मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते ५

शंकराचीं पदें - पदे १ ते ५

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ लें
भज मन शंकर भोलानाथ ॥ध्रु०॥
एकहि लोटाभर जल चाहे । चावल बेलकी पात ॥१॥
अर्धांगीं गौरी जटामें गंगा । महिमा वर्णन जात ॥२॥
बैठे व्याघ्रांबर साई विश्वंभर । त्रिशूल धरत है हात ॥३॥
अंग बिभूत स्मशानमें खेलत ।  मध्वमुनीश्वर साथ ॥४॥

पद २ रें
सांब दयाघन हा । गंगारंजनु हा ॥ध्रु०॥
व्याघ्रांबरधर गौरीवर हर ॥ हिमकशशेखर शंकर किंकरपावन रे ॥१॥
सुरनर किंन्नर सेविति तत्पर ॥ ब्रह्म परात्पर ईश्वर दीनजनावन रे ॥२॥
मध्वमुनीश्वर चिंति निरंतर ॥ नारद तुंबर गाती चिदंबर जीवन रे ॥३॥

पद ३ रें
परिसे मनुजा यमकाला । भिऊं नको मनीं यमकाला ॥१॥
सोडुनिया धन मद नारी । वदनीं वद तूं मदनारि ॥२॥
सद्गुरुपाय नमनासी । दुसरा उपाय न मनासी ॥३॥
घालुनि आसनासी रे । प्रपंचआस नासी रे ॥४॥
तो मी जो कें नहा वी । जड तनु आपणा न भावी ॥५॥
मिलतां गिरिजापति तरे । उद्धरिले बहु पतिति रे ॥६॥
रमतां सदाकासीं रे । सन्निध सदा कासी रे ॥७॥
मध्वमुनीश्वर सांगतो । ज्ञानाध्वरविधि सांग तो ॥८॥

पद ४ थें
संपत्तीचे सोयरे । धरिती आपली सोय रे ॥१॥
अंतीं न येती कामा रे । शिव हर शंकर कामारे ॥२॥
वियोग ज्याचा न सोसवे । त्याची मजला नसो सवे ॥३॥
परिसे देवा वरदेशा । धाडूं नको मज परदेशा ॥४॥
भक्ति तुझी मजपर देसी । कोण म्हणे मी परदेसी ॥५॥
देसी असंगतरवारे । संकट सर्वही तर वारे ॥६॥
कैलासाचलनिलया रे । नेई चंचल विलया रे ॥७॥
मध्वमुनीश्वर सुखवासी । सलगीनें तुज मुख वासी ॥८॥

पद ५ वें
आतां मृत्युंजया राहे सुखरूप ॥ उदकें माझा कूप भरूं नको ॥१॥
भृंगीच्या धण्याचा धरी जो विश्वास ॥ त्याची तो निराश होत असे ॥२॥
ज्याच्या नंदीचिया वृषणाची हात ॥ लाविलिया लात मारिताहे ॥३॥
पुढें शांभवाच्या हातीं लागो सिंग ॥ पूजिताहे सांग धूपदीपें ॥४॥
तुझ्या द्वारीं जरी केले गळबंध ॥ तरी कांहीं साध्य होणें नाहीं ॥५॥
भुरळे घालुनी भोंदिले जोगड्या ॥ ऐसे तुज गड्या न पाहीजे ॥६॥
मध्वनाथ म्हणतो मी तो भोळा भट्टु ॥ कपटी गळाकाटू भेटलासी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP