मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|ओवी गीते : इतर|
संग्रह ६

ओवीगीते - संग्रह ६

सासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.


सासरी जाताना पाय टाकावा जपून

मान सासूचा राखून ।

जोडव्याचा पाय हळू टाकावा वैनीबाई

पाची पांडव माझे भाई ओटीवरी ।

नारीचं हासणं कोण्या प्रकाराचं

पाणी जाईल भ्रताराचं वैनीबाई ।

रागीट ग लेक भूक म्हणूनी नीजली

नाही साखर भिजली दूधामध्ये ।

सासरी जाती लेक शिकेकाईला आला कढ

नको रडूस वेणी सोड उषाताई ।

भ्रताराचा राग जसा इस्त्याचा इंगूळ

त्यांची मर्जी सांभाळ, सोनुताई ।

येसुबांदाच्या एक काडया कोटाच्या पाकीटात

बंधुजीला दृष्ट झाली पुण्याच्या नाटकात ।

अंतरीचं गुज सांगू नकोस कोणापाशी

यील वाकड एक दिवशी सोनुताई ।

सासरी जाते लेक पाणी लागल डगरीला

देती निरोप गडणीला ।

सासरी जाते लेक घोड बांधल लिंबूणीला

ऊन लागल चांदणीला ।

सासरी जाते लेक, लेक बघती मागपुढ

जीव गुंतला आईकडं ।

सासरी जाते लेक घोडं लागलं माळावरी

लिंबू फुटलं गालावरी ।

सासरी जाते लेक, लेकी लाडकी होऊ नको

हिरवी डाळिंब तोडू नको ।

सासरी जाते लेक कुणाची अनीवार

हाती सोन्याचे बिलवर ।

पहिल्यांदा गरभीण कथ पुशितो आड भिंती

तुला महिने झाले किती ।

पहिल्यांदा गरभीण तुझे डोहाळे कशाचे

चिन्ह दिसले लेकाचे ।

पहिल्यांदा गरभीण डोहाळे लागले जिन्नसाचे

झाड डोंगरी फणसाचे ।

पहिल्यांदा गरभीण तुझ्या न्यारीला झाली रात

तिला आणा ग मिरवीत ।

पहिल्यांदा गरभीण लिंब नारळी तुझ पोट

हिरव्या चोळीला जरीकाठ ।

पहिल्यांदा गरभीण तुझे डोहाळे अवघड

चल माझ्या तू गावाकडं ।

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP