मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद ७१ ते ८०

श्रीरामाचीं पदें - पद ७१ ते ८०

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


अभंग ७१ वा
आसेचें बांधलें आहे अवघें जन ॥ म्हणुनी जें तें भजन करिती तुझें ॥१॥
पोटाचे पाईक करिती खुशामती ॥ ऐसें रघुपति आहेत फार ॥२॥
समर्थासी भीती सेवक सर्व गुण ॥ त्याचें कोणें उणें बोलावें जे ॥३॥
आपुल्या जीवावरि जाला जो उदार ॥ रायाचा जुंझार तोचि तेक ॥४॥
पतिव्रतांमध्यें प्रामाणिक वृंदा ॥ ते कांरे गोविंदा भोगिली तां ॥५॥
वालीचा अन्याय आणुनी मनास ॥ त्याचा जीवनाश तुम्हीं केला ॥६॥
पापी अजामेळ तयाचा सन्मान । गणिकेसी विमान पाठविलें ॥७॥
मध्वनाथ म्हणे पित्यासी पतन ॥ धर्म सनातन करितां तुम्ही ॥८॥

अभंग ७२ वा
तुम्ही आम्ही पूर्वीं होतों येके ठायीं ॥ पुढें गती नाहीं तुजवीण ॥१॥
मध्यें दोन दिवस पडला अंतराय ॥ म्हणोनि तुझे पाय धरितों आम्ही ॥२॥
आम्हां गरीबांसी न करीं निकर ॥ देवा दोन्ही कर जोडितों मी ॥३॥
ओटी पसरोनि धरितों मी दाढी ॥ नरकांतुनि काढीं येकदांचें ॥४॥
माझ्या बोलण्याचा राग न धरावा ॥ येवढा उध्दरावा महापापी ॥५॥
सिणलें भागलें मनामध्यें कष्टी ॥ बर्‍या वाईट गोष्टी बोलतें जी ॥६॥
मागें पुढें तुझी करितों मी निंदा ॥ दुसरें गोविंदा व्रत नेणें ॥७॥
निंदाव्रताची या करीं उजवण ॥ नाथ म्हणे रीण देई माझें ॥८॥

अभंग ७३ वा
वडीलपणाची बरी केली नीति ॥ भला रघुपती दीनबंधु ॥१॥
आपण घेतली सद्विद्या अयोध्या ॥ आम्हांसी अविद्यानगरी दिल्ही ॥२॥
लक्ष चौर्‍ह्याशींत आम्ही होतों दुःखी ॥ तुम्हीं नित्यसुखी अवतारांत ॥३॥
लंकेसि जाऊनि ब्रह्महत्या केली ॥ समुद्रांत गेली वाहवत ॥४॥
समर्थ जें करी तें दिसे उत्तम ॥ येरां अंधंतम जडजीवां ॥५॥
आम्ही रक्तबीज मारूं पिपलिका ॥ त्याचें तुम्हीं लेखा महापाप ॥६॥
कौसल्याचेपरी आम्हांसी कोंडिलें ॥ वैर कां मांडिलें घरिच्याघरीं ॥७॥
वैकुंठलोकांचें करितां तुम्हीं राज्य ॥ आम्हांसी सायुज्य तेथील नाहीं ॥८॥
तुम्हांआम्हांमध्यें लागला झगडा ॥ जातों मी उघडा संतांपाशीं ॥९॥
संत माझा तुझा करितील निवाडा ॥ घेववीन झाडा त्यांच्या हातीं ॥१०॥
मूर्ख जाणूनियां घातले विभक्त ॥ संत भगवद्भक्त करितील येक ॥११॥
तुझा माझा वांटा करितील बराबर ॥ उणा तिळभर न लेखिती ॥१२॥
काय संतांचें मी होऊं उतराई ॥ तुझी चतुराई न सरे तेथें ॥१३॥
मध्वनाथ म्हणे तुम्ही आम्ही एक ॥ वेदांतीं विवेक हाचि केला ॥१४॥

अभंग ७४ वा
नांव घेऊन डोईवर ॥ नाच जानकीसमोर ॥१॥
पारितां जो पाहिना ॥ त्याचें भलेपण राहिना ॥२॥
आळवितां कंठशोक ॥ ज्याला हासताती लोक ॥३॥
परी तूं न देशी उत्तर ॥ कैसा जालासि निष्ठुर ॥४॥
गेली नामाची त्या विरी ॥ म्हणोनि लाजसी तूं हरि ॥५॥
मुक्ताफळ जालें जुनें ॥ त्याचें मोल येतें उणें ॥६॥
कोण्ही फुकट घेईना ॥ गेलें पाणी तें येईना ॥७॥
आम्हां नलगे तुझें नाम ॥ जालों उदास निःकाम ॥८॥
संत आमुचें कुळदैवत ॥ मायबाप गनगोत ॥९॥
त्यांचें सेऊं चरणोदक ॥ तेचि चित्ताचें शोधक ॥१०॥
धन्य संतसनकादिक ॥ त्यांचा महिमा तुजहून अधिक ॥११॥
घेतां वैष्णवांचीं नांवें ॥ नलगे वैकुंठासी जावें ॥१२॥
संत कीर्तन करिती जेथें ॥ तूं धाऊन येसि तेथें ॥१३॥
आम्ही तुजकडे पाहूं ना ॥ नाम घेऊनि बाहूं ना ॥१४॥
पडसी संतांच्या तूं पायां ॥ आपलें नांव जाईल वायां ॥१५॥
शरण आला वनमाळी ॥ संतीं वाजविली टाळी ॥१६॥
मध्वनान्थास दिवाळी ॥ जीवें संतांस ओवाळी ॥१७॥

पद ७५ वें
कै पाहीन मी घननीळा ॥ध्रु०॥
रत्नजडित किरीट सुमस्तकीं ॥ कुंदलें देति सुढाळा ॥१॥
कमळदळाहुनि नेत्र विशाळ ते ॥ कस्तुरीचर्चितभाळा ॥२॥
कुंदरदस्मित सुंदर तें मुख ॥ देखुनि इंदु गळाला ॥३॥
आंगीं झगा पिवळा झळके बरी ॥ त्यावरती वनमाळा ॥४॥
पंचवटीवनिं शोभतसे अति ॥ संनिध जानकीबाळा ॥५॥
बंधु सुलक्षण दक्षिणे लक्ष्मण ॥ संगति योग्य मिळाला ॥६॥
रामशरें मृग निर्बळ होउनि ॥ घेउनि जीव पळाला ॥७॥
हातिं शरासन घेउन शासन ॥ दावितसे दनुजांला ॥८॥
बांधुन तर्कश तो रणकर्कश ॥ मेळवि मर्कटपाळा ॥९॥
रामपराक्रम देखुनि अंतरीं ॥ रावण फार जळाला ॥१०॥
जानकी घेउनियां जयवंत ॥ घरासि रघुत्तम आला ॥११॥
ओवाळी आरती मध्वमुनीश्वर ॥ भेटुनि दीनदयाळा ॥१२॥

पद ७६ वें
जय दाशरथी रघुनाथा ॥ध्रु०॥
राम निरामय नाम मनोहर ॥ वेद वदे गुणनाथा ॥१॥
तूं करुणानिधि दीनजनोद्धर ॥ हे निरसी भववेथा ॥२॥
प्रार्थि निरंतर मध्वमुनीश्वर ॥ दे अभयेकर माथां ॥३॥

पद ७७ वें
रघुराज दयाळ समर्था ॥ध्रु०॥
मी शरणागत तव चरणांप्रति । वारि तूं सर्व अनर्था ॥१॥
तूं करुणाकर पूर्ण सुखात्मक । बोधविसी परमार्था ॥२॥
वर्णि तुझें यश मध्वमुनीश्वर । तूं जगदीश अकर्ता ॥३॥

पद ७८ वें
ऐ राघव मामव स्वामिन् ॥ध्रु०॥
राजीवलोचन रावणमोचन ॥ पुष्पकवाहनगामिन् ॥१॥
जानकीनायक वैभवदायक ॥ श्रीधर श्रीजलशायिन् ॥२॥
मध्वमुनीश्वर हृत्सरसीरुह - ॥ मध्यग सद्गतिदायिन् ॥३॥

पद ७९ वें
सेवी रामकथारससार ॥ध्रु०॥
रामकथेविण व्यर्थ तें साधन ॥ वरकड अवघे चार ॥१॥
मध्वमुनीश्वर सांगतसे येणें ॥ पावसि तूं परपार ॥२॥

पद ८० वें
रामकथारस पी पी पी प्राण्या ॥ध्रु०॥
रामकथारस सेविसी तूं जरी ॥ करी करील तरि जी जी जी ॥१॥
संतति संपत्ति जाई जाणरे ॥ मीपण धरितां ची ची ॥२॥
मध्वमुनीश्वर सांगतसे तुज ॥ दुष्ट जनाला भी भी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP