मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ४१ ते ५०

स्फुट पदें - पदे ४१ ते ५०

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग ४१ वा
तुका योगियांचा राजा । तोचि जिवलग माझा ॥१॥
त्याचे ठायीं माझा भाव । पूर्ण विश्रांतीचा ठाव ॥२॥
न मनी आणिकांचें मत्त । येथें विश्वासलें चित्त ॥३॥
मध्वनाथाचें बहुत । करुनि दाखवितो हित ॥४॥

अभंग ४२ वा
नामदेवाचा अवतार । तुका माझा निर्विकार ॥१॥
म्हणवी संतशिरोमणि । जाला कैवल्याचा धणी ॥२॥
बहुतां जनांचा उद्धार । येवढा केला उपकार ॥३॥
मध्वनाथाचें माहेर । पूर्ण विश्रांतीचें घर ॥४॥

अभंग ४३ वा
भक्तिसोपान चालतां । निजमुक्ति येईल हातां ॥१॥
ज्ञान जालियाचें फळ । चिंती निवृत्ति केवळ ॥२॥
देव सोपान सोपान । संतीं सांगितलें जाण ॥३॥
चांगदेवाची हे खुण । नामदेव हा सगुण ॥४॥
ज्ञानदेव तो निर्गुण । मध्वनाथीं परिपूर्ण ॥५॥

अभंग ४४ वा
पांडुरंगे विठाबाई । तूं चांगदेवो विठाबाई ॥१॥
सोपानदेवो विठाबाई । नामदेवो विठाबाई ॥२॥
ज्ञानदेवो विठाबाई । निवृत्तिदेवो विठाबाई ॥३॥
भेटवी मजला मुक्ताबाई । मध्वमुनीश्वर लागे पायीं ॥४॥

अभंग ४५ वा
कांहीं केल्या जाण । उगें न राहे तें श्वान ॥१॥
देखुनी गजेंद्राचा छावा । मागें मागें घेतें धांवा ॥२॥
त्याचें रूप देखुनि भारी । आपल्या ठायीं हा कामारी ॥३॥
मध्वनाथाच्या समोर । येतां दुःख पावे थोर ॥४॥

पद ४६ वें
॥ध्रु०॥
हरि नारायण रे । अहर्निशीं करी पारायण रे ॥१॥
करिसी व्रत तीर्थें । श्रीहरिनामाविण व्यर्थें ॥२॥
कीर्तनीं श्रीरंगा । आरती नोवाळी गंगा ॥३॥
मुख्य उमापति रे । आनंदें वाटी खिरापती रे ॥४॥
आळवी सुस्वर रे । सांगतसे मध्वमुनीश्वर रे ॥५॥

पद ४७ वें
चिंता सर्वांची हरिला । दुश्चित कां रे उगला ॥ध्रु०॥
पक्ष्यांपदरीं संचित कैचें । चारा पुरवी त्यांला ॥१॥
दर्द्र पाषाणाचें पोटीं । तेथें जीववी त्याला ॥२॥
सिंहाला बहु आहार म्हणोनि । कुंजर निरवी त्याला ॥३॥
मध्वमुनीश्वर म्हणतो तुजला । नुपेक्षी कवणाला ॥४॥

पद ४८ वें
नमनी ऐसें दैवत मी । नेउनि घाली सदैव तमीं ॥१॥
नेणती साधक शटक समादी । लतकिच लाविति चरम समाधि ॥२॥
जळचर भूचर खेचर ते । खाती केवळ खेचर ते ॥३॥
पीती पाजिति येकसरा । खाद्यें तोडिती येक सरा ॥४॥
भोगिती शयनीं नयी तरणी । कैसे तरतील वैतरणी ॥५॥
चित्तीं धरुनी कामरति । मांगिणिसाठीं कां मरती ॥६॥
रजस्वलेचा नाहीं विटाळ । बोधी गुरु परि तोहि खट्याळ ॥७॥
मुक्तचि म्हणती पंचमकार । जाणावे ते प्रपंची मकार ॥८॥
रात्रीं घालिती गोंधळ ते । भ्रष्ट ब्राह्मण वोंगळ ते ॥९॥
म्हणती या रे घ्या कवळा । चुंबुनि परकीया कवळा ॥१०॥
वैष्णव कंटक मूर्ख पशु । रगडावे ते जैसि पिसूं ॥११॥
येवढा जेथें दीर्घ द्वेष । ब्राह्मण्याची हानि विशेष ॥१२॥
उपासनेचें छेदुनि मूळ । वैराग्याची केली धूळ ॥१३॥
आगीवरते पडतें तेल । करपत मुक्तिवल्ली वेल ॥१४॥
भैरव चक्री शंकरजात । देखुनि तेथुनि शंकर जात ॥१५॥
सीसा फोडुनि तीर्थांचा । कारण जो कीं अनर्थांचा ॥१६॥
मध्वमुनीश्वर शाकग्राम । जाळुनि पूजी शाळिग्राम ॥१७॥

पद ४९ वें
पढोनि आगम निगम । नेणें आपला उगम । धरणीसंगम । तंत्रवादीं निपुण ॥१॥
करी भैरवीचें चक्र । सज्जनासि सदा वक्र । जैसा सागरांत नक्र । बुडवी जनासि आपण ॥२॥
जाणे जारण मारण । जीवहत्या निष्कारण । ऐसें ज्याचें आचरण । त्याची मळीण खूण ॥३॥
ऐसे आगमी ते जाण । सर्व शास्त्रीं अप्रमाण । त्यांचे मर्दितसे प्राण । मध्वनाथ सगुण ॥४॥

पद ५० वें घनाक्षरी ( वैयाकरणी )
पढोन व्याकरणशास्त्र । साधूं लागे शब्दमात्र । प्रत्यय पाहुनी अवघ्या रात्र । सभेमध्यें खसूची ॥१॥
ऐसा व्याकरणी धिंग । जाणे स्त्रीलिंग पुल्लिंग । नपुंसकी नेणें संग । धातुपाळी अशुची ॥२॥
त्याचा न चुके गर्भवास । दुःख भोगी नवमास । काय घोकुनी समास । तत्पुरुषीं अरुची ॥३॥
वाची कौमुदीक इट । कळला सिद्धांत शेवट । मध्वनाथासि उद्भट । न करी सेवा गुरूची ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP