मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
दीनानाथ द्वारकाधिश साह्...

रामजोशी - दीनानाथ द्वारकाधिश साह्...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


दीनानाथ द्वारकाधिश साह्य जरी तरी काय न करी ।

भक्तास्तव प्रगट झाले पांडव विचार मग करती ते आपुले ठाई ।

बेत करुन भगवान बोलले मी आधीं करितों शिष्टाई ।

आले हस्तनापुरास तेव्हां तेथें क्षीरसिंधूचें जावाई ।

शत बंधु समवेत आडवा दुर्योधन आला पाई ।

बहु सन्मानें घेऊन गेले पुजियले आसनावरी ।

दुर्योधनाशीं जवळ बैसवून मग विचार करतात हरी ।

दीनानाथ द्वारकाधिश साह्य जरी तरी काय न करी ।

भक्तास्तव जो करुणावत्सल युगायुगीं अवतार धरी ॥१॥

पांडव आणि तुम्ही बंधु असतां सर्व राज्य त्यांचे घ्यावें ।

तेरा वर्षे क्लेश भोगिले म्हणून मजला पडलें यावें ।

जे झालें तें बरेंच झाले आतां तरी घेऊनी यावें ।

समाधान धर्माचें करुन हो अर्ध राज्य त्यांचें द्यावे ।

कलह उभयतांमधीं नसावा हेच सांगणें सर्वोपरी ।

एक विचारें तुम्हीं असावें राजनीतीची युक्ति बरी ।

दीनानाथ द्वारकाधिश साह्य जरी तरी काय न करी ।

भक्तास्तव जो करुणावत्सला युगायुगीं अवतार धरी ॥२॥

म्हणे दुर्योधन काय बोलतां योग्य नव्हें हें आपणाला ।

विचार चित्तीं नाही पाहिला शिष्टाई करण्यास आला ।

कमी दो महिन्यांत वळखलें फ़िरुन जा वनवासाला ।

तेरा वर्षानंतर या मग अर्धराज्य मागायला ।

अधीक मास हरीनें काढून दोन मास घातले भरी ।

दोन मास अधिक वर फ़ाजील असतां कारे असें बोलाल तरी ।

राज्यमदें दुर्योधन बोले अजापुत्र माजला जसा ।

सूयाग्रीं मृत्तिका नेदी युध्दावांचुन कृतिनिश्चय असा ।

अर्जुनहस्तें वधून हिरावून घेईन राज्य मग रडत बसा ।

ऐसें बोलून आले कविराय म्हणे कोप कौरवापरी ।

येथून आतां पुढे लढाई जुंपली अंधसुत मारतील समरीं ।

दीनानाथ द्वारकाधिश साह्य जरी तरी काय न करी ।

भक्तास्तव जो करुणावत्सल युगायुगी अवतार धरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP