मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद ८१ ते ९०

श्रीरामाचीं पदें - पद ८१ ते ९०

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


पद ८१ वें
सगुण समाधि समाधि लागो मज ॥ध्रु०॥
कोणें योगाभ्यास करावा ॥ कठिण शमादि दमादि ॥१॥
रामपदीं मन तन्मय हें हो ॥ वारुनि सर्व उपाधि ॥२॥
मध्वमुनीश्वर साधक म्हणतो ॥ मी उतरेन मवाब्धि ॥३॥

पद ८२ वें
अरे हा राम सनातन रे ॥ राजा राघव हा ॥ध्रु०॥
पंचवटीमधें जानकीसाठीं ॥ दावे मृगापाठीं घेउनि हातिं शरासन रे ॥१॥
बांधुनि तर्कश तो रणकर्कश ॥ मर्दुनि दानव दाखवि दारुण शासन रे ॥२॥
मध्वमुनीश्वर जिंकुनि लंकेश ॥ आला अयोध्येस भार्गवगर्वविनाशन ॥३॥

पद ८३ वें
श्रीरामा जय रामा जय जय श्रीरामा जय ॥ध्रु०॥
दशशतकरकुलभूशण दशरथतोषण जळधरश्यामा ॥१॥
दशशतलोचनबंधनमोचन ॥ दशमुखहृदयविरामा ॥२॥
दशशतवदनें वर्णित गुणगुण ॥ दशकर जपतो नामा ॥३॥
दशअवधानीं दशहि दिगंतीं ॥ गाती मंगलधामा ॥४॥
दशअवतारीं दर्शन देतो ॥ मध्वमुनीश्वर आम्हां ॥५॥

पद ८४ वें
संचित आणि प्रारब्ध क्रियमाण रे ॥ आत्मज्ञानापुढें अप्रमाण रे ॥१॥
आम्ही आहों सदैव नित्यमुक्त रे ॥ कधीं जालों नाहीं बुद्धियुक्त रे ॥२॥
असंगासी अनादि गुण संग रे ॥ न मानिती सज्ञान अंतरंग रे ॥३॥
मध्वनाथें शोधून शुद्ध सत्व रे ॥ अनुभवा आणिलें येक तत्त्व रे ॥४॥

अभंग ८५ वा
निर्मळ नर्मदेचे खडे । देवा त्यांची पूजा घडे ॥१॥
तेहि म्हणविती देव । गणराज सदाशिव ॥२॥
काळी गंडकीची शिळा । शालिग्राम म्हणती तिला ॥३॥
द्वारकेचे चक्रांकित । दोघे पूजावे निश्चित ॥४॥
मातापुरींचे तांदळे । सूर्यकांतासी पूजा मिळे ॥५॥
आम्ही खड्याहूनी हीन । दीन जालों कर्माधीन ॥६॥
आमची कां रे नाहीं पूजा । भाव तुझ्या मनीं दुजा ॥७॥
जीव म्हणवी तुझा अंश । चिखलीं रुतला राजहंस ॥८॥
आम्हां लागलें जें कर्म । त्याचें न कळे तुजही वर्म ॥९॥
मूळ अविद्याचि आदि । न कळे सर्वज्ञासी आधीं ॥१०॥
शहाणपणाची प्रतिज्ञा । सोडा सोडा जी सर्वज्ञा ॥११॥
देवाकडे आली हारी । संतीं उभा केला द्वारीं ॥१२॥
मध्वनाथस्वामी चतुर । दासीं केला निरुत्तर ॥१३॥

अभंग ८६ वा
तुझी आम्हीं न करूं पूजा । देवराया गरुडध्वजा ॥१॥
वर्म सांगतलें संतीं । राजास जोगव्याची खंती ॥२॥
आम्ही पाळावी विनंती । तुम्हीं भोगावी महंती ॥३॥
जीव तुझा अंश म्हणवी । अंश अम्शास विनवी ॥४॥
ऐसें नाहीं म्यां देखिलें । कोठें तर्‍ही हें ऐकिलें ॥५॥
यांत आम्हांस लाभ काय । तुझे पुजावे ते पाय ॥६॥
सूर्य आपुल्या किरणा । न म्हणे वंदा माझ्या चरणा ॥७॥
अग्नि न म्हणे स्फुलिंगासी । माझ्या पूजा सर्वांगासी ॥८॥
गंगा न म्हणे तरंगांसी । माझ्या भेटा निजांगासी ॥९॥
पृथ्वी न म्हणे परमाणूसी । मी विहीण होईन तुझी ॥१०॥
जेथें नाहीं द्वैतभाव । तेथें पूजेसि कैचा ठाव ॥११॥
कैचें अद्वैतीं भजन । सेव आणि सेवकजन ॥१२॥
आपण आपल्या खांद्यावरी । कैसें वेंधावें गा हरि ॥१३॥
काय बोल बोलूं कितवा । घरामध्यें केला फितवा ॥१४॥
मध्वनाथें देवासकट । केली उपासना गट ॥१५॥

अभंग ८७ वा
सहस्र नामाची घालितां लाखोली ॥ तरला येक कोळी वाल्मीक तो ॥१॥
पुराणप्रसिद्धा गोष्ति त्या ऐकाव्या ॥ प्रत्यक्ष देखाव्या कोणे ठायीं ॥२॥
जरी आपुल्या आंगें अनुभवा आणाव्या ॥ तरीच वानाव्या संतांपुढें ॥३॥
नाहीं तरी मज वाते कानकोंडें ॥ अमृत म्हणे तोंडें चवी नेणें ॥४॥
मध्वनाथ म्हणे पोटामध्यें भूक ॥ तृप्तीचें तें सुख बोलूं कैसें ॥५॥

अभंग ८८ वा
तुझें नाम आतां घेईना मी हरी ॥ गेली त्याची खरी महिमा भाई ॥१॥
येका दोघावरी झाले कारीगर ॥ आतां हळू फार वजन जालें ॥२॥
मिरवूं नको आपल्या नामाचा बडिवारा ॥ कलीचा पहारा विपरीत ॥३॥
येकाद्या पाप्याचें घेतां आडनांव ॥ आपला स्वभाव दाखवीतें ॥४॥
तुझें नाम हळूं फूल तयाहूनी ॥ म्हणे मध्वमुनी रामचंद्रा ॥५॥

अभंग ८९ वा
जरी तुझें नाम मजला नुद्धरी ॥ बुडतां भवपुरीं अकस्मात ॥१॥
तरी मी तयाची करीन विटंबना ॥ मग नारायणा रुसूं नका ॥२॥
कोटिध्वज घाली चिमण्यांस चारा ॥ भिकार्‍यास द्वाराबाहेर घाली ॥३॥
तरी तो जाणावा सावकार दिवाळ्या ॥ देती शिव्यागाळ्या कंगालें तें ॥४॥
मध्वनाथ म्हणे सांग सीतापती ॥ ऐसी का फजिती करुनि घ्यावी ॥५॥

अभंग ९० वा
कळीचा जो चुना त्याचें नांव सुधा ॥ सेविलीया क्षुधा काय जाय ॥१॥
तैसें तुझें नाम पतितपावना ॥ जानकीजीवना देवराया ॥२॥
माझ्या अनुभवा येईल तें जेव्हां ॥ म्हणेन मी तेव्हां खरें त्यासी ॥३॥
अंधःकारामध्यें स्मरतां दिनमणी ॥ तरी काय रजनी जाईल लया ॥४॥
जैसें धोतर्‍याचें नाम तें कनक ॥ गाहाण त्यासी धनिक न ठेविती ॥५॥
मध्वनाथ म्हणे गौड्या नांव राज ॥ राजाघरीं गज लोखंडाचा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP