मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे २१ ते ३०

स्फुट पदें - पदे २१ ते ३०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद २१ वें महात्म्याचें
ऐक माझ्या लेंकी । ठकले येकायेकीं ॥ वेष देखोवेखी । कोण त्याला लेखी ॥१॥
नांव महानुभाव । सोंग अवधें वाव ॥ चातुर्वणीं भाव । जातीस कैचा ठाव ॥२॥
सोडुनी गरसोळी । फेडुनी शांतिचोळी ॥ धरील पात्र झोळी । तेच हात चोळी ॥३॥
हातीं धरुनि काठी । नीति उफराटी ॥ मेला आपल्यासाठीं । लावी भिक्षेपाठीं ॥४॥
बोडकीचें पोट । वाढविलें मोठें ॥ हेंचि कर्म खोटें । मोडी त्यावरी बोटें ॥५॥
वरचेवर बोडी । डोहळ्याची गोडी ॥ ऐसी वोंगळ खोडी । शिळे टुकडे झोडी ॥६॥
आधीं डोखें मुंडा । काळें सांवळें गुंडा ॥ तीर्थीं गडबडगुंडा । रिद्धपुरीं धुंडा ॥७॥
कलिराज आला । वर्णसंकर जाला ॥ महात्म्यासी व्याला । धर्म त्यासी भ्याला ॥८॥
ऐसें ज्यांचें मत्त । ते सदा खाती लत्त ॥ मध्वनाथीं नित्य । न लाविती चित्त ॥९॥

पद २२ वें वर्णसंकराचीं पदें
ब्राह्मणाची कन्या । लक्षामध्यें आहे ते धन्या ॥१॥
उपजुनी कळसुगीं गे । घरामध्यें राहिली जे उगी गे ॥२॥
नका बोलूं मसी गे । आहांत तुम्ही राजस तामसी गे ॥३॥
मी तों जातिभ्रष्ट गे । आपल्या मुखें बोलतें हें स्पष्ट गे ॥४॥
म्यां वर्णसंकर गे । करितां जाला प्रसन्न शंकर गे ॥५॥
अगम्यगमनासी । केलें म्यां जेथें न गम्य निगमासी ॥६॥
रातले परपुरुषा । परि मी बाई नातळे कलिकलुशा ॥७॥
वाढविलें पोट गे । माझा म्यांचि केला घतस्फोट गे ॥८॥
न रिघे प्रायश्चित्त गे । मध्वनाथ तेथेंचि निश्चिंत गे ॥९॥

पद २३ वें
अठरा पगड जाती । मजपुढें हात जोडुनी जाती ॥१॥
हजार तोंडाळे । लज्जित जालें देखुनि चोंढाळें ॥२॥
षडु दर्शनाचीं घरें । शोधिलीं तेथें देखिलें येक खरें ॥३॥
वाणी बकाल ते । मजपुढें अवघे ठकाल ते ॥४॥
आहे स्त्री माळ्याची । हांसते मज बहीण साल्याची ॥५॥
जालें मी तेलीण गे । ढीवराची लक्षितेहे मीन गे ॥६॥
जो का सदासीवी गे । तयाची आहें नका देऊं सिवी गे ॥७॥
मी तों सुनारी गे । आवडे मज तो कामदारी गे ॥८॥
चिद्रत्न जो हरी गे । मध्वनाथ पर्णिला तो हरी गे ॥९॥

पद २४ वें
विद्या गुरवाची । ऐकुनि जालें तेव्हांच मी त्याची ॥१॥
सांडुनी अतारासी । हृदयीं आतां धरिलें सुतारासी ॥२॥
रंग्या रंगार्‍याला । भुललें त्याच्या देखुनि शृंगाराला ॥३॥
तृष्णा संसाराची । सोडुनि जालें कृष्णा कासाराची ॥४॥
मी मोथ्या कपाळाची । सद्वंशीं खेळे दासी गोपाळाची ॥५॥
निर्मळ वरठी गे । तयाचे दारीं मी घाली घरटी गे ॥६॥
संशय वारिकांसी । भुललें बाई सांडुनि आणिखांसी ॥७॥
आनंद महारासी । देखुनि गेलें त्याचिया घरासी ॥८॥
जालें मी रामजनी । कळावंत केला म्यां येक धणी ॥१०॥
सत्ता अविंधाची । असतां जालें दासी गोविंदाची ॥११॥
मध्वनाथासी राजी । जालें मी आतां काय करील काजी ॥१२॥

पद २५ वें अनुभवी
काय सांगूं कपाळाची सखिये काहाणी । येकायेकी भुरळें पडलें ठकलें शाहाणी ॥१॥
चौघाजणीं मिळून माझा गळा कापिला । हाचि मज योग्य वर म्हणोनि स्थापिला ॥२॥
सगुण सुंदर विद्यावंत देखुनि भाळलें । पडतां याच्या अक्षता मनांत वाळलें ॥३॥
प्रतिबंधक अदृष्ट माझें मध्यें वोडवलें । त्यानें निजसुखापासुनि बाई सोडविलें ॥४॥
आलें यौवन शाहाणी जालें गेलें निजाया । कांहीं केल्या नावडे याला मी जाया ॥५॥
हात बोट लाविना रगडूं देईना । तांब्याभर पाणी माझ्या हातें घेईना ॥६॥
चांगभांग बाहिर करी अंतरीं खिन्न । सद्गुरुमाय माझी तिनें वळखिलें चिन्ह ॥७॥
अनाथाची माय तिला आली दया गे । तिनें काय नेणो करणी केली तया गे ॥८॥
माझ्या कंठीं बांधिला येक ताईत । त्याच्या योगें अनुकूल जालें । सर्वही साहित्य ॥९॥
पदरीं धरूनी प्राणेश्वरें नेलें येकांतीं । हृदयग्रंथि सोडूनी दिधली विश्रांती ॥१०॥
सुमनसेजेवरि घेऊन मजला निजला गे । बोधें गर्भ राहिला स्वामी रीझला गे ॥११॥
गळीत जाला देह माझे पुरले सोहळे । सद्गुरुची सेवा करणें हेच डोहळे ॥१२॥
पूर्ण दिवस मास भरले आलें माहेरीं । आतां माय पाय घालूं नेदी बाहेरी ॥१३॥
पुत्रउत्सव पहावया आला स्वामी गे । प्रगल्भ पुत्र जाल्या पुनरपि जालें कामी गे ॥१४॥
मध्वनाथस्वामीस घेऊनि गेलें येकांता । लिंगदेहभाग नाहीं माझिया कांता ॥१५॥
आतां बाई उगी रहा करा युगांचे । त्याचें माझें ऐक्य आहे बहुतां जुगांचें ॥१६॥

पद २६ वें
काय सांगूं आतां माझें कपाळ उघडलें । पहिल्या शरीरसंबंधाचें नातें बिघडलें ॥१॥
ममता जाया मेली समता दुसरी म्यां केली । रमतां तिजसी निशिदिनीं माझी भ्रमता ते गेली ॥२॥
तिनें माझी घरोघरीं केली दुर्दशा । चांडाळीण होती वोंगळ केवळ कर्कश ॥३॥
क्षमा, दया, शांति, तितिक्षा समतेच्या बहिणी । चार्‍ही मुक्ती दासी जीच्या ते माझी गृहिणी ॥४॥
विवेकाची धन्य कन्या होती उपवर । जीवाजी मी बिजवर नवरा रिझलों तिजवर ॥५॥
मध्यावर्ती मनाजीनें केली घटवटना । निरंतर करीत होतों गीतेच्या पठणा ॥६॥
सावधान होईल त्याला येते प्रतिष्ठा । ॐ प्रतिष्ठा होतां स्वरूपीं धरिली म्यां निष्ठा ॥७॥
रुसणें फुगणें नाहीं जेथें तेथें रसरंग । संत सनकादीक त्याला मानिती निःसंग ॥८॥
उन्मनीच्या मंडपांत धेडा नाचला । नवरा अव्यय अद्वय हाची अर्थ सांचिला ॥९॥
उतरी लोण स्वर्गसुख सद्गुरुमाउली । म्हणवी वधुवरांची जे सीतळ सावली ॥१०॥
अनुभव अलंकार तीचे वर्णावे कोणें । तिच्या दर्शनमात्रें जीवन्मुक्तचि होणें ॥११॥
सगुण सुंदर चतुर शाहाणी नवरी उदरंग । येकांतासी जाऊनि तिजसी केला म्यां संग ॥१२॥
समतासंगें अनंतरंगें असंग मी जालों । सुमनसेजेवरी तीचें अधरामृत प्यालों ॥१३॥
तिचें माझें हृदय येक द्वैत तें नाहीं । नीरावर्णीं सौख्य जालें कांहीं ना बाही ॥१४॥
साक्षात्कार पुत्र जाला साकर वांटिली । आनंदाची नदी प्रेमपुरें दाटली ॥१५॥
मध्वनाथ बिजवर नवरा नांदे घरवारीं । दुस्तर मायानदी उतरुनी गेला परपारीं ॥१६॥

अभंग २७ वा बेडराचे
सद्गुरु बेडर भेते ज्या मानवा । तयाचा जाणावा भाग्योदय ॥१॥
ब्रह्मारण्यामध्यें बेडर घेउनि गेला । ज्ञानखङ्गें केला जीवघात ॥२॥
माझ्या मस्तकींचें राजस तिवट । तें नेलें धुवट कधीं नोहे ॥३॥
द्वैतवासनेची होती जे वोखटी । तें केली मोकळी धोकटीजी ॥४॥
क्रियमाण संचित होतें जें चंचींत । तें नेलें किंचित उरलें आतां ॥५॥
चित्ताची चौखडी होती जे धोंगडी । ते नेली घोंगडी खांद्यावरील ॥६॥
आयुष्याची होती हातीं काठी बरी । मोडुनी पाठीवरी तेही नेली ॥७॥
वर्णाश्रमाचें जें होतें कटिबंधन । त्यांतील नेलें धन पापपुण्य ॥८॥
निमाजामा कुडतीं नेलीं ते नेदी पुढती । जयासाठीं रडती अज्ञानी ते ॥९॥
लौकिकलज्जेचें होतें जें अंबर । तें नेलें दिगंबर जालों आतां ॥१०॥
दोन्ही हस्तमात्रा नेल्या कर्णमात्रा । तेथें पानमात्रा ठाव कैचा ॥११॥
विषयवासनेचें आणिलें जयाचें । तें नेलें पायाचें पायतन ॥१२॥
बेडरानें केलें नागवा उघडा । जालों मी जोगडा अवधूत ॥१३॥
मध्वनाथ म्हणे लावियला धाक । मारूं नेदी हांक सोऽहं ऐसी ॥१४॥

पद २८ वें बागाईताचें लफगाणें
आइतें आहे पाटस्थळ । जागा वहीत केवळ । बागाईताचा अम्मल । कोण्ही करूं जाणेना ॥१॥
नलगे घालावें विरजे । हेच बैल देउनि दुजे । आपल्या हिकमतीनें बोजे । बाग हातीं धरावा ॥२॥
बारव आहे वरल्या रानीं । बाराही महिने वाहातें पाणी । तिचें वळण वळा कोण्ही । आपल्याकडे भाईंनो ॥३॥
बाग पिकल पिकल । माल अव्वल विकल । नाथ सांगतो अकल । कोण्ही मनीं समजेना ॥४॥
सरस आमची बागशाई । हमेश नगार्‍याची घाई । तेथें चारूं आपल्या गाई । त्रिकूट शिखरावरीं ॥५॥
अवघ्यांत मोठा आमचा बाग । तेथें काळास कैचा लाग । तेथील अमृताचा भाग । जोगी येक सेवितो ॥६॥
तो विसरला पहिलें दुःख । मौन धरियलें मुखें । कर्णकुमारीच्या सुखें । आसन घालुनि बैसला ॥७॥
नांव त्याचें निरंजन । बावा राखतोहे बन । त्याला करितों नमन । अरुणोदयीं उठोनि ॥८॥
रोज करितों चाकरी । आम्ही त्याचे बनकरी । तो सांभाळितो बहुतापरी । आपल्या घरींच्या लेंकरा ॥९॥
तोचि आमुचा मूळधणी । त्याचे दिवस कोण गणी । ज्यानें राखिलें बाळपणीं । आहे लई दीसांचा ॥१०॥
त्यानें उदंड सिद्ध केले । गोरखनाथाऐसे चेले । चाळउनी आपल्या घरा नेले । दत्तात्रयासारिखे ॥११॥
ऐसें आमुचें बागाईत । वरकड तुमचें जिराईत । दोहीचाही मध्वनाथ । अमल करूं जाणतो ॥१२॥

अभंग २९ वा
शिवोऽहं शिवोऽ हं म्हणा तुम्ही सुखें । मी तों आपल्या मुखें न बोले जी ॥१॥
महावाक्य पंचीकरणें घेउनि नाचा । आहे अर्थ त्याचा वेगळा तो ॥२॥
सती आणि शूर दोघे पुण्यवंत । आत्मा तृणवत गणला जिहीं ॥३॥
देहात्मवादियां केलें कानकोंडें । वेदांत्यांचीं तोंदें कोमाईलीं ॥४॥
पुरुषार्थाकारणें येवढी आटाआटी । रिघती कपाटीं कीर्तिलागीं ॥५॥
अनुभवाविरोधी गोष्टी बोलूं नका । सिद्धांत ठाऊका आहे तुम्हां ॥६॥
मध्वनाथ म्हणे याचें द्या उत्तर । म्हणवितां चतुरा आपल्या ठाईं ॥७॥

अभंग ३० वा
आणिखही माझा आहे पूर्वपक्ष । आत्मज्ञानी दक्ष विचारा जी ॥१॥
अचेतन भुतें सळिती सचेतना । तेथील यातना कवणालागीं ॥२॥
सचेतन करिती सचेतना शिक्षा । हिंसकाची दीक्षा पाहातसा ॥३॥
तेथें येक आपली चिरल्या आंगोळी । म्हणे मी रांगोळी करीन याची ॥४॥
आततायी करिती सुखें आत्महत्या । अनर्थासी कृत्या न विचारिती ॥५॥
पुरुषार्थ अनर्थ आवडती लोकां । दोन्हीकडे शोका ठाव नाहीं ॥६॥
देहाचा वियोग अकस्मात व्हावा । हें कोणास देवा आवडतें ॥७॥
मध्वनाथ म्हणे याचें द्या उत्तर । म्हणवितां चतुर आपुल्या ठायीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP