मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १११ ते १२०

श्रीकृष्णाचीं पदें - पदे १११ ते १२०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १११ वें
माझ्या गुरुचे पायवणी । तुझ्या पापाची करील धुणी ॥१॥
त्याचा लागलियां बिंदू । होसी कैवल्याचा सिंधू ॥२॥
माझा सद्गुरु उदार । तुझा करील उद्धार ॥३॥
शुक योगींद्राचा पूर्ण । काय होसील उत्तीर्ण ॥४॥
मध्वनाथ म्हणे देवा । माझ्या गुरुची करील सेवा ॥५॥

पद ११२ वें
देवा मातीनें निघते माती । डाग वस्त्राचे आंगींचे जाती ॥१॥
तैसें घेतल्या आमुचें नाम । शुद्ध होसील आत्माराम ॥२॥
निंद्य रजकाची सौंदणी । तीस वोंगळ मानिसी झणी ॥३॥
देवा आगीनें निघते आग । वर्म जाणती सभाग्य ॥४॥
स्वामी काट्यानें काढुनि काटा । दोन्ही सांडावे आव्हाटा ॥५॥
देवा हिर्‍यानें विंधिती हिरा । तैसें होईल यदुवीरा ॥६॥
कृष्णा होई तूं सगुण । मध्वनाथाची समजून खूण ॥७॥

पद ११३ वें
जीवलगा दीनानाथा मजलागीं तारि दयाळा ॥ध्रु०॥
दीन तुझें बहू मी सिणलों रे । आतां तर्‍ही लवकरि दे अभयाला ॥१॥
चित्त तुझ्या भजनीं नलगे रे । नरदेहीं दवडिलें व्यर्थ वयाला ॥२॥
मध्वनाथा वरदा सखया रे । भवरिपु । निरसुनि दे विजयाला ॥३॥

पद ११४ वें
कृष्णा केशवा कालियदमना कलिकल्मषशमना । केव्हां भेटसी खगपतिगमना करितों मी नमना ॥१॥
किरीटीं खोविसी केतकी सुमना कौशेयवसना । कानीं कुंडलें कौस्तुभधरणा केयूराहरणा ॥२॥
करुणासागरा कमलारमणा करि बंधनहरणा । कान्हा कामिनी कामिति चरणा कुजदैत्योन्मथना ॥३॥
केशिकौंसादिककुवलयकदना कौरवकुलदहना । श्रीमध्वनाथकविवर सजणा करितो या स्मरणा ॥४॥

पद ११५ वें
सये बाई माझा श्रीहरी । मज भासतो भगवंत वो ॥ध्रु०॥
अविद्यापूतना मारायासी आली । यानें केला तिचा अंत वो ॥१॥
आणिक गोकुळीं खेळतीं लेकुरें । करणें याचें अंतघंत वो ॥२॥
मध्वनाथ याची बोलतसे खूण । ऐकुनि डोलती संत वो ॥३॥

पद ११६ वें
मुकुंदा मी तुजविण जालों मतिमंदु रे ॥ध्रु०॥
तूंचि सुखकंदु रे । नादकळाबिंदु रे । लागो तुझा छंदु रे ॥१॥
मध्वनाथ म्हणे तुझें नाम दीनबंधु रे । सोडी भवबंधु रे । भेटे गुणसिंधु रे ॥२॥

हरि तुजविण जिवलग नाहीं रे ॥ध्रु०॥
तूंचि सर्वांठायीं रे । पूर्ण दिशा दाही रे । यासी वेद गाही रे ॥१॥
मध्वनाथ म्हणे मन हरपलें तुझ्यापायीं रे । हरि हरि हरि । अनुभवसुख जालें कांहींबाहीं रे ॥२॥

पद ११८ वें
तूं अनुदिनिं भज भगवंत रे ॥ध्रु०॥
सेवी साधुसंत रे । जेणें दुःख अंतरें । ऐसें हरिरूप चिंत रे ॥१॥
मध्वनाथ म्हणे आतां । राहे तूं सचिंत रे । देह नाशवंत रे । याची काय खंत रे ॥२॥

पद ११९ वें
मनमोहन माधवराया रे ॥ध्रु०॥
वामन होउनि दानव मोहिसी । लहान मानवी काया रे ॥१॥
दंडकमंडलुमंडित देखुनि । विस्मित ते नृपजाया रे ॥२॥
पीत पटें कटि शोभतसे नीट । नाटक चेटक माया रे ॥३॥
निर्मळ तें भुवनत्रयीं अर्पुनि । लागतसे बळी पायां रे ॥४॥
बुद्धि सदोदित मध्वमुनीश्वर । मागतसे गुण गाया रे ॥५॥

पद १२० वें
हरि हा देवकीनंदन रे । वंशीं भूषण हा ॥ध्रु०॥
देवकीनंदन कंसनिकंदन सनकसनंदन सेविती सीतळ चंदन रे ॥१॥
कालियशासन श्रीगरुडासन दुरितविनाशन करित सुधारस प्राशन रे ॥२॥
मध्वमुनीश्वर मृदुमधुरस्वर मुरलीरवें सुरकिन्नर रंजवी सुंदर रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP