मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद ३१ ते ४०

श्रीरामाचीं पदें - पद ३१ ते ४०

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


३१ पद
दशरथ वदतो रघुवीरा । मानसपंजरींच्या कीरा । सांडुनि शरयूच्या तीरा । नेसुनि जाउं नको चीरा ॥१॥
कैकयी पापिण नष्टगिरा तिजवरि लोटुनि घालि चिरा । बांधिन सोनेरी चिरा । त्यावरि झळक जडित हिरा ॥२॥
सेउनी तूप अपूप । जिंती राजे अमूप । अयोध्येचा तूं भूप । रामा राहें स्वस्वरूप ॥३॥
तुझिया वियोगें जाण । जाइल माझा प्राण । मध्वनाथा तुझी आण । वाहुनी करितो निर्वाण ॥४॥

पद ३२ वें
पतिव्रता म्हणवी तेचि सीते वो ॥ घराबाहेरि घालिता पाय भीते वो ॥१॥
न करी पतीचा मनोभंग वो ॥ गुण तुझे सहज अंतरंगे वो ॥२॥
करी सासुसासर्‍याची नित्य सेवा वो ॥ पूजी संतामहंता भूमिदेवां वो ॥३॥
कैकयीचें बरवें जालें राज्य वो ॥ सेविल शर्करा घालुनि पायस साज्य वो ॥४॥
आम्ही जातों सानुज वनवासा वो ॥ सांभाळीं तूं आपुल्या दासीदासां वो ॥५॥
पाइं रुपती कंटक क्लेशी होसी वो ॥ तुझ्यासंगें संकटें कोण सोसी वो ॥६॥
घरीं राहतां पावसी सर्व सौख्यें वो ॥ माझा अभिप्राय हाचि मुख्य वो ॥७॥
रक्षी कौसल्येसी लावुनि पंचप्राणा वो ॥ मध्वनाथाची घालितो तुज आण वो ॥८॥

पद ३४ वें
राम वदे वो जानकी । न करीं आपुलें जान की ॥ आशय माझा जाण कीं । तुजहूनी मी सुजाण कीं ॥१॥
कौसल्येस मान कीं । शैल्यजेसमान कीं ॥ दिधलें म्यां उपमान कीं । न करी तूं अपमान कीं ॥२॥
कैकयी जीवनासी वो । जानकीजीवनासी वो ॥ धाडी आजि वनासी वो । राजीवनयनासि वो ॥३॥
कनखर खडे रुपती वो । पाईं कंटक रुपती वो ॥ न मिळे पलंग सुपती वो । तेव्हां स्मरसी पसुपति वो ॥४॥
पक्षी भात भात वो । हरि नामें बोभातवो ॥ होतांचि प्रभात वो । मानसीं दूधभात वो ॥५॥
न मिळे घारी पुरी वो । शाक तेही पुरी वो ॥ न बुडे भवनदीपुरीं वो । सेवी अयोध्यापुरी वो ॥६॥
राहूं नको तूं उपासी । सेवी गुळ वरी तुपासी ॥ गुंतुं नको तूं पाशीं । जीव माझा तूंपासी ॥७॥
ऐकुनि नमकें चमकें वो । पूजी पार्थिव चिमकें वो ॥ मध्वमुनीचीं यमकें वो । गाता मग तो यम केंवो ॥८॥

पद ३५ वें
विनवी जानकी देवा श्रीरामचंद्रा जी । येतें मी समागमें आनंदसांद्रा जी ॥ तुमच्या वियोगें नये मजलागीं निद्रा जी । भरताच्या हातीं घाला ते राजमुद्रा जी ॥१॥
भविष्य बोलोनि गेला तो वाल्मीकी जी । श्रीराम ठेउनी गेला घरीं जानकी जी ॥ हें नाहीं ऐकियलें प्रमाण कीं जी । विचारुनि या गा रामायण आणखी जी ॥२॥
माहेरीं आला होता तो एक जोसी कीम, सांगुन्नी गेला बहू तूं भाग्याची होसी कीं ॥ भर्तारासंगें ककंहीं वनवास सोसी कीं । अंतीं करिसी राज्य त्रिभुवना पोसी कीं ॥३॥
हे सत्य वाणी त्याची घडोनि यावी  जी । संगें सर्वज्ञा प्राणवल्लभा न्यावी जी ॥ ओटी पसरितें येवढी आज्ञा द्यावा जी । श्रीमध्वनाथचरणसेवेसी लावी जी ॥४॥

पद ३६ वें
जाऊं नको रामा टाकुनी आम्हां वाटुनि वैभवधामा ॥ध्रु०॥
देवा तुझा अगाध महिमा नकळे आगमनिगमा ॥ नाम स्मरतां दाविसी उगमा भक्ति तुझी ते सुगमा ॥१॥
रमा ज्याची म्हणवी रामा मुनिजनहृदयारामा ॥ सांभाळूनी दक्षिणवामा शिक्षा लावी अधमा ॥२॥
वामभागीं घेउनी भामा सुवर्णचंपक दामा ॥ सिंहासनीं तूं बैस उद्यामा लेउनि तगटी जामा ॥३॥
कैकयी पापीण मेघश्यामा न वदे ईसी सामा ॥ यातनेचा मेळउनि सामा छेदिन ईच्या चामा ॥४॥
दशरथ भुलला कामिनीकामा सानुज भरत रिकामा ॥ दुष्ट युधाजित खडतर नामा मारीन त्याचा मामा ॥५॥
लक्ष्मण वदतो सांडुनि ग्रामा करितां हे संग्रामा ॥ मध्वनाथा विजयी होउनी वाजवितों मी डमामा ॥६॥

पद ३७ वें
माते आतां प्रणाम करितों तुझिया चरणांसी । आम्हां आशीर्वाद देनें तीजणांसी ॥१॥
कैकयीवरदानें बद्ध झाला दशरथ । मुक्त होइल येथील राज्य करितां भरत ॥२॥
सूर्यवंशेहें राजे त्यांची सत्यप्रतिज्ञा । विपरित करितां नरका जावें विदित सर्वज्ञा ॥३॥
राम म्हणे वो कैकयीनें केली पूर्ण कृपा । दंडकारण्यासी जातों संमत हेंचि नृपा ॥४॥
कंदेंमुळें फळें सेवुनी राहीन एकांतीं । संतसंगें अंतरंगे पावन विश्रांती ॥५॥
सुवेळेसी स्वार जालों जाउनी त्या प्रांतीं । अहंकार मर्दुनी आणिन बरवी निजशांती ॥६॥
क्षणामध्यें चवदा वर्षें जातील निघोनी । पुनरपि तुजला भेटेन सत्वर भद्रीं रिघोनी ॥७॥
देवें समाधान केलें आपुल्या जननीचें । मध्वनाथें रहस्य कथिलें श्रवणमननींचें ॥८॥

पद ३८ वें
तुजविण रामारे मी परदेशी आज ॥ध्रु०॥
गुणमयी कैकयी झगडत मजसी । बांधुनी आपुल्या माज ॥१॥
सवत अविद्या छळित जीवातें । आणियलें बहु वाज ॥२॥
घेउनी दशरथा सानुज भरता । ते करूं येथील राज ॥३॥
जाउं नको मज ताकुनी कोठें । नाहीं वनांतरीं काज ॥४॥
वत्साविरहित तळमळां धेनु । सीत जळ तीस पाज ॥५॥
शरयूतटिं मठ बांधुनि राहूं । काय जनाची लाज ॥६॥
सनकादिक मुनि पूजिन सुमनीं । पाहीन दिव्य समाज ॥७॥
त्रिभुवनविजयी तूं होशिल रामा । करिशील ते साम्राज्य ॥८॥
मध्वमुनीश्वरस्वामी दयाळा । म्हणविसी गरीब नवाज ॥९॥

पद ३९ वें
हातीं धरुनी पुत्रा निरवी सुमित्रा ॥ निंदी कळसूत्रा कैकयीच्या ॥१॥
रामा तुझा भाऊ रागीत हा बौ । नको याचे पाहूं गुणदोष ॥२॥
चालतां अधम मुखीं वमी तम । यासि सर्वोत्तम देव राखो ॥३॥
मारीं कैचें सूख पदोपदीं दुःख । भुकेल्या श्रीमुख कोमाइल ॥४॥
तूं याचें जीवन कठीण तें वन । कंठील यौवन ब्रह्मचर्य ॥५॥
सकावार सीते चालसील कसी । कैकयी ते कसी चांडाळीण ॥६॥
विळें डोळे मोडी राया लावी गोडी । केली ताडातोडी गाईवत्सा ॥७॥
परिस वो साजणी आम्ही दोघीजणी । पडलों विजणीं पतिसहित ॥८॥
रामा तुजविण बहु वाते शीण । जाली हीनदीन अयोध्या ते ॥९॥
आहा जगदिशा वोस दाही दिशा । आतां कोण्या देशामध्यें जावें ॥१०॥
तेणें अवसरें रडती दीर्घस्वरें । मध्वमुनीश्वरें सांभाळिलें ॥११॥

पद ४० वें
रामा जायरे वनवासा । समजुनी आशय माझा ॥१॥
दशरथरायाची प्रतिज्ञा । सत्य करी सर्वज्ञा ॥२॥
संगें घेउनी लक्ष्मणा । सीता सुलक्षणा ॥३॥
जावें त्रिवर्गीं निजहर्षें । चतुर्दश वर्षें ॥४॥
तेथील आनकुळ पाहाणें । येणें अथवा राहणें ॥५॥
भरत राज्य करूं हें विहीत । शत्रुघ्नासहित ॥६॥
हें मज संमत रघुराया । सीतळ होईल काया ॥७॥
रघुपति चित्ताचा वदान्य । आज्ञा होईल मान्य ॥८॥
वंदुनि कैकयीच्या चरणा । वांटी वस्त्राभरणा ॥९॥
कैकयी गौरवीते रघुवीरा । देउनि बल्कल चीरा ॥१०॥
सीता घेउनी हस्तकीं । वंदी निजमस्तकीं ॥११॥
आली दशरथाजवळी । भूपति घाली कवळी ॥१२॥
सांगे सुमंता दशरथ । आणविला निजरथ ॥१३॥
रथीं बैसउनी रघुवीरा । नेले तमसातीरा ॥१४॥
श्रीरघुनाथाच्या वियोगें । दुःखित जालीं दोघें ॥१५॥
करिती सकळिक ते शोक । अयोध्येचे लोक ॥१६॥
शोकें व्याकुळ दिनरजनी । लक्ष्मणाची जननी ॥१७॥
मध्वनाथासी तो चिंती । भूपति चिंती अंतीं ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP