मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ४९

ओवीगीते - संग्रह ४९

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


सासू आत्याबाई पाया पडते बागात

दिवाळीचं मूळ बंधू चालले रागात ।

सासू आत्याबाई मी माहेराले जाते

तुमच्या पोटीचा चंद्रहार संगं नेते ।

सासू सासर्‍याची पायाची पायरजी

सांगते भाऊ तुले गंभीरा बहिन तुजी ।

सासुरवासिनी मर मर तू पापिनी

आईबापाचे जलम तुन लावले घोकनी ।

सासूचा सासरवास नंदाची गांजणी

येल हा कारल्याचा फयाची काय उणी ।

बहिनीचा सासुरवास भावाच्या कानी गेला

उपसला झिरा तढी पानी नाही पेला ।

याहिनी याहिनी बसून खाऊ पान

बाईले सासरवास धाडाले नाही मन ।

याहिनी सवंदरा एका ताटी खाऊ भात

मैनाले सासरवास म्या आखडला हात ।

अशील महा पिता अशील खानोटा

जाबाले देते जाब जंगलच्या रानोटा ।

याही साधाबाधा याहीन मही राधा

कुढी पैदा करु हिच्या इडयाला सादा ।

सकाळी उठोनी दहीदूधाची न्याहारी

लेक महाजनाची भाग्यवंताची वहारी ।

सकाळी उठोनी माज्या हाती रही दोर

सासू सासर्‍यानं कामायी केली फार ।

सकाळी उठोनी सडा टाकू कापूराचा

गवयी बायाचा रंगमहाल चातुराचा ।

सकाळी उठोनी माजं बसनं दारात

सून सायतरी धंदा निवारे घरात ।

सून मूक पाहू सासु नंदाच्या मिटयात

हार पुतयाचा सून मालनच्या गयात ।

सून मूक पाहू माज्या वटीत खारका

सूनीचा मुखोटा लेका दसरता सारखा ।

शेर भर सोनं सुनाच्या पायाले

भरल्या बाजारात माज्या लवली पायाले ।

हळू हळू पाय टाक सून भागेरथी

तोडया पैंजणाचे पाय दारी चिरे दणाणती ।

पायातले बेले वाजती रुमझुम

मंदिरी गेली सून जागी व्हय आरजून ।

सून भागेरथा टाक पलंग खाटेले

बाळानं ग माज्या मंदिल लावले खुटीले ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP