मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १८१ ते १८८

स्फुट पदें - पदे १८१ ते १८८

मध्वमुनीश्वरांची कविता


भूपाळी १८१ वी
उठोनिया प्रातःकाळीं विनवी कौसल्यामाता । मंगळ आरतीसमयो जाला जागृत होई रघुनाथा ॥ध्रु०॥
आले नित्य होम देउनि सद्गुरु वसिष्ठ । व्यास वाल्मिक विश्वामित्र ज्ञानी वरिष्ठ ॥ आले सनकादिक योगी तुझिये भेटी । त्यांसी हितगुज बोलावें त्वां जगजेठी ॥१॥
काढुनि प्रावर्ण दावी तुझिया मुखचंद्रा । स्वरूपीं सावध झाला त्याला कैची मग निद्रा ॥ सुगंध शीतळ येतो तुळशीचा वारा । तुझा प्रताप देखुनि दिनकर गगनीं लोपल्या तारा ॥२॥
सुमनसेज होती त्याची सार्थकता केली । पक्षी करिती कल्लोळ छाया दीपाची गेली ॥ द्वारीं बंदीजन मागध करिती गर्जना । वर्णिती वंशावळी तुझी सुंदर रघुनंदना ॥३॥
अनंत वाद्यें वाजती त्यांचा होतो जयघोष । रामा तुझिये स्मरणें सर्वही जाती भवदोष ॥ शरयू भागीरथी यमुना जळ आल्या घेउनी । वदन प्रक्षाळुनी त्यां गौरवी तांबूल देउनी ॥४॥
कस्तुरीमळवट रेखुनि पाहीं निर्मळ आरसा । रघुकुळटिळक मध्वनाथा विजयी होई फारसा ॥ श्रद्धाभक्ति प्रातःकाळीं स्मरती जे भावें । भवसिंधूचे पैलतीरीं धांवती स्वभावें ॥५॥

पद १८२ वें
राधे तुझा टाकमटीका जोर ॥ध्रु०॥
चालत बोलसि हांसत खेळसी । हालती नाकींचे मोर ॥१॥
वेणीफणीवर काजळ कुंकू । राखडीवरते बोर ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी दयाघन । आवडी तुझी थोर ॥३॥

पद १८३ वें
या गे सखयांनो अवघ्या यागे श्रीरंगामागें ॥ध्रु०॥
गेलें गोकुळींचें वैभव गेलें आतां उदास पडलें । क्रूरें अक्रूरें अनुचित केलें जीवन अमुचें नेलें ॥या गे॥१॥
सासू सासरा दीर भावे अवघे संगें घ्यावे । आम्हांसि वाटतें मथुरेसि जावें । अवघें हरिरूप व्हावें ॥या गे॥२॥
जेणें सांडिलीं मातापितरें आम्ही तों इतरें । होतों आद्यंत वीर हतुरें वेधिलें चतुरें ॥या गे॥३॥
जातो नटवर हा नागर बरवा, वाटेमधुनि फिरवा । श्रीमध्वनाथ संगें मिरवा आमुचेविषयीं निरवा ॥या गे॥४॥

पद १८४ वें
तो तुम्ही आणा झडकरि यदुवीर ॥ध्रु०॥
नेणों कांहीं कां रुसला हो जाला फार उशीर । हरिविरहें जीव तळमळ करितो कितितरि धरूं मी धीर ॥१॥
हरिगुण ऐकुनि माझ्या नयना येतें नीर । मध्वमुनीश्वरवरददयेविण चित्त न राहे स्थीर ॥२॥

पद १८५ वें
मम जीवनं राज्य गोपालं भजे ॥ध्रु०॥
राजेवलोचनं जीवभावमोचनम । राज्य गोपालम् ॥१॥
कालीयशासनं कंसवंशनाशनं । राज्य गोपालम् ॥२॥
ब्रह्मेंद्रचालकं नंदगोपबालकं । राज्य गोपालम् ॥३॥
सनकादिवंदितं मध्वनाथपूजितं । राज्य गोपालम् ॥४॥

अभंग १८६ वा
पहा पहा वानो पंढरी सुखाची । कृपा सद्गुरुची झाला लाभ ॥१॥
अनंत जन्माचें सुकृत पदरीं । परेचे उपरी पाहा विठो ॥२॥
विठो अर्धमात्रा विटेवरी उभा । गगनाचा गाभा समपदीं ॥३॥
समपद पाहे उघड लोचनीं । तो हा चक्रपाणी मागें पुढें ॥४॥
मध्वनाथ म्हणे गुरुज्ञानांजनें । लेवविलें येणें गुरुनाथें ॥५॥

अभंग १८७ वा
किती पाहासी माझा अंत । म्हणवीसी कृपावंत ॥१॥
पांडुरंगे माझे माये । वेगीं दाखवी गे पाये ॥२॥
कांहीं न घाली संकट तुज न मागे वैकुंठ ॥३॥
कृपादृष्टीनें पाहातां । काय वेंचलें अनंता ॥४॥
माझ्या पूर्वजांच्या स्थळीं । ठेवी गुणनिधी जवळी ॥५॥
मध्वनाथ म्हणे हरि । न करी पंढरीबाहेरी ॥६॥

पद १८८ वें
मज भेट विठो भगवंता ॥ध्रु०॥
तूं जगदीश्वर दीनदयानिधि ॥ वारूनि हे भवचिंता ॥१॥
शेष विशेष तुझे स्तवितों गुण ॥ सोडुनि देहअहंता ॥२॥
वर्णि तुझें यश मध्वमुनीश्वर ॥ वंदुनि सतंमहंतां ॥३॥

================================
शिष्य :- गुरुजी मजला शिष्य करा.
गुरु :- आत्मा आपण मौन धरा.
शिष्य :- सनकादिकें कां धरिल मौन ?
गुरु :- त्यांचे बोल ते मौनाचें मौन.
शिष्य :- ऐसे ते कोण बोल ?
गुरु :- स्वानुभवाचे येती डोल.
शिष्य :- स्वानुभव कैसा कळेळ ?
गुरु :- सद्गुरुकृपें संशय फिटेल
शिष्य :- सद्गुरु कृपा करतील कैसी ?
गुरु :- त्यांच्या घरच्या व्हाव्या दासी.
शिष्य :- दासीपण तो कठीण आहे ?
गुरु :- उगाचि द्वारीं पडून राहे.
शिष्य :- द्वारीं पडल्या होतें काय ?
गुरु :- येतां जातां लागतेल पाय.
शिष्य :- पाय लागलिये कोण सिद्धी ?
गुरु :- प्रपंचांतून फिरेल बुद्धी.
शिष्य :- फिरली बुद्धि कैसी कळे ?
गुरु :- तो संतांच्या मिलणीं मिळे.
शिष्य :- संत सांगा कैसे होती ?
गुरु :- सर्व लोक निंदा करिती .
शिष्य :- निंदेनें कां होती संत ?
गुरु :- स्वयें परीक्षोनि पाहे अंत । अंत पाहिल्या कार्य झालें । वंदावीं तयाचीं पाउलें । पाऊलें वंदिल्या देव ठावा । लवून प्रश्न करीत जावा । प्रश्न केलिया देव दिसे । जनीं मनीं तोचि भासे । तोचि भासल्या आपण देव नाहीं दोन.
शिष्य :- आपण देव कैसा लक्षी ?
गुरु :- जागतां निजतां मनाचा साक्षी.
शिष्य :- मजला कळतें माझें मन.
गुरु :- हें तों वेदवचन । एकला वेदचि काय प्रमाण ? आपण देव गुरु समान । तिन्ही प्रचीती जवळचि त्या । विचार न करितां दूर होत्या.
शिष्य :- विचार करण्या कां सोपा ?
गुरु :- माया असे भ्रांतिरूपा.
शिष्य :- ब्रह्मीं मायेचें स्वरूप कैसें ?
गुरु :- सूर्यापासाव मृगजळ जैसें । मृगजळडोहीं हरणें भुलती । तैसीं मनुष्येंही होती.
शिष्य :- तस्मात् मनुष्यपण कोठून आहे ?
गुरु :- आपआपणा शोधून पाहे । आपण शोधिल्या आपणचि अवघे । मौनाति मौना बरवे । मौनापरतें नाहीं सार । होईल कैसा जगदोद्धार.
शिष्य :- आज्ञा स्वामीची वंदितों पाय.
गुरु :- तुझेंचि नांव अमृतराय.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP