मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ११ ते १९

व्यंकटेशाचीं पदें - पदे ११ ते १९

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ११ वें
तो हा वो बाई व्यंकट अति नाटकी ॥ध्रु०॥
ब्रह्मादिकां ध्याना न ये । गिरिवरि नांदे सये । निद्रा करी शेषाचिये मंचकीं ।तो हा॥१॥
घननीळ वनमाळी । दीनजना प्रतिपाळी । उद्धरी जो कळिकाळीं पातकी ।तो हा॥२॥
तोडुनिया भवपाशा । पुरवी जो भक्तआशा । मध्वनाथ म्हणे माझ्या मस्तकीं ।तो हा॥३॥

पद १२ वें
व्यंकटगिरिनिलया नेई भवसंकट विलया ॥ध्रु०॥
सुवर्णमुखरीतीरविहारा । सुवर्णमुक्तमणिमयहारा ॥१॥
पूर्ण परात्पर जगदाधारा । सुपर्णवहना दीनोद्धारा ॥२॥
मुकुट मनोहर कुंदलमंडित । सनकादिक तुज पूजिति पंडित ॥३॥
श्रीवत्सांकित कौस्तुभहृदया । शरणागतजनवत्सल सदया ॥४॥
कटितटिं मिरविसी छुरिकानंदक । तेणें तूं हरिसी निंदक ॥५॥
पुष्कळसुखदा हे पुष्करणी । कलयुगीं प्रगटली दुष्कृतहरिणी ॥६॥
मध्वमुनीश्वर गिरिवर नाचे । वर्णी वाचे गुण देवाचे ॥७॥

पद १३ वें
भजतां व्यंकटराज भक्तां कैचें संकट आज ॥ध्रु०॥
कौरवीं गांजितां द्रुपदसुतेची । वस्त्रें पुरवुनि राखिली लाज ॥१॥
नक्रापासुनि चक्रेंकरुनी । सोडविला मग तो गजराज ॥२॥
मुगुट मनोहर कुंडलमंडित । पीतांबर परिवेष्टित माज ॥३॥
पुष्करणीतटिं निर्भय करितो । या समयामध्यें तिमया राज्य ॥४॥
विजयादशमीदिवशीं गिरीवर । पूजिति मुनिवर अमरसमाज ॥५॥
गरुडस्तंभासन्निध साधी । मध्वमुनीश्वर तो निजकाज ॥६॥

पद १४ वें
पतितपावना देवा श्रीवामना रे । माझी ते कैसी न ये सेवा मना रे ॥ मजलागीं दीनबंधु तो पावना रे । किती मी करूं तुझी ते भावना रे ॥१॥
राजीवनयना कान्हा व्रजजीवना रे । गोपिका भोगिसी आणुनि वृंदावना रे ॥ सनकादिक करिती तुझ्या पदसेवना रे । कल्की होउनि शासन करितोसि यवना रे ॥२॥
शरदिंदुवदना सुंदर नारायणा रे । इंदिरारमणा धांवे भवबंधहरणा रे ॥ गोविंदराया सत्वर दाखवी चरणा रे । श्रीमध्वनाथाची त्या येऊं दे करुणा रे ॥३॥

पद १५ वें
तिमयाचें अति सुंदर रूप ॥ध्रु०॥
द्वारिं जयाच्या परम मनोरम । कल्पतरूसम खगपतियूप ॥१॥
चिंति त्रिलोचन पंकजलोचन । संकटमोचन व्यंकटभूप ॥२॥
पंकजसंभवं शंकरसंभव । पूजिति शांभव संत अमूप ॥३॥
मध्वमुनीश्वर दाउनि धूप । घालुनि तूप समर्पी अपूप ॥४॥

पद १६ वें
सुबयाचें शुभदायक नाम ॥ध्रु०॥
नमुनि मना जप न मनीं आणिक तप । तत्पदीं तूं लप पुरतिल काम ॥१॥
सुब्रह्मण्यानगरी वरेण्या । शरण अनन्यजनां अभिराम ॥२॥
करुणाकर गुणसागर नागर । श्रीधरणिधर निजसुखधाम ॥३॥
मृदुमधुरश्वरें मध्वमुनीश्वरें । सानुज आळविला जयराम ॥४॥

पद १७ वें
ज्याचें पायवणी सदाशिव जटाजूट स्वयें वंदितो । ज्याचें रूप मनांत मध्वमुनि तो पाहोनि आनंदतो । जो या भक्तजनांसि संकट पडो नेदी कधीं श्रीहरी । तो हा व्यंकट रामराज्य करितो साम्राज्य पृथ्वीवरी ॥१॥
ज्याचें पूजन पंकजासन करी क्षीराब्धिमध्यस्थळीं । कैलासीं गिरिजापती जपतसे सप्रेम नामावळी ॥ ज्याची मूर्ति मनांत मध्वमुनि तो ध्यातो सदा सांवळी । तो हा व्यंकटराय राज्य करितो साम्राज्य शेषाजलीं ॥२॥
शेषाद्रीं नयनीं वनीं रसगुणी म्यां सांवळा देखिला । कांसे सोनसळा विचित्र पिवळा भाळीं टिळा रेखिला ॥ ज्याचें साम्य करी असा त्रिभुवनीं नाहीं दुजा ऐकिला । वेदांतश्रुतिपाल ते श्रुतिमुखीं गोविंदजी एकला ॥३॥
माथां रत्नकिरीट कोटितरणी देखोनिया लाजती । कणीं कांचनकुंडलें झळकती माळा गळां साजती ॥ ज्याचे हस्तकिं आयुधें रणमदें दैत्यांवरी गाजती । पायींची बिरुदावळी रुणझुणा तीं नूपुरें वाजतीं ॥४॥
मायावी सुखरूप तो निजपदा आलासि टाकोनिया । स्वामी पुष्करणितटे विहरसी लक्ष्मीस घेवोनिया ॥ देवा थोर तुझा अगाध महिमा ब्रह्मादिकां नाकळे । जे भावें भजती तयांसि हृदयीं भावार्थ तैसा फळे ॥५॥
त्रैलोक्यां तुझाचि आश्रय मला तूं गाय मी वांसरूं ।  माझी तूं कुळदेवता जिवलगे तूं माय मी लेंकरूं ॥ सेवाहीन अनाथ दीन जन ते विश्वंभरें पोसिले । माझे तों अपराधवर्ग सदये त्वां सर्वही सोसिले ॥६॥
नाहीं म्यां नवरात्रउत्सव तुझा ह्या लोचनीं देखिला । नाहीं या श्रवणीं पुराणमहिमा वेदांत तो ऐकिला ॥ नाहीं या चरणीं प्रदक्षिण कधीं देवालया घातली । देवा काय करूं कुबुद्धि विषयामध्येंच हे रातली ॥७॥
गोविंदा गरुडासना गुणनिधी तूं श्रीनिवासा हरी । कोनेरी तिमया कृपा करुनिया कामादिकां संहरी ॥ कल्याणाद्भुत कामितार्थफलदा दे भक्ति तूझी बरी । प्रार्थी मध्वमुनींद्र मस्तक तुझ्या ठेवूनि पायांवरी ॥८॥
श्रीगोविंदपदांबुजद्वय मना चिंतूनि शेषाचलीं । पूजावें मग षोडशोपविधिनें वाहूनि पुष्पांजली ॥ साष्टांग प्रणतीस घालुनि पुढें जोडुनिया हस्तकां । आरंभी मग अष्टका हरिपदीं ठेवूनिया मस्तका ॥९॥

पद १८ वें *
याची कशी खंती वाटेना ॥ध्रु०॥
हृदयीं असुनि हरि भेटेना । विषयभोगा मन विटेना ॥१॥
अंतरला हरि ऐकुनि श्रवणीं । भ्रांतिपटल फाटेना ॥२॥
मध्वमुनीश्वर म्हणतसे बापा । निरंजनीं ठसा उमटेना ॥३॥

पद १९ वें *
मनरंजन बालक खेळे ॥ध्रु०॥
खेळत खेळत अंगणीं आलें । पायीं पैंजण वाळे ॥१॥
ज्ञानलेखणी खोवुनि कानीं । जातो सद्गुरुशाळे ॥२॥
मध्वमुनीश्वर खेळवी त्याला । पाहातां निवती डोळे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP