मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
प्रेत निर्हरणादिकांचें आशौच

तृतीय परिच्छेद - प्रेत निर्हरणादिकांचें आशौच

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां प्रेत निर्हरणादिकांचें आशौच सांगतो -

अथनिर्हाराद्याशौचम् ‍ स्नेहेनसवर्णनिर्हारेतदन्नाशनेतद्गृहवासेचदशाहः तदन्नानशनेतद्गृहवासेत्र्यहः गृहावासेन्नाभक्षणेचैकाहः भृतिग्रहणेननिर्हारेदाहेचतज्जात्याशौचं यदिनिर्हरतिप्रेतंप्रलोभाक्रांतमानसः दशाहेनद्विजः शुध्येद्दादशाहेनभूमिपः मासार्धेनचवैश्यस्तुशूद्रोमासेनशुध्यतीतिकौर्मोक्तेः विजातीयनिर्हारेतुशवजातीयमाशौचं अत्रभृतिग्रहेद्विगुणं अवरश्चेद्वरंवर्णंवरोवाप्यवरंयदि वहेच्छवंतदाशौचंद्रव्यार्थेद्विगुणंभवेदितिव्याघ्रोक्तेः कौर्ममेतदितिगौडाः दाहेप्येवं यत्तुब्राह्मे योसवर्णंतुमूल्येननीत्वाचैवदहेन्नरः आशौचंतुभवेत्तस्यप्रेतजातिसमंनृपेति तदापदिज्ञेयं सोदकनिर्हारेतुदशाहइतिमाधवः अलंकरणेतुशंखः कृच्छ्रपादोऽसपिंडस्यप्रेतालंकरणेकृते अज्ञानादुपवासः स्यादशक्तौस्नानमिष्यते धर्मार्थमनाथसवर्णहरणेक्रियाकरणेचद्विजस्यानंतयज्ञफलं स्नानंप्राणायामोग्निस्पर्शश्चेतिमाधवीये अग्निदेप्येवं प्रेतसंस्पर्शसंस्कारैर्ब्राह्मणोनैवदुष्यति वोढाचैवाग्निदाताचसद्यः स्नात्वाविशुध्यतीत्यपरार्के वृद्धपराशरोक्तेः मातुलत्वादिसंबंधेत्रिरात्रं असंबंधिद्विजान्वहित्वादहित्वाचसद्यः शौचंसंबंधेत्रिरात्रमितिपैठीनसिस्मृतेः ।

स्नेहाच्या योगानें आपल्या जातीचें प्रेत नेलें असतां त्याचें अन्न भक्षण करुन त्याच्या घरीं वास करील तर दहा दिवस आशौच . त्याचें अन्न भक्षण न करितां त्याच्या घरीं वास करील तर तीन दिवस आशौच . त्याच्या घरीं वासही करीत नाहीं व अन्नही भक्षण करीत नाहीं तर एक दिवस आशौच . द्रव्य घेऊन प्रेत नेईल व त्याचा दाह करील तर आपल्या जातीचें आशौच समजावें . कारण , " द्रव्यलोभानें जर प्रेत नेईल तर ब्राह्मण दहा दिवसांनीं शुद्ध होईल , क्षत्रिय बारा दिवसांनीं , वैश्य पंधरा दिवसांनीं , आणि शूद्र एका महिन्यानें शुद्ध होतो " असें कौर्मवचन आहे . भिन्न जातीचें प्रेत नेईल तर प्रेताच्या जातीचें आशौच . भिन्न जातीचें प्रेत नेण्याविषयीं मजुरी घेईल तर दुप्पट आशौच . कारण , " कमी जातीचा मनुष्य उत्तम जातीच्या प्रेताला वाहील अथवा उत्तम जातीचा मनुष्य कमी जातीच्या प्रेताला वाहील तर त्या प्रेताच्या जातीचें आशौच त्याला प्राप्त होईल . आणि द्रव्यासाठीं वाहील तर दुप्पट आशौच होईल . " असें व्याघ्रवचन आहे . हें कौर्मवचन असें गौड म्हणतात . दाहाविषयीं देखील असेंच समजावें . आतां जें ब्राह्मांत - " जो मनुष्य दुसर्‍या जातीच्या प्रेताला मजुरीनें नेऊन दहन करील त्याला प्रेताच्या जातीसारखें आशौच होईल . " येथें दुप्पट सांगितलें नाहीं , तें आपत्कालीं समजावें . समानोदक प्रेताचें निर्हरण केलें तर दहा दिवस आशौच , असें माधव सांगतो . प्रेताला अलंकार करील तर सांगतो शंख - " असपिंडाच्या प्रेताला अलंकार करील तर पादकृच्छ्र प्रायश्चित्त करावें . अज्ञानानें करील तर उपवास करावा . उपवासाविषयीं शक्ति नसेल तर स्नान करावें . धर्मासाठीं अनाथ अशा समानवर्णाच्या प्रेताचें निर्हरण व क्रिया करील तर द्विजाला अनंत यज्ञाचें फल प्राप्त होतें . स्नान , प्राणायाम व अग्निस्पर्श करावा म्हणजे शुद्धि होते , असें माधवीयांत सांगितलें आहे . अग्नि देणार्‍याविषयीं देखील असेंच समजावें . कारण , " प्रेताचा स्पर्श व संस्कार केल्यानें ब्राह्मण दोषी होत नाहीं . प्रेत वाहणारा व अग्नि देणारा तत्काल स्नान करुन शुद्ध होतो " असें अपरार्कांत वृद्धपराशरवचन आहे . मातुल इत्यादिसंबंधी प्रेत असेल तर तीन दिवस आशौच . कारण , " संबंधरहित अशा द्विजांचीं प्रेतें वाहून व जाळून सद्यः शौच होतें . संबंधी प्रेत असेल तर तीन दिवस आशौच . " अशी पैठीनसिस्मृति आहे .

गौतममिताक्षरायांवृद्धात्रिः सूतकाद्दिगुणंशावंशावाद्दिगुणमार्तवं आर्तवाद्दिगुणासूतिस्ततोपिशवदाहकः अत्रपूर्वेणोत्तरनिवृत्तिरित्यर्थः विष्णुः मृतंद्विजंनशूद्रेणहारयेन्नशूद्रंद्विजेन देवलः ब्रह्मचारीनकुर्वीतशववाहादिकक्रियाम् ‍ यदिकुर्याच्चरेत्कृच्छ्रंपुनः संस्कारमेवच याज्ञवल्क्यः आचार्यपित्रुपाध्यायानिर्ह्रत्यापिव्रतीव्रती अनुगमनेतुसपिंडेनदोषः विहितंहिसपिंडानाप्रेतनिर्हरणादिकं तेषांकरोतियः कश्चित्तस्याधिक्यंनविद्यतइतिदेवलोक्तेः दोषः स्यात्त्वसपिंडस्यतत्रानाथक्रियांविनेतिहारीतोक्तेश्च समोत्कृष्टवर्णेतुमाधवीयेकण्वः अनुगम्यशवंबुद्ध्यास्नात्वास्पृष्ट्वाहुताशनं सर्पिः प्राश्यपुनः स्नात्वाप्राणायामैर्विशुध्यतीति हीनवर्णेतु क्षत्रियेहः वैश्येपक्षिणी शूद्रेत्रिरात्रम् ‍ क्षत्रियस्यवैश्येहः शूद्रेपक्षिणी वैश्यस्यशूद्रेहरितिविज्ञानेश्वरः माधवस्तु विप्रस्यवैश्येद्व्यहः क्षत्रस्यशूद्रेप्येवं अन्यत्प्राग्वत् ‍ स्नानाग्निस्पर्शघृताशनानिसर्वत्रेत्याहहीनवर्णस्यदाहौर्ध्वदेहिककरणेतु ब्राह्मे ब्राह्मणोहीनवर्णस्यनकुर्यादौर्ध्वदेहिकं कामाल्लोभात्तथामोहात्कृत्वातज्जातितांव्रजेत् ‍ मनुः व्रात्यानांयाजनंकृत्वापरेषामंत्यकर्मच अभीचारमहीनंचत्रिभिः कृच्छ्रैर्व्यपोहति परेषांसर्ववर्णानांहीनेषुतद्दैगुण्यत्रैगुण्यचातुर्गुण्याद्यूह्यम् ‍ ।

गौतममिताक्षरेंत वृद्धअत्रि - " जननाशौचापेक्षां मृताशौचाचा दोष दुप्पट आहे . मृताशौचाहून आर्तवाचा दोष दुप्पट आहे . आर्तवाहून सूतिकेचा दोष दुप्पट . आणि सूतिकेहून शवदाहकाचा दोष दुप्पट आहे . " यांत पूर्व आशौचानें पुढच्याची निवृत्ति होत नाहीं , असें तात्पर्य . विष्णु - ‘‘ मृत झालेल्या द्विजाला शूद्राकडून नेववूं नये . व शूद्राला द्विजाकडून नेववूं नये . " देवल - " ब्रह्मचार्‍यानें प्रेत वाहणें वगैरे कर्म करुं नये ; जर करील तर प्रायश्चित्तार्थ प्राजापत्यकृच्छ्र व पुनः संस्कार करावा . " याज्ञवल्क्य - " आचार्य , पिता आणि उपाध्याय यांच्या प्रेताला नेऊनही ब्रह्मचारी आपल्या व्रतापासून भ्रष्ट होत नाहीं . " सपिंडप्रेताला अनुगमन केलें तर दोष नाहीं . कारण , " सपिंडांना प्रेताचें वाहणें वगैरे शास्त्रविहित आहे . जो कोणी सपिंडप्रेताचें वाहणें वगैरे करितो त्याला अधिक दोष नाहीं " असें देवलवचन आहे . " अनाथप्रेतक्रियेवांचून असपिंडाच्या प्रेताचें वाहणें वगैरे करील तर दोष आहे . " असें हारीतवचनही आहे . आपल्या समानजातीचा किंवा उत्कृष्ट जातीचा प्रेत असेल तर सांगतो माधवीयांत कण्व - " बुद्धिपूर्वक प्रेताशीं अनुगमन करील तर स्नान करुन अग्निस्पर्श करुन घृतप्राशन करुन पुनः स्नान करुन प्राणायाम करावे , म्हणजे शुद्ध होतो . " हीन जातीच्या प्रेताशीं अनुगमन करील तर क्षत्रियाच्या प्रेताविषयीं एक दिवस ; वैश्यप्रेताविषयीं पक्षिणी ; शूद्रेप्रेताविषयीं तीन दिवस . वैश्यप्रेताविषयीं क्षत्रियाला एकदिवस . शूद्राच्या प्रेताविषयीं पक्षिणी . शूद्रप्रेताविषयीं वैश्याला एक दिवस . असें विज्ञानेश्वर सांगतो . माधव तर - ब्राह्मणाला वैश्याविषयीं दोन दिवस . क्षत्रियाला शूद्राविषयींही दोन दिवस आशौच . बाकीचें सारें पूर्वीं सांगितल्याप्रमाणें समजावें . स्नान , अग्निस्पर्श व घृतप्राशन हीं सर्वत्र आहेतच असें सांगतो . हीन जातीच्या प्रेताचा दाह , और्ध्वदेहिक कर्म उत्तम जातीचा मनुष्य करील तर सांगतो ब्राह्मांत - " ब्राह्मणानें हीन जातीच्या प्रेताचें और्ध्वदेहिक ( अंत्यकर्म ) करुं नये . कामाच्या योगानें किंवा लोभानें अथवा अविचारानें करील तर त्याच्या जातींत जाईल . " मनु - " उपनयनादि संस्काररहितांचें होम पूजा इत्यादि कर्म ; सर्व जातींच्या मनुष्यांचें अंत्यकर्म ; समान किंवा उत्तम जातीच्या मनुष्यांचें अभिचार ( जारण , मारण ) कर्म हीं केलीं असतां तीन प्राजापत्य कृच्छ्रांनीं शुद्ध होतो . " आपल्याहून हीन जातीचें करील तर क्षत्रियाचें केलें असतां द्विगुणित प्रायश्चित्त . वैश्याचें केलें तर त्रिगुणित . शूद्राचें करील तर चतुर्गुणित इत्यादि तर्कानें जाणावें .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP