मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ३३ ते ३८

परिशिष्ट पदे - पदे ३३ ते ३८

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ३३ वें
जान्हवी माये गंगे वो माये गंगे ॥ध्रु०॥
गंगे तुझें दर्शन होतां पातक सर्वही भंगे । मानस हरिच्या चरणीं रंगे चिन्मयरूपतरंगे ॥१॥
मानसदर्पणीं तव मुख बिंबे ऐसें करि तूं अंबे । तीर तुझें तें मी न विसंबे पावनपुलीननितंबे ॥२॥
तुझी नामें जपतों बुडी जनीं वनीं तुजला धुंडी । या ब्रह्मकुमंडलकुंडीं मजवरि अमृतकुंभ उलंडी ॥३॥
अपराधाच्या कोटी माझ्या साठवी आपुल्या पोटीं । श्रीशुकयोगींद्राच्या वोटींत मध्वमुनीश्वर लोटी ॥४॥

पद ३४ वें
रुपये लावुनी खडक फोडिले कूपामध्यें जळबिंदु नसे । कौपिन लावुनि स्नान करी तेव्हां हंस फार दळाळ धसे (?) । आचारे करिती पोच्यास्याची स्नान अंतरीं मळीन पानपिसे (?) । त्यास पवित्र करील कुमंडल तीर्थ पवित्र विचित्र दिसे ॥१॥
खडक डोकें फोडुनि घेतलें रडत असे उकसाबुकसी । भले भले तिहीं शिकविलें मज म्हणती मुला व्यर्थ ठकलासी । आंधळे पांगुळ तान्हेलें वोंगळ येकलें सांडुनि कोठें जासी । केली कृपा तरि राहे तूं या स्थळीं मध्वमुनीस गण हा बकसी ॥२॥
गाईचा खूर बुडे इतुकें जळ भूमीवरि उगलेंचि असे । वापीसरोवर कूप मनोहर नदीमधें जळबिंदु नसे । पाव गजावरि पाणी हें कोठील ऐसें न शोधितीं लोक पिसे । भाविक सात्त्विक शुद्र उपासक जान्हवीरूप तयांसि दिसे ॥३॥
सांपडलें मज विष्णुपदांबुजसंभवनीर मनोहर तें । लोक शतावधि नेति घरोघरीं उणें नव्हेची तसुभरि तें । या समयीं अती विस्मयकारक तारक जें निरसी दुरितें । मध्वमुनीश्वरस्वामीपदांबुजीं विन्मुख यासि असे दुरि तें ॥४॥
सांपडले मज ब्रह्मकमंडलुसंभव जान्हवीचें जळ जी । या स्थळीं स्नान करा जन हो तुम्हीं तीर्थ पहा अती प्रांजळ जी । देव गजानन पूजुनि त्यावरी वाहात जा कुसुमांजुळि जी । मध्वमुनीश्वर स्कंदपुराणिंचें वाचितो संमत मंजुळ जी ॥५॥

अभंग ३५ वा
नमन माझें तुम्हा काशीविश्वेश्वरा । माझी क्षमा करा अपराध ॥१॥
लोकांमध्यें माझे आरंभिलें हांसें । न कळे देवा कैसें करशील ॥२॥
तुझ्या उद्देशें आरंभिलें कूपा । तेथें उदक रूप न देखें मी ॥३॥
काय जटाजुडी आटली ते गंगा । सांगे ज्योतिर्लिंगा सिद्धेश्वरा ॥४॥
क्षारोदकें अभीषेक करूं केवी । म्हणोनी गंगादेवी प्रार्थीयेली ॥५॥
भोगावतीची मी पाहतसें वाट ।करणें पालट क्षारोदका ॥६॥
क्षारोदकें तुझ्या झडतील जटा । ब्रीदाचा झेंडा लावीन मी ॥७॥
दीनदयानिधी नव्हे चंद्रमौळी । ऐसे संतांजवळी सांगेन मी ॥८॥
पर्वतीं राहे जो त्यासी कैची दया । पार्वती हृदया आलिंगता ॥९॥
ऐकोनी करूणा नुपजसी चित्तीं । नाम पशुपती खरें केलें ॥१०॥
किंवा गरळाच्या आल्या त्या लहरी । म्हणोनी जगदीश्वरा न बोलसी ॥११॥
विषम स्थिति तुझी देखोनि शूलपाणी । आलें डोळां पाणी आमुचीया ॥१२॥
आतां मृत्युंजया राहे सुखरूप । उदकें माझा कूप भरूं नको ॥१३॥
भृंगीच्या धन्याचा धरी जो विश्वास । त्याची तो निरास होतसे ॥१४॥
ज्याच्या नंदिचीया वृषणासी हात । लाविलीया लात मारीतोहे ॥१५॥
पुढें सांभवाच्या हातीं लागे लिंग । पूजिता हा संग धूपदीप ॥१६॥
तुझ्या द्वारीं जरी केलें गलेवाल्ये । तरी कांहीं साध्य होणें नाहीं ॥१७॥
भुरळे घालूनी भोंदिले जोगड्या । ऐसें तुज गड्या न पाहिजे ॥१८॥
मध्वनाथ म्हणे मी तो भोळा भट्टू । कपटी गळेकाटू भेटलासी ॥१९॥

पद ३६ वें
अंबाविहार टोकी । दुर्लभ मानस लोकीं । न बुडे तो भवशोकीं हो ॥१॥
जय जय अंबाबाई वो । आरत तुझिया पायीं वो । करुणादृष्टी पाही वो । तुजवीण सद्गति नाहीं वो ॥२॥
वाराणसीहुनि आली हो । धाउनि मिठी घाली वो । दिव्य सुधारस प्याली हो । प्रसन्न दासा जाली वो ॥३॥
प्रचंड दुर्गा लाघवी हो । त्रिशूलखङ्गा वागवी हो । गोंधळ घालुनि जागवी हो । जोगव्यासी मागवी हो ॥४॥
शक्ती अवघ्या माजवी हो । महिमा आपुला गाजवी हो । डमरू वाद्यें वाजवी हो । वृत्ती मनाच्या लाजवी हो ॥५॥
घालुनि कंटक बाहिर हो । करिते मंगळ अहेर हो । मध्वमुनीचें माहेर हो । केलें संता जाहेर वो ॥६॥

पद ३७ वें
आनंदें मागूं जोगवा भवानीचा । नवरात्रीं घट मांडूं । जीवे ओवाळुनी सांडूं । कळिकाळासवें भांडूं । मोडूं दुर्मार्ग त्याचा ॥१॥
नाचो अंबेच्या रंगणीं । गोंधळ घालूनी पटांगणीं । भावें जाऊं लोटांगणीं । काया मनसा वाचा ॥२॥
अंबा नांदे सर्वाठायीं । ऐसीं चौंडक्याची घाईं । मध्वनाथ म्हणे आई । आदिपुरुष साचा ॥३॥

पद ३८ वें
जगदंबे देई मज सद्गती ॥ध्रु०॥
महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ॥१॥
आदिनारायणी योगमाया महासती ॥२॥
मातापुरनिवासिनी देवी भगवती ॥३॥
मातालयीं स्नानें करितां होती शुद्धमती ॥४॥
चहूंकडे शोभताती दिव्य वनस्पती ॥५॥
तुझा उपासक होतो राजा छत्रपती ॥६॥
मार्कंडेय वाचीतसे सप्तशती ॥७॥
ब्रह्मादिक देव तुला करिती पंचारती ॥८॥
वज्रचुडेमंडित तूं गंगा भागीरथी ॥९॥
उदयो उदयो म्हणतां सर्व विघ्नें निवारती ॥१०॥
मध्वनाथ म्हणे माझी उघडली रती ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP