मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ५१ ते ६०

श्रीकृष्णाचीं पदें - पदे ५१ ते ६०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ५१
करुणानिधान गे आणी गे ॥ध्रु०॥
व्रजराज आज लाज । राखो भगवान गे ॥१॥
स्मरबाण जाण प्राण । घेतो अवदान गे ॥२॥
उठी जाय माय काय । पाहासि निदान गे ॥३॥
मध्वनाथ घातपात वारील अदान गे ॥४॥

पद ५२ वें
तो मज दावा जिवलग मेघश्याम ॥ध्रु०॥
हरिविण मजला क्षणहि न कंठे वाटे सर्व विराम ॥ आठवितें मनमोहन याचें रूप सुखाचें धाम ॥१॥
मध्वमुनीश्वर निशिदिनिं ज्याचें गातो केवळ नाम ॥ तो जरि येउनि भेटेल मजला पुरविल सकळहि काम ॥२॥

पद ५३ वें
सये बाई आणी यादवराय । सजणी वंदीन तुझे पाय ॥ध्रु०॥
वसनविभूषणभार न सोसे । चंदन लाउनि काय ॥१॥
हरिविरहानल जाळी मजला । स्मरशर मारी घाय ॥२॥
मध्वमुनीश्वरवरद न ये तरि । त्याविण जीव हा जाय ॥३॥

पद ५४ वें
हा रे कान्हा तुजविण मजलागीं आजि गमेना ॥ध्रु०॥
मंद सुगंध समीर शरीरा । लागतांचि विरहाचा दाह शमेना ॥१॥
जाई जुई चंपक सेंवती मालती । सुमनाचे सेजेवरी जीव रमेना ॥२॥
मध्वनाथा वरदा सखया ये । काय करूं तळमळितें करमेना ॥३॥

पद ५५ वें
कृष्ण म्हणे पिके वेगीं प्राणसखीला आण ॥ध्रु०॥
प्राणाची ही प्राणसखी राधिका वो । तिची मला आहे आण वो वो ॥१॥
माझी तिला आण घाली साजणी वो । नाहीं विरहायेवढी हानि वो वो ॥२॥
आपल्या हातें वेणीफणी घाली तीची । पहिलें मोगरेलें न्हाणी वो वो ॥३॥
मध्वनाथस्वामी म्हणे आवडिनें । माझी चिद्रत्नाची खाणी वो वो ॥४॥

पद ५६ वें
सये आतां चाल वो । बोलावितो नंदलाल ॥ध्रु०॥
वृंदावनीं अवल जागा बागशाई । तेथें जालाहे बेहाल वो ॥१॥
मध्वनाथस्वामीसवें रंगता वो । राधे होसील न्याहाल वो ॥२॥

पद ५७ वें
मनमोहन कोठें सांपडे वो । बाई अर्ध घटिका गे ॥१॥
गंगातीरीं जाउनि राहणें । सेउनी पंचवटिका गे ॥२॥
दासी केली मुख्य विलासिने । ऐसें त्याला हटका गे ॥३॥
मथुरेमध्यें मानत होती । कंसाचिया कटका गे ॥४॥
मोहीत केला तिनें देउनी । अधरामृतरसघुटका गे ॥५॥
कुब्जेपासुनि आतां कैसी । होइल हरिची सुटका गे ॥६॥
उद्धव घेऊनि आला शाहाणा । कागदाचा कुटका गे ॥७॥
कागद पाहातां बरवें कळलें । लोभ हरीचा लटका गे ॥८॥
मध्वमुनीश्वरस्वामी दयानिधी । तोडुनि गेला तटका गे ॥९॥
ऐसें कळतें मजला तरि मी । धरितें त्याचा पटका गे ॥१०॥

पद ५८ वें
काय करावा योग सजणी ॥ध्रु०॥
यादवरायें कागद लिहिला । केवढा आमुचा भोग ॥१॥
रेचक पूरक कुंभक करितां । अंगीं जडती रोग ॥२॥
गंगातीरीं कूप करावा । सांडुनि निर्मळ बोध ॥३॥
मध्वमुनीश्वर म्हणतो त्याचा । कोणासि उपयोग ॥४॥

पद ५९ वें
नवरा नवरीजोगा । घटीत आलें योगा ॥ कपाळाच्या भोगा । गांठी पडली दोघां ॥ध्रु०॥
विद्री बाबरसोटी । चिपडि निबर मोठी ॥ कृष्णें धरिली पाठीं । वेडि आवड मोठी ॥१॥
धन्य कुब्जाराणी । तिला प्रसन्न मायाराणी ॥ जिची कीर्ति पुराणीं । पुरली तिची शिराणी ॥२॥
कुब्जा नवी तरणी । तिनें याला केली करणीं ॥ मध्वमुनीश्वरचरणीं । जडली जैसी धरणी ॥३॥

पद ६० वें
बाईये गे मथुरेमध्यें सांवळा श्रीहरि नांदो । कुब्जा घेउनि चिपडी चांदो ॥१॥
बाईये गे बिजवर नवरी वाढत कैसी होती । चंद्रासहित चंद्रज्योती ॥२॥
बाईये गे आइती याला बायको घरभर जाली । अक्षता लाउनी घरा आली ॥३॥
बाइये गे आमुचा त्याला उपजला होता वीत । धरिला मथुरे मार्ग नीट ॥४॥
बाईये गे हिरव्या चार्‍यावर पडें होतें गुरूं । याचें नवल काय करूं ॥५॥
बाईये गे आयितें तिनें वाटुनी ठेविलें भाणें । याला होईल पालटवाणें ॥६॥
बाईये गे आम्ही घुरटा गौळणी गोपीबाळा । साजुक चंपकमाळा ॥७॥
बाईये गे याचे हातीं कांकण कोण्ही बांधो । याची सोयरिक तेथें सांदो ॥८॥
बाईये गे मध्वनाथस्वामी तो केवळ भोळा । वरील नोवर्‍या सहस्रसोळा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP