मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद १०१ ते ११०

श्रीरामाचीं पदें - पद १०१ ते ११०

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


पद १०१ वें
दृश्य पदार्था पाहातां आला डोळ्यांसी वीट । अवघें अश्वाश्वत येथें कांहींच नाहीं नीट ॥ध्रु०॥
परधन - वनिता हृदयीं ध्याता आळस नाहीं केला ॥ गळीत जाली काया देवा व्यर्थचि काळ गेला ॥१॥
प्रपंचविजनीं दुर्धर आला तारुण्याचा पूर ॥ कामक्रोधमगरीं गिळिलों वाहवलों दूर ॥२॥
आतां रामा घालूं नको अयोध्येबाहेर ॥ न गणी अवगुण माझें दाखवी माहेर ॥३॥
पतितपावन दीनदयाळा बिरुद आठवावें ॥ मध्वनाथा अयोध्येचें मूळ पाठवावें ॥४॥

पद १०२ वें
विषसुखाला विटलों तेव्हां जाली तुझी भेटी । पूर्वपुण्यें सांपडली लावण्याची पेटी ॥ध्रु०॥
उपमा द्यावी ऐसी प्रतिमा नाहीं त्रैलोक्यांत ॥ मिरवी मुकुतकुंडलेंसी जानकीचा कांत ॥१॥
मदनमनोहर मूर्ति पुरातन अखंड हांसत मूख ॥  निर्मळ अलंकार पाहतां गेली तहान भूक ॥२॥
येकवचनी येकपत्नि येकशरासनसज्ज ॥ येकायेकीं अभंग ठाणें येकछत्री राज्य ॥३॥
रंगभुवना अकस्मात चिन्मयराघव आला ॥ तन्मय मध्वनाथ ज्ञानी जीवन्मुक्त जाला ॥४॥

पद १०३ वें
मीपण वेड्या सोडुन दे रे ॥ध्रु०॥
शतकोटीचे सारा तूं घे रे । चुकतील तुझे अवघेचि फेरे ॥१॥
गुरुपदींचे रजअंजन ले रे । अमित सुखाचें भांडार ने रे ॥२॥
शरण तूं मध्वनाथा ये रे । त्याविण मोक्षसिद्धि नव्हे रे ॥३॥

पद १०४ वें
गोड फुकाचें हरिनाम घ्यारे ॥ध्रु०॥
रामसुधारस धणिवरि प्यारे । जिंकुनि काळा सुखरूप जा रे ॥१॥
चिद्रत्नाचें भूषण ल्या रे । कीर्तनरंगीं अवधान द्या रे ॥२॥
शरण त्या मध्वनाथा या रे । हृदयभुवनीं रघुराज न्या रे ॥३॥

पद १०५ वें
करि हरिकीर्तनमंगलघोष ॥ध्रु०॥
कीर्तनरंगें सज्जनसंगें । जातील महादोष ॥१॥
मध्वमुनीश्वर सांगतसे तुज । अगणित होईल तोष ॥२॥

पद १०६ वें
हरिकीर्तनीं वाजवी टाळी ॥ध्रु०॥
चित्त घडीभर स्थीर करा तुम्ही । टाकुनि द्या जी टवाळी ॥१॥
रामकथा श्रवणीं पडते तरि । नित्य तुम्हांस दिवाळी ॥२॥
सावळें रूप तें आळविजे । घननीळ जो ये वनमाळी ॥३॥
मध्वमुनीश्वर सांगतसे हित । सार कथा कलिकाळीं ॥४॥

पद १०७ वें
तुम्ही श्रीराम जयराम जपा ॥ध्रु०॥
स्वरूपाबाएर जाऊं नका हो । जेथील तेथें लपा ॥१॥
श्रीहरिभजनीं विन्मुख त्यांवरी । काळ घालितो छापा ॥२॥
आणिक सुगम साधन नाहीं । वरकड अवघ्या गप्पा ॥३॥
मध्वनाथ तुम्हां सावध करितो । गातो ख्याल टप्पा ॥४॥

पद १०८ वें
तुम्ही श्रीराम जयराम म्हणा ॥ध्रु०॥
व्यर्थ मायाजाळीं वणवण करितां । धरुनि अहंपणा । श्रीहरिभजनें निर्हय मर्दा । प्रपंचपन्नगफणा ॥१॥
लौकिक लज्जा सांडुनि अवघी । घेउनि टाळविणा । मध्वनाथाचें कीर्तन ऐकुनि । कळिकाळ आधीं जिणा ॥२॥

पद १०९ वें
उफराट्या नामें उद्धरिला वाल्मीक हो ॥ध्रु०॥
शतकोटी रामायणें । ग्रंथ केला दिव्य जाणें । रामकथा ऐकुनियां । सुखावती भाविक हो ॥१॥
जेणें शिळा पाण्यावरी । तारियल्या जडभारी । मध्वनाथ नामाविण । नेणें कांहीं आणिक वो ॥२॥

कवन ११० वें
मुनिजन ध्याती । नारद तुंबर गाती ॥ध्रु०॥
त्रैलोक्यासी प्रतिपाळी । चिंतावा तो सर्व काळीं ॥ भक्त रक्षावया धरी । कनक कोंदट हातीं ॥१॥
रत्नसिंहासनीं शोभे । पुढें भक्तजन उभे । मध्वनाथ म्हणे ज्याच्या । भजनें पातकें जाती ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP