुतींचा होम पक्षहोमाप्रमाणें करावा . " दर्शपर्यंत म्हणजे प्रतिपत्प्रातर्होमापर्यंत करावा . कारण , " जर आहिताग्नि कृष्णपक्षांत मरेल तर त्याच्या शुक्लपक्षापर्यंत आहुति द्यावा " अशी आश्वलायनाची उक्ति आहे . आणि त्याच वेळीं सायंकालाहुतींचा देखील होम करावा . सायंकालीं मरेल तर सायंकालाच्या आहुतींचा होम करावा . आणि त्याच वेळीं प्रातः कालाहुतींचाही होम करावा . ह्या दोनी वेळच्या आहुती वेगवेगळ्या एकदम घेऊन त्यांचा होम करावा . म्हणजे प्रातः कालाच्या शेष आहुति एकदम घेऊन होम करावा . तसाच " सायंकालाच्या आहुति एकदम घेऊन होम करावा . आणि दर्शस्थलीपाकही त्याच वेळीं करावा . " छंदोगपरिशिष्टांत - " सायंकालच्या आहुतीचा होम केला असतां जर यजमान दुर्बळ ( मुमूर्ष ) होईल तर त्याच वेळीं प्रातः कालचा होम करावा . नंतर तो जगेल तर पुनः प्रातः कालचा होम करावा किंवा न करावा . " हें वचन शुक्लपक्षाविषयीं आहे . त्रिकांडमंडन - " दर्शेष्टि त्या वेळीं करावी . जर इष्टि न संभवेल तर स्रुचेच्या ठिकाणीं चार वेळ घृताहुती घेऊन पुरोनुवाक्या व याज्या मंत्रांनीं प्रधानदेवतांना वेगवेगळा एक एक होम करावा . " तसेंच " अग्नीचा अरणींत आरोह केला असतां जर पति मरण पावेल तर प्रेताला स्पर्श करुन अग्नीचें मंथन करुन व जप करुन अग्नीचें अवरोहण करावें . नंतर बारा वेळ घृत घेऊन मंत्ररहित हवन करुन नंतर प्रेतक्रिया करावी . " श्रौताग्नि विच्छिन्न झालेला मृत असेल तर प्रेताधान तेथेंच सांगितलें आहे - " प्रेत अग्निशालेंत ठेऊन दोनी अरणी संनिध ठेऊन ‘ यस्याग्नयो० प्रेतं नयंतु ’ ह्या यजु मंत्रानें मंथन करुन अग्नीचें अग्निकुंडांत प्रणयन करुन बारा वेळ आज्य घेऊन मंत्ररहित हवन करुन त्या अग्नीनें दाहादि करावें . अग्नि नष्ट झाले असून अरणींचा नाश झाला असतां स्वामी मृत होईल तर ‘ मनोज्योति० ’ या ऋचेनें दोन अरणी आणाव्या . "

यज्ञपार्श्वः यजमानेचितारुढेपात्रन्यासेकृतेसति वर्षाद्यभिहतेवह्नौकथंकुर्वंतियाज्ञिकाः तदर्धदग्धकाष्ठेनमंथनंतत्रकारयेत् तच्छेषालाभतोन्येनदग्धशेषेणवापुनः हुत्वाज्यंलौकिकेवह्नौहुतशेषंदहेत्तुवा अत्राग्निषुसत्सुपर्णशरैः शरीरोत्पत्तिः शरीरेवासतिप्रेताधानेनाग्न्युत्पत्तिः उभयाभावेतुप्रेताधानेऽनधिकाराद्दाहादिसंस्कारलोपः उदकदानाद्येवकार्यमितिकेशवीकारशतद्वयीप्रमुखाः तन्न निषेकाद्याः स्मशानांतास्तेषांवैमंत्रतः क्रियाइतिविरोधात् क्रियालोपगतायेचेतिनिषेधात्तदभावेपलाशानांवृतैः कार्यः पुमानपीत्यभावेविधानस्याग्न्यभावेपिसाम्याच्च तेनप्रेताहुत्यभावेपिस्विष्टकृद्रव्यांतरोक्तेरदृष्टार्थत्वात् प्रेताधानंदाहोपिभवत्येव प्रतिकृतेरग्नीनांचप्रेताधानप्रयोजकत्वाक्षतेः ।

यज्ञपार्श्व - " यजमान चितेवर ठेऊन त्याजवर यज्ञपात्रे ठेऊन अग्नि लावला असून तो अग्नि वर्षादिकेकरुन नष्ट झाला असतां याज्ञिक कसें करितात ? त्या ठिकाणीं अर्धदग्ध काष्ठांनीं मंथन करुन अग्नि करावा . मंथनकाष्ठें दग्ध होऊन शेष न मिळतील तर इतर दग्धशेष काष्ठानें अग्नि करावा . अथवा लौकिकाग्नीवर आज्यहोम करुन हुतशेषाचा दाह करावा . " येथें असें आलें कीं , श्रौताग्नि असतां शरीर नसेल तर पर्णशरांनीं शरीराची उत्पत्ति होते . शरीर असतां अग्नि नसेल तर प्रेताधानानें अग्नि उत्पन्न होतो . अग्नि व शरीर दोनीं नसतील तर प्रेताधानाविषयीं अधिकार नसल्यामुळें दाहादिक संस्कारांचा लोप होतो . उदकदानादिच करावें , असें केशवीकार , शतद्वयीप्रमुख सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , " गर्भाधानापासून स्मशानांत जाईपर्यंत सर्व त्याच्या क्रिया मंत्रानें होतात " या वचनाचा विरोध येतो . ‘ क्रियालोप झालेले जे ’ या वचनानें क्रियालोपाचा निषेध केला आहे . आणि " देहाच्या अभावीं पळसाच्या पानांच्या देंठांनीं पुरुष करावा " ह्या पूर्वोक्त ब्राह्मवचनानें देहाच्या अभावीं पर्णशराचें विधान केलें तें अग्नि नसतांही समानच आहे . तेणेंकरुन , प्रेताहुतीचा अभाव असतांही स्विष्टकृताचें निराळें द्रव्य सांगितलें आहे तें अदृष्ट फलाकरितां असल्यामुळें प्रेताधान आणि दाह होतच आहेत . प्रतिकृति ( पर्णशर ) आणि श्रौताग्नि हे प्रेताधानाला प्रयोजक नाहींत , असें नाहीं .

पत्न्याअप्येवं दाहयित्वाग्निहोत्रेणस्त्रियंवृत्तवतींपतिरितियाज्ञवल्क्योक्तेः यत्तु द्वितीयांचैवयोभार्यांदहेद्वैतानिकाग्निभिः जीवंत्यांप्रथमायांतुसुरापानसमंस्मृतमितितदाधानेसहानधिकृताविषयमितिविज्ञानेश्वरः मदनरत्नेब्राह्मेपि आहिताग्न्योश्चदंपत्योर्यस्त्वादौम्रियतेभुवि तस्यदेहः सपिंडैश्चदग्धव्यस्त्रिभिरग्निभिः पश्चान्मृतस्यदेहस्तुदग्धव्योलौकिकाग्निना अनाहिताग्निदेहस्तुदाह्योगृह्याग्निनाद्विजैः त्रिकांडमंडनस्तुविकल्पमाह ज्येष्ठायांविद्यमानायांद्वितीयायैस्वयोषिते काम्यंनित्याग्निहोत्रंवानकथंचित्प्रयच्छति स्त्रीमात्रमविशेषेणदग्ध्वान्येवैदिकाग्निभिः विवाह्यादधतेयद्वाधानमेवास्तिचेद्वधूरिति ।

पत्नीलाही असेंच समजावें . कारण , " चांगल्या वर्तनाचे स्त्रियेचा पतीनें अग्निहोत्रानें दाह करावा . " असें याज्ञवल्क्यवचन आहे . आतां जें " जो पुरुष प्रथमपत्नी जीवंत असतां दुसर्‍या पत्नीला श्रौताग्नीनें दग्ध करील त्याचें तें कर्म सुरापानसमान आहे . " असा पत्नीचा दाहनिषेध केला तो आधानाविषयीं सहाधिकार न पावलेल्या पत्नीविषयीं आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . मदनरत्नांत ब्राह्मांतही - " अहिताग्नि स्त्रीपुरुषांमध्यें जो आदीं मृत होईल त्याचा देह सपिंडांनीं तीन अग्नींनीं दग्ध करावा . पश्चात् मृत असेल त्याचा देह लौकिकाग्नीनें दग्ध करावा . अनाहिताग्नीचा देह गृह्याग्नीनें दग्ध करावा . " त्रिकांडमंडन तर विकल्प सांगतो - " ज्येष्ठ स्त्री विद्यमान असतां कनिष्ठ स्त्रियेला काम्य किंवा नित्य अग्निहोत्र द्यावयाचें नाहीं . इतर विद्वान् कोणतीही स्त्री मृत असो तिला श्रौताग्नीनें दग्ध करुन स्त्री नसेल तर विवाह करुन आधान करितात . अथवा स्त्री असेल तर आधानच करितात . "

अत्रेदंतत्त्वं साग्नेः पत्नीमृतौद्वौपक्षौ पुनर्विवाहेच्छायांपूर्वाग्निभिर्दहेदित्येकः पक्षः भार्यायैपूर्वमारिण्यैदत्वाग्नीनंत्यकर्मणि पुनर्दारक्रियांकुर्यात्पुनराधानमेवचेतिमनूक्तेः दाहयित्वाग्निहोत्रेणस्त्रियंवृत्तवतींपतिरितियाज्ञवल्क्योक्तेश्च पुनर्विवाहाशक्तौनिर्भंथ्येनतांदग्ध्वापूर्वाग्निष्वेवाग्निहोत्रेष्ट्यादिकार्यमित्यन्यः आहार्येणाहिताग्निंपत्नींचेत्याश्वलायनोक्तेः भरद्वाजोपि निर्मंथ्येनपत्नीमिति पूर्वाग्न्येकदेशेनदहेदितियज्ञपार्श्वदेवयाज्ञिकादयः यानिच तस्मादपत्नीकोप्यग्निहोत्रमाहरेदितिश्रुतिः विष्णुः छंदोगपरिशिष्टंच मृतायामपिभार्यायांवैदिकाग्निंनहित्यजेत् उपाधिनापितत्कर्मयावज्जीवंसमाचरेत् उपाधिर्हेमकुशपत्न्यादिः अन्येकुशमयींपत्नींकृत्वातुगृहमेधिनः अग्निहोत्रमुपासंतेयावज्जीवमनुव्रताइत्यपरार्केस्मृत्यंतरात् कात्यायनोपि रामोपिकृत्वासौवर्णींसीतांपत्नींयशस्विनीं ईजेबहुविधैर्यज्ञैः सहभ्रातृभिरच्युतइत्यादीनि तानिपूर्वाग्निष्वेवाग्निहोत्रादिपराणि नत्वपत्नीकस्याधानार्थानि क्रतुविधीनामाधानाप्रयोजकत्वात् अपत्नीकस्याधानाप्रवृत्तिरितिमानवपरिशिष्टाच्चसोमोनभवत्येव अपत्नीकोप्यसोमपइतिश्रुतेः यत्तुभरद्वाजापस्तंबसूत्रं दारकर्मणियद्यशक्तआत्मार्थमग्न्याधेयमिति अस्यार्थः पुनर्विवाहाशक्तौयदग्न्याधेयंपूर्वकृतमस्तितदात्मार्थमेव नपत्न्यैदद्यादिति ब्राह्मणभाष्यापरार्काशार्करामांडारादितत्त्वमप्येवं त्रिकांडमंडनस्तुपक्षद्वयमाह अन्येप्यपत्नीकस्याधानमाहुस्तदाशयंनविद्मः वृद्धयाज्ञवल्क्यः आहिताग्निर्यथान्यायंदग्धव्यस्त्रिभिरग्निभिः अनाहिताग्निरेकेनलौकिकेनापरोजनः क्रतुः एवंवृत्तांसवर्णांस्त्रींद्विजातिः पूर्वमारिणीं दाहयेदग्निहोत्रेणयज्ञपात्रैश्चधर्मवित् कारिकायाम् पत्नीमपिदहेदेवंभर्तुः पूर्वंमृतायदि अनग्निकांदहेदेवंकपालेनहविर्भुजा ।

याचें तत्त्व असें कीं , साग्निकाला पत्नी मृत असतां दोन पक्ष आहेत - पुनः विवाहाची इच्छा असेल तर पहिल्या अग्नींनीं पत्नीचा दाह करावा हा एक पक्ष . कारण , " पूर्वीं मरणार्‍या स्त्रियेला अंत्यकर्माचेठायीं अग्नि देऊन पुनः विवाह करावा व पुनः आधानही करावें " असें मनुवचन आहे . " सुशील स्त्रियेचा पतीनें अग्निहोत्रानें दाह करावा . " असें याज्ञवल्क्यवचनही आहे . पुनः विवाहाविषयीं सामर्थ्य नसेल तर मंथन करुन अग्नि उत्पन्न करुन तिचा दाह करुन पहिल्या अग्नीवरच अग्निहोत्र , इष्टि इत्यादि करावें , हा दुसरा पक्ष . कारण , " आहिताग्नीनें आहार्य अग्नीनें पत्नीचा दाह करावा " असें आश्वलायन वचन आहे . भरद्वाजही - " मंथन केलेल्या अग्नीनें पत्नीचा दाह करावा " पूर्व अग्नींतून थोडा घेऊन पत्नीचा दाह करावा , व पहिले अग्नि ठेवावे , असें यज्ञपार्श्व , देवयाज्ञिक इत्यादिक सांगतात . आतां जी ‘‘ तस्मात् कारणात् अपत्नी कानें देखील अग्निहोत्र करावें " अशी श्रुति आहे . विष्णु छंदोगपरिशिष्ट - " भार्या मृत असतांही श्रौताग्नि टाकूं नये . तें अग्निहोत्रसंबंधीं कर्म उपाधीनेंही यावज्जीवपर्यंत करावें . " उपाधि म्हणजे सुवर्ण , कुश यांची पत्नी होय . कारण , " इतर गृहस्थ कुशमयी पत्नी करुन यावज्जीवपर्यंत अग्निहोत्राची उपासना करितात " असें अपरार्कांत स्मृत्यंतरवचन आहे . कात्यायनही - " रामानेंही सुवर्णाची सीता पत्नी करुन भ्रात्यांसहवर्तमान बहुतप्रकारच्या यज्ञांनीं यजन केलें . " इत्यादिक वचनें तीं पूर्व अग्नीचे ठायींच अग्निहोत्रादिविषयक आहेत . अपत्नीकाला आधान करावयास सांगण्याकरितां नाहींत . यज्ञ सांगितल्यावरुन आधान करावें असें नाहीं . आणि " अपत्नीकाची आधानाविषयीं प्रवृत्ति नाहीं " असें मानवपरिशिष्टही आहे . सोमयाग होत नाहींच . कारण , " अपत्नीक तोही असोमप ( सोमपान न करणारा ) आहे " अशी श्रुति आहे . आतां जें भरद्वाजापस्तंबसूत्र - " जर भार्याकरण्याविषयीं अशक्त असेल तर आपल्याकरितां अग्न्याधान आहे . " त्याचा अर्थ असा - पुनः विवाहाविषयीं अशक्त असेल तर जें अग्न्याधान पूर्वीं केलेलें आहे तें आपल्याकरितांच ठेवावें , पत्नीला देऊं नये . ब्राह्मणभाष्य , अपरार्क , आशार्क , रामांडार इत्यादि ग्रंथांचें तत्त्वही असेंच आहे . त्रिकांडमंडन तर दोन पक्ष सांगता झाला . अन्यही ग्रंथकार अपत्नीकाला आधान सांगतात , त्यांचा आशय समजत नाहीं . वृद्धयाज्ञवल्क्य - " आहिताग्नीचा तीन अग्नींनीं यथाशास्त्र दाह करावा . अनाहिताग्नीचा एक ( गृह्य ) अग्नीनें दाह करावा . इतर मनुष्याचा लौकिकाग्नीनें दाह करावा . " क्रतु - " चांगल्या वर्तनाची सवर्णा ( आपल्या वर्णाची ) स्त्री पूर्वीं मृत असतां तिचा दाह धर्मवेत्त्या द्विजानें अग्निहोत्रानें व यज्ञपात्रांनीं करावा . " कारिकेंत - " पत्नी जर भर्त्याच्या आदीं मृत होईल तर तिलाही अशीच अग्निहोत्रानें दग्ध करावी . अग्निरहित असेल ती कपालाग्नीनें दग्ध करावी . "

आशौचप्रकाशेक्रतुः विधुरंविधवांचैवकपालस्याग्निनादहेत् ब्रह्मचारीयतीचैवदहेदुत्तपनाग्निना तुषाग्निनाचदग्धव्यः कन्यकाबालएवच अग्निवर्णंकपालंतुकृत्वातत्रविनिक्षिपेत् करीषादिततोवह्निर्जातोयः सकपालजः अनुपनीतेयद्यपिजातारण्यग्निः कैश्चिदुक्तस्तथापितस्यकलौनिषिद्धत्वोक्तेरयमेवज्ञेयः स्मृत्यंतरे गृहस्थोब्रह्मचारीचविधुरोविधवाः स्त्रियः औपासनश्चोत्तपनस्तुषाग्निस्तुकपालजः उत्तपनस्तु दर्भाग्नेग्निंतुप्रज्वाल्यपुनर्दर्भैस्तुसंयुतः पुनर्दर्भैस्तृतीयोग्निरेष उत्तपनः स्मृतः यमः यस्यानयतिशूद्रोग्निंतृणकाष्ठहवींषिच प्रेतत्वंचसदातस्यसचाधर्मेणलिप्यते देवलः चंडालाग्निरमेध्याग्निः सूतिकाग्निश्चकर्हिचित् पतिताग्निश्चिताग्निश्चनशिष्टग्रहणोचितः मनुः दक्षिणेनमृतंशूद्रंपुरद्वारेणनिर्हरेत् ‍ पश्चिमोत्तरपूर्वैस्तुयथासंख्यंद्विजातयः अत्रप्रातिलोभ्येनक्रमः पूर्वामुखस्तुनेतव्योब्राह्मणोबांधवैर्गृहात् उत्तराभिमुखोराजावैश्यः पश्चान्मुखस्तथा दक्षिणाभिमुखः शूद्रोनिर्हर्तव्यः स्वबांधवैरित्यादिपुराणादित्यपरार्कः तेनत्रिंशच्छ्लोक्युक्तोनुलोमक्रमोहेयः आश्वलायनः ज्येष्ठप्रथमाः कनिष्ठजघन्यागच्छेयुः ।

आशौचप्रकाशांत क्रतु - " विधुर आणि विधवा यांचा कपालाग्नीनें दाह करावा . ब्रह्मचारी व यति यांचा उत्तपनाग्नीनें दाह करावा . कन्या व बालक यांचा तुषाग्नीनें दाह करावा . कपाल अग्नीसारखें लाल करुन त्यांत गोंवरी वगैरे घालून झालेला जो अग्नि तो कपालाग्नि होय . " अनुपनीताविषयीं जरी जातारणीसंबंधी अग्नि कित्येकांनीं सांगितला आहे तरी तो कलियुगांत निषिद्ध सांगितल्यामुळें हाच ( तुषाग्निच ) जाणावा . स्मृत्यंतरांत - " गृहस्थाला औपासनाग्नि , ब्रह्मचार्‍याला उत्तपनाग्नि , विधुर व विधवा स्त्रिया यांना तुषाग्नि तोच कपालाग्नि होय . " उत्तपनाग्नि असा - " दर्भाचीं अग्रें प्रज्वलित करुन पुनः दुसरे दर्भ त्याजवर पेटवावे . नंतर त्याजवर पुनः दर्भ पेटवून तिसर्‍या दर्भांचा जो अग्नि तो उत्तपन म्हटला आहे . " यम - " ज्याचा अग्नि , तृणें , काष्ठें आणि हवि हीं शूद्र आणतो त्याला सर्वदा प्रेतत्व असतें , व तो शूद्र अधर्मानें लिप्त होतो . " देवल - " चांडालाग्नि , अशुद्धअग्नि , सूतिकाग्नि , पतिताग्नि , आणि चितेचा अग्नि हे शिष्टांना ग्रहण करण्यास उचित नाहींत . " मनु - " मृतशूद्राला नगराच्या दक्षिणेकडच्या द्वारानें स्मशानांत न्यावा . नगराच्या पश्चिम द्वारानें वैश्यास न्यावा . उत्तर द्वारानें क्षत्रियास न्यावा . आणि ब्राह्मणाला नगराच्या पूर्व द्वारानें स्मशानांत न्यावा . " या वचनांत शूद्र , वैश्य , क्षत्रिय , ब्राह्मण असा प्रतिलोम ( उलट ) क्रम आहे . कारण , " मृत झालेला ब्राह्मण बांधवांनीं घरांतून पूर्वाभिमुख न्यावा . क्षत्रिय उत्तराभिमुख न्यावा . वैश्य पश्चिमाभिमुख न्यावा . आणि शूद्र बांधवांनीं दक्षिणाभिमुख न्यावा " असे आदिपुराणवचन आहे , असें अपरार्क सांगतो . यावरुन त्रिंशच्छ्लोकींत अनुलोम क्रम सांगितला तो त्याज्य आहे . आश्वलायन - " स्मशानांत जातेवेळीं ज्येष्ठ प्रथम व कनिष्ठ मागाहून असे जावे . "

आधानोत्तरंद्वितीयविवाहेकृतेयजमानमरणेश्रौतस्मार्ताग्न्योः संसर्गः बौधायनसूत्रे अथयद्याहिताग्निर्द्वेभार्येविंदेतप्राक्संयोगान्म्रियेतौपासनंसंपरिस्तीर्याज्यंविलाप्यचतुर्गृहीतंगृहीत्वासमिद्धत्यग्नौजुहोति संमितंसंकल्पेथामितिमिंदाहुतीर्व्याह्रतीश्चहुत्वाथैतमग्निमयंतेयोनिऋत्वियइतिसमिधिसमारोप्यगाईपत्येसमिधम भ्यादधातिभवतंनः समनसावितिगार्हपत्यआज्यंविलाप्यचतुर्गृहीतंगार्हपत्येजुहोत्यग्नावग्निश्चरतिप्रविष्टइत्यपरंचतुर्गृहीत्वाचितिः स्रुगितिसंग्रहंजुहोत्यथगार्हपत्येस्रुवाहुतीर्जुहोतिब्राह्मणएकहोतेतिदशभिरथप्राचीनावीत्यन्वा हार्यपचनेजुहोतियेसमानायेसजाताइतिद्वाभ्यामथतत्रैवस्रुवाहुतिंजुहोत्यग्नयेकव्यवाहनायस्विष्टकृतेस्वधानमः स्वाहेत्यथयज्ञोपवीतीद्वादशगृहीतेनस्रुचंपूरयित्वापुरुषसूक्तेनाहवनीयेजुहोत्यथस्रुवाहुतीर्जुहोत्यग्नयेविविचयेस्वाहाग्नयेव्रतपतयेग्नयेपवमानायाग्नयेपावकायाग्नयेशुचयेस्वाहाग्नयेपथिकृतेस्वाहाग्नयेतंतुमतेग्नयेवैश्वानरायेत्यथचतुर्गृहीतंजुहोतिमनोज्योतिरित्यतऊर्ध्वंपैतृकंकर्मप्रतिपद्यतेइति ।

आधानोत्तर दुसरा विवाह केला असतां यजमान मरेल तर श्रौताग्नि व स्मार्ताग्नि यांचा संसर्ग करावा . तो असा - बौधायनसूत्रांत - " आतां आहिताग्नीनें दोन भार्या केल्या व त्यांच्या अग्नींचा संयोग होण्यापूर्वीं जर यजमान मृत होईल तर त्याच्या औपासनाग्नीला परिस्तरण करुन आज्य ऊन करुन चार वेळां स्रुचींत घेऊन प्रज्वलित अग्नींत होम करावा . व मिंदाहुती व व्याह्रती यांचा होम करुन नंतर त्या अग्नीचा ‘ अयंतेयोनिऋत्विय० ’ ह्या मंत्रानें समिधेवर समारोप करुन गार्हपत्य अग्नींत ती समिध ‘ भवतं नः समनसौ० ’ ह्या मंत्रानें द्यावी . नंतर गार्हपत्यांत घृत ऊन चार वेळां घेऊन ‘ अग्नावग्निश्चरतिप्रविष्ट० ’ ह्या मंत्रानें गार्हपत्यांत होम करावा . पुनः चार वेळां घृत घेऊन ‘ चित्तिः स्रुग० ’ या मंत्रानें संग्रह होम करावा . नंतर ‘ ब्राह्मण एक होता० ’ ह्या दहा मंत्रांनीं गार्हपत्यांत स्रुवाहुतींचा होम करावा . नंतर प्राचीनावीती करुन ‘ येसमाना ’ , ‘ येसजाता ’ ह्या दोन मंत्रांनीं अन्वाहार्यपचनाग्नींत होम करावा . नंतर तेथेंच ‘ अग्नयेकव्यवाहनाय स्विष्टकृते स्वधानमः स्वाहा , ह्या मंत्रानें स्रुवाहुतीचा होम करावा . नंतर यज्ञोपवीती करुन बारा वेळ घृत घेऊन स्रुचा भरुन पुरुषसूक्तानें आहवनीयांत होम करावा . नंतर स्रुवाहुतींचा होम करावा . तो असा - ‘ अग्नये विविचये स्वाहा , अग्नये व्रतपतये स्वाहा , अग्नये पवमानाय , अग्नये पावकाय , अग्नये शुचयेस्वाहा , अग्नये पथिकृतेस्वाहा , अग्नये तंतुमते , अग्नये वैश्वानराय , नंतर चार वेळां घृत घेऊन ‘ मनोज्योति० ’ या मंत्रानें होम करावा . इतकें झाल्यावर और्ध्वदेहिक कर्म प्राप्त होतें तें करावें . "

आहिताग्नौविदेशमृतेपथिकृतीष्टिर्मृताग्निहोत्रंतद्दाहः पात्रयोजनंचकल्पसूत्रादिभ्योस्मत् पितामहकृतपद्धतेश्च ज्ञेयमितिबहुवक्तव्येप्युपरम्यते स्मार्ताग्नेस्तुउक्तं मदनरत्नेछंदोगपरिशिष्टेच दुर्बलंस्नापयित्वातुशुद्धचैलाभिसंवृतं दक्षिणाशिरसंभूमौबर्हिष्मत्यांनिवेशयेत् घृतेनाभ्यक्तमाप्लाव्यशुद्धवस्त्रोपवीतिनं चंदनोक्षितसर्वांगंसुमनोभिर्विभूषयेत् हिरण्यशकलान्यस्यक्षिप्त्वाछिद्रेषुसप्तसु मुख्येष्वथापिधायैनंनिर्हरेयुः सुतादयः आमपात्रेन्नमादायप्रेतमग्निपुरः सरं एकोनुगच्छेत्तस्यार्धमर्धपथ्युत्सृजेद्भुवि ऊर्ध्वमादहनंकार्यमासीनोदक्षिणामुखः सव्यंजान्वाच्यशनकैः सतिलंपिंडदानवत् अथपुत्रादिराप्लुत्यकुर्याद्दारुचयंमहत् तत्रोत्तानंनिपात्यैनंदक्षिणाशिरसंमुखे आज्यपूर्णंस्रुवंदद्याद्दक्षिणाग्रांनसिस्रुचं पादयोरधरांप्राचीमरणीमुरसीतरां पार्श्वयोः शूर्पचमसौसव्यदक्षिणयोः क्रमात् सुसमेतुन्यसेन्न्युब्जमंतरुर्वोरुलूखलं चात्रोविलीढमत्रैवअग्नयेरप्ययंविधिः अपसव्येन कृत्वैतद्वाग्यतः पितृदिड्मुखः अथाग्निंसव्यमावृत्कोदद्याद्दक्षिणतः शनैः अस्मात्त्वमधिजातोसित्वदयंजायतांपुनः असौस्वर्गायलोकायस्वाहेतिपरिकीर्तयेत् तथा एवमेवाहिताग्नेश्चपात्रन्यासादिकंभवेत् ‍ कृष्णाजिनादिकंचात्रविशेषोध्वर्युचोदितः तत्रैव अनयैवावृतानारीदग्धव्यायाव्यवस्थिता अग्निप्रदानमंत्रोस्यानप्रयोज्यइति स्थितिः इदंछंदोगानामेव पात्रन्यासोक्तेरुत्तानदेहत्वंसाग्निपरं निरग्निस्तुपुमानधोमुखः स्त्रीतूत्तानादाह्यासगोत्रजैर्गृहीत्वातुचितामारोप्यतेशवः अधोमुखोदक्षिणादिक् चरणस्तुपुमानिति उत्तानदेहानारीतुसपिंडैरपिबंधुभिरित्यादिपुराणादितिशुद्धितत्त्वहारलतादयः उत्तरशिरस्त्वंसामगेतरपरं वाराहेत्वग्निदानेऽन्योमंत्रः कृत्वातुदुष्कृतंकर्मजानतावाप्यजानता मृत्युकालवशंप्राप्यनरंपंचत्वमागतं धर्माधर्मसमायुक्तंलोभमोहसमावृतं दहेयंसर्वगात्राणिदिव्यांल्लोकान् सगच्छतु ज्वलमानंमहावह्निंशिरः स्थानेप्रदापयेत् चतुर्वर्णेषुसंस्थानमेवंभवतिपुत्रके ।

आहिताग्नि विदेशांत मृत असतां पथिकृति इष्टि , मृताचें अग्निहोत्र , त्याचा दाह , पात्रयोजना हें सारें कल्पसूत्रादिकांतून व आमच्या पितामहांनीं केलेल्या पद्धतींतून जाणावें , मी पुष्कळ सांगावयाचें आहे तरी पुरे करितों . स्मार्ताग्नीला तर सांगतो मदनरत्नांत छंदोगपरिशिष्टांत - " मृताला स्नान घालून शुद्ध वस्त्रानें वेष्टित करुन दक्षिणेकडे मस्तक करुन कुशयुक्त भूमीवर ठेवावा . घृत अंगाला लावून स्नान घालून शुद्ध वस्त्र व उपवीत घालून सर्वांगावर चंदन शिंपून पुष्पांनीं भूषित करावा . प्रेताच्या मुख , नासिका , कर्ण , डोळे या सात छिद्रांत सुवर्णाचे तुकडे घालून नंतर त्याला आच्छादित करुन पुत्रादिकांनीं स्मशानांत न्यावा . अग्नि पुढें व त्याच्या मागाहून प्रेत न्यावें . अपक्क पात्रांत अन्न घेऊन एकानें प्रेताच्या मागाहून जावें . त्यांतील अर्धै अन्न अर्ध्यामार्गांत टाकावें . पुढचें दहनापर्यंत कृत्य दक्षिणेकडे तोंड करुन बसून डावा गुडघा भूमीवर टेंकून पिंडदानाप्रमाणें तिलसहित करावें . प्रेत स्मशानांत नेल्यावर पुत्रादिकांनीं स्नान करुन काष्ठांचा मोठा ढीग रचावा . त्या काष्ठांवर प्रेत उताणें दक्षिणदिशेस मस्तक करुन ठेवावें . प्रेताच्या मुखांत घृतानें पूर्ण भरलेला स्रुवा द्यावा . नाकांत दक्षिणेस अग्र करुन स्रुचा द्यावी . खालची अरणी दोन पायांवर द्यावी . उरावर वरची अरणी द्यावी . डाव्या पार्श्वभागीं सूप आणि उजव्या पार्श्व भागीं चमसपात्र द्यावें . मांड्यांच्या मध्यभागीं खालीं तोंड केलेलें उखळ ठेवावें . (?).... वाणीचें नियमन करुन दक्षिणदिशेस मुख करुन हें सारें प्राचीनावीतीनें करावें नंतर दक्षिणदिशेकडे अग्नि लावून अप्रदक्षिण हळूहळू अग्नि सभोंवतीं लावावा व मंत्र म्हणावा तो असा - ‘ अस्मात्त्वमधिजातोसि त्वदयं जायतां पुनः । असौ स्वर्गाय लोकाय स्वाहा ’ याचा उच्चार करावा . " तसेंच - " अग्निहोत्र्याच्या प्रेतावर पात्रें ठेवणें वगैरे कृत्य असेंच समजावें . याच्या प्रेतावर कृष्णाजिन वगैरे विशेष अध्वर्यूनें सांगितला असेल तो समजावा . तेथेंच - सुशील जी स्त्री तिचा दाह अशाच रीतीनें करावा . स्त्रियेच्या दाहाविषयीं अग्निदानमंत्राचा प्रयोग करुं नये , अशी शास्त्रमर्यादा आहे . " हें वचन छंदोगांचे शाखेलाच लागू आहे . पात्रांचें स्थापन सांगितल्यामुळें प्रेतशरीर उताणें असावें , हें अग्निमान् असेल त्याजविषयीं समजावें . निरग्निक असेल तर पुरुष अधोमुख , आणि स्त्री उताणी जाळावी . कारण , " गोत्रजांनीं पुरुष शव घेऊन अधोमुख करुन दक्षिणदिशेस पाय करुन चितेवर ठेवावा . आणि सपिंड व बांधव यांनीं स्त्रियेचा देह उताणा करुन चितेवर ठेवावा " असें आदिपुराणवचन आहे , असें शुद्धितत्त्व , हारलता इत्यादि ग्रंथकार सांगतात . उत्तर दिशेस मस्तक करणें हें सामगव्यतिरिक्तांस समजावें . वाराहांत तर अग्निदानाविषयीं दुसरा मंत्र सांगितला आहे , तो असा - ‘ कृत्वा तु दुष्कृतं कर्म जानता वाप्यजानता । मृत्युकालवशं प्राप्य नरं पंचत्वमागतं । धर्माधर्मसमायुक्तं लोभमोहसमावृतं । दहेयं सर्वगात्राणि दिव्यान् लोकान् स गच्छतु । ’ " पेटणारा मोठा अग्नि मस्तकस्थानीं द्यावा . चारी वर्णांच्या प्रेतांविषयीं अशी व्यवस्था होते . "

अत्रक्रियानिबंधेगारुडेषटपिंडदानमुक्तं मृतस्योत्क्रांतिसमयेषटपिंडान्क्रमशोददेत् मृतिस्थानेतथा द्वारिचत्वरेतार्क्ष्यकारणात् विश्रामेकाष्ठचयनेतथासंचयनेचषट तथा आदौदेयास्तुषटपिंडादशदेयादशाहिकाः स्थानेचार्धपथेतीतेचितायांशवहस्तके श्मशानवासिभूतेभ्यः षष्ठंसंचयनेतथा ततः त्वंभूतकृज्जगद्योनेत्वंलोकपरिपालकः उक्तः संहारकस्तस्मादेनंस्वर्गंमृतंनय इत्यग्निंदत्वाऽस्मात्त्वमितिमंत्रेणार्धदग्धेआज्याहुतिरुक्ता आहिताग्नौपराशरः शम्यांशिश्नेविनिक्षिप्यअरणीमुष्कयोरपि जुहूंचदक्षिणेहस्तेवामेतूपभृतंन्यसेत् शिश्नेतूलूखलंदद्यात्पृष्ठेचमुसलंन्यसेत् उरसिक्षिप्यदृषदंतंडुलाज्यतिलान्मुखे श्रोत्रेचप्रोक्षणींदद्यादाज्यस्थालींचचक्षुषोः कर्णेनेत्रेमुखेघ्राणेहिरण्यशकलंन्यसेत् अग्निहोत्रोपकरणमशेषंतत्रनिक्षिपेत् ।

या स्थळीं क्रियानिबंधांत गारुडांत सहा पिंडांचें दान सांगितलें आहे - " मृताच्या प्राणोत्क्रमणसमयीं सहा पिंड क्रमानें द्यावे . ते असे - मरणस्थानीं , घराच्या द्वारांत , चवाठ्यावर , विश्रांति करण्याच्या स्थळीं , काष्ठांचा ढीग केला असेल त्या ठिकाणीं , आणि संचयनाचे ठिकाणीं , असे सहा पिंड द्यावे . " तसेंच - " पहिल्या दिवशीं सहा पिंड द्यावे . आणि दहा दिवसांचे दहा पिंड द्यावे . मरणस्थानीं , अर्ध्या मार्गांत , चितेचे ठायीं , शवाच्या हातावर , स्मशानवासी भूतांसाठीं इतक्या ठिकाणीं एक एक पिंड देऊन सहावा पिंड संचयनाचे ठिकाणीं द्यावा . " तदनंतर - ‘ त्वं भूतकृज्जगद्योने त्वं लोकपरिपालकः । उक्तः संहारकस्तस्मादेनं स्वर्गं मृतं नय . ’ ह्या मंत्रानें अग्नि देऊन अर्धदग्ध झालें असतां ‘ अस्मात्त्वं० ’ ह्या मंत्रानें आज्याहुति सांगितली आहे . अग्निहोत्र्याविषयीं पराशर सांगतो - " शिश्नाचेठायीं शमी ठेवावी . दोन अरणी दोन वृषणांवर ठेवाव्या . दक्षिण हस्तांत जुहू आणि वामहस्तांत उपभृत् ठेवावी . शिश्नाचे ठायीं उखळ व पाठीवर मुसळ ठेवावें . उरावर पाषाण , मुखांत तांदूळ , आज्य व तिल घालावे . कर्णाचे ठायीं प्रोक्षणी द्यावी . नेत्रांवर आज्यस्थाली ठेवावी . कानांत , नेत्रांत , मुखांत आणि नाकांत सुवर्णाचे तुकडे ठेवावे . याप्रमाणें अग्निहोत्राचीं सारीं उपकरणें त्या प्रेतावर ठेवावीं . "

प्रचेताः स्नानंप्रेतस्यपुत्राद्यैर्वस्त्राद्यैः पूजनंततः नग्नदेहंदहेन्नैवकिंचिद्देयंपरित्यजेत् यमः प्रेतंदहेच्छुभैर्गंधैः स्नपितंस्रग्विभूषितं आश्वलायनसूत्रे संस्थितेप्रेतालंकारान्कुर्वंतिकेशश्मश्रुलोमनखानिवापयंतिनलदेनानुलिंपंतिनलदमालांप्रतिमुंचंतीति माधवीयेब्राह्मे दरिद्रोपिनदग्धव्योनग्नः कस्यांचिदापदि तथा निः शेषस्तुनदग्धव्यः शेषंकिंचित्त्यजेन्नरः दाहकालेग्निनाशेतु मदनरत्नेयज्ञपार्श्वः यजमानेमृतेक्कापिचितादौवाप्रवेशिते वर्षाद्यभिहतेग्नौतुकथंप्रेतविकल्पना शेषंदग्ध्वाप्रदग्धेषुनिर्मंथ्यैवतुकारयेत् अथपर्णशरादिदाहेनाग्निनाशेपश्चात्तद्देहलाभेमदनरत्नेब्राह्मे अथपर्णशरेदग्धेपात्रन्यासेकृतेसति गतेष्वग्निषुतद्देहोयदूर्ध्वंलभ्यते क्वचित् तदार्धदग्धकाष्ठानितानिनिर्मंथ्यतंदहेत् यद्यर्धदग्धकाष्ठंतुतदीयंवैनलभ्यते तदातदस्थिखंडंतुनिक्षिप्तव्यं महाजले ।

प्रचेता - " पुत्रादिकांनीं प्रेताला स्नान घालून तदनंतर वस्त्रादिकांनीं पूजन करावें . नग्न देहाचें दहन करुं नये . कांहीं देय टाकावें . " यम - " शुभकारक गंधोदकांनीं प्रेताला स्नान घालून मालांनीं भूषित करुन त्याचा दाह करावा . " आश्वलायनसूत्रांत - " मृत झाला असतां प्रेताला अलंकार करितात . त्याचे केश , श्मश्रु , लोम व नखें यांचें वपन करितात . त्याला वाळ्याची उटी लावितात . व वाळ्याची माळ घालितात . " माधवीयांत ब्राह्मांत - " दरिद्री असून कोणतीही आपत्ति असली तरी नग्नाचा ( वस्त्ररहिताचा ) दाह करुं नये . तसेंच निःशेष दाह करुं नये , शेष कांहीं तरी टाकावें . " दाहकालीं अग्नि नष्ट झाला असतां मदनरत्नांत यज्ञपार्श्व सांगतो - " यजमान मृत असून त्याला चितेवर ठेविला असतां पर्जन्यादिकेंकरुन अग्नि नष्ट झाला असेल तर प्रेताची व्यवस्था कशी करावी ? मंथन करुन अग्नि करावा . यज्ञोपकरणें दग्ध होऊन प्रेत अदग्ध असेल तरी मंथन करुनच अग्नि करावा . " आतां पर्णशरादि दाह करुन अग्नि नष्ट झाला असून पश्चात् देह मिळाला असतां मदनरत्नांत ब्राह्मांत - ‘‘ आतां पर्णशर दाहाच्या वेळीं पात्रें वगैरे सर्व जाळून अग्नि नष्ट झाले असून पश्चात् जर त्याचा देह क्वचित् मिळेल तर अर्धीं दग्ध काष्ठें मंथन करुन त्या अग्नीनें देहाचा दाह करावा . तत्संबंधीं अर्धदग्धकाष्ठ जर न मिळेल तर त्या वेळीं त्याच्या अस्थींचा तुकडा मोठ्या उदकांत टाकावा . "

दंपत्योरेकदामृतौविशेषमाहापस्तंबः तथैवप्रेतेसहैवपितृमेधोद्विवचनलिंगान्मंत्रान्संधारयंति पितृमेधो दाहांतंकर्म दाहांतमेकतंत्रत्वमितिबौधायनोक्तेः अस्थिसंचयनमप्येकं उदकपिंडदानादिपृथगेव सहगमनेप्येवं तदाहमदनरत्नेभाष्यार्थसंग्रहकारः एककालमृतौभार्याभर्ताचयदिचेद्दूयोः तंत्रेणदहनंकुर्यात्पिंडश्राद्धंपृथक् पृथक् एककालेमृतौजायापतीयदितदापितुः विभज्याग्निंक्रियांकुर्यादितियत्तदसांप्रतं दाहांतमेकतंत्रत्वमितियाज्ञिकसंमतं मृतंपतिमनुव्रज्ययानारीज्वलनंगता अस्थिसंचयनांतेस्याभर्तुः संस्कारएवहि कीकसानांतुसंस्कारोन्यायसिद्धोपियोमतः एककालेमृतेप्येवंकीकसानांविधिः स्मृतः नवश्राद्धंसपिंडांतंभिन्नकालमृतौयथ्हा कपर्दिकारिकापि मृतेभर्तरितद्दाहात्प्राक्पत्नीम्रियतेयदि पत्न्यांवाप्राक्प्रमीतायां दाहादर्वाक्पतिर्मृतः तत्रतंत्रेणदाहः स्यान्मंत्रेषुद्वित्वमूह्यते कीकसानांतुसंस्कारः पृथगेवतयोर्भवेत् एकाहमृत्यौयुगपन्नवश्राद्धादिकंतयोः मृतंपतिमनुव्रज्यपत्नीचेदनलंगता तत्रापिदाहस्तंत्रेणपृथगस्थिक्रियाभवेत् अस्थिसंचयनपृथक्त्वेविकल्पः सहगमनेसर्वत्रपाकैक्यमाहप्रचेताः एकचित्यांसमारुढौम्रियेतेदंपतीयदि तंत्रेणश्रपणंकुर्यात्पृथक् पिंडंसमाचरेत् ।

दंपती एका वेळीं मृत असतां विशेष सांगतो आपस्तंब - " दंपती असेच मृत असतां पितृमेध ( दाहांत कर्म ) दोघांचें बरोबरच होतें . या ठिकाणीं मंत्रांचा द्विवचनेंकरुन उच्चार करितात . " या वचनांत पितृमेध म्हणजे दाहांत कर्म होय . कारण , " दाहांतकर्माचें एकतंत्र करावें " असें बौधायनवचन आहे . अस्थिसंचयनही दोघांचें एकच आहे . उदक , पिंडदान इत्यादि वेगवेगळेंच करावें . स्त्रियेचें सहगमन असतांही असेंच समजावें , तें सांगतो मदनरत्नांत भाष्यार्थसंग्रहकार - " भार्या आणि पति दोघे असामी जर एककालीं मृत होतील तर त्या दोघांचा दाह तंत्रानें करावा . पिंडदान व श्राद्ध वेगवेगळें करावें . जर एककालीं भार्या व पति मृत असतील तर त्या वेळीं अग्नीचा विभाग करुन पित्याची क्रिया करावी , असें जें मत तें अयुक्त आहे . " दाहांतकर्म एकतंत्रानें करावें , हें याज्ञिकांना संमत आहे . " मृत झालेल्या पतीच्या मागांहून जाऊन जी पत्नी अग्निप्रवेश करिते तिचा अस्थिसंचयनापर्यंत संस्कार भर्त्याच्याच संस्कारांत होतो , निराळा नाहीं . अस्थींचा संस्कार न्यायसिद्ध जो तोही एककालीं मृत असतांही असाच विधि सांगितला आहे . नवश्राद्ध व सपिंडीकरणापर्यंत भिन्नकालीं मृत असतां जसें होतें तसें एककालीं मृत असतांही होतें . " कपर्दिकारिकाही - " भर्ता मृत असतां त्याच्या दाहापूर्वीं जर पत्नी मृत होईल तर अथवा पत्नी पूर्वीं मृत असतां तिच्या दाहाच्या पूर्वीं जर पति मृत होईल तर त्या दोघांचा तंत्रानें दाह होतो . मंत्रांचे ठिकाणीं द्विवचनाचा ऊह करावा . त्या दोघांचा अस्थींचा संस्कार वेगवेगळाच होतो . एक दिवशीं दोघे मृत असतां त्या दोघांचें नवश्राद्धादिक एकदम होतें . मृत झालेल्या पतीच्या मागांहून जाऊन पत्नी जर अग्नींत प्रवेश करील तर त्या वेळीं देखील दाह तंत्रानें होतो . व अस्थिक्रिया वेगवेगळी होईल . " ह्या वरील वचनावरुन अस्थिसंचयन वेगळें करण्याविषयीं विकल्प होतो . सहगमन असतां सर्वत्र ठिकाणीं पाक एक सांगतो प्रचेता - " एक चितीवर आरोहण करुन दंपती ( स्त्री व पुरुष ) मृत होतील तर तंत्रानें पाक करुन वेगवेगळा पिंड द्यावा . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP