मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
शेषाचलकृतनिवासा हा नत ...

रामजोशी - शेषाचलकृतनिवासा हा नत ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


शेषाचलकृतनिवासा हा नत भवास गोष्पद करी ।

न संकट व्यंकटरमणावरी ॥ध्रु०॥

तीन कोस हा पर्वत उंची, लांबी तीस योजने ।

तयावरि नांदे भगवज्जने ॥

शारदीय नवरात्र रथोत्सव नानाविध अर्चना ।

लोभवी विविध जनांच्या मना ॥

श्रीनिवासपदभजन वासवपदही उणे ।

पहाहो भक्तिरसाच्या गुणें ॥

हातीराम बैरागी याचें तप वर्णावे कुणें ।

पहा हो ब्रह्मचि बालकपणें ॥

हा व्यंकटपति त्या गिरिवरि अति शोभला ।

या पादपंकजीं अनंत जन लोभला ।

श्रीरामानुज या देवबळें लाधला ।

याहुन जागृत दुसरें दैवत नाहीं पृथ्वीवरी ।

एक हा निजजन दुरिता हरी ॥१॥

श्रीमत्पुलव्येंकाभिषेक तो निर्मल जलसंगती ।

जवादी मृगपद केशर किती ॥

गिरीवरि हरिकृतमज्जन सुगंध मित धावती ।

खरा हा त्रिभुवनी लक्ष्मीपती ॥

चिंच तिखट नैवेद्य तेलकट परि सुर झड घालती ।

सुधेचे रस त्यापुढे लाजती ।

तीर्थ श्रीपद रेणु मनोहर तिलक जयाचे रती

नित्य ते नर सुकृति लाहती ।

लखलखाट मंडप सुवर्णदीपावळी ।

कर्पूर उजळतो असा न जगतीतळीं ।

तो ध्वजारोहणा नंदन कनकाचळीं ।

पुष्करणीचें स्नान करुनिया सेवामंडप दुरी ।

पहावा शिरोनी भुवनांतरी ॥२॥

तेज पहा या धरुनि हिमालय दुर्गम देशांतुनी ।

येतसे अनंत जन धावुनी ॥

सुभक्त वत्सल देऊळगांवी राजाच्या राहुनी ।

घेतसे पूजा बहु मानुनी ॥

कांहीं काणगी नको कराया कानगिला घेउनी ।

पावती देतो प्रभु लेहुनी ॥

पृथ्विपतीचा वल्लभ ऐसा पुत्र देतसे गुणी ।

इथें हा नवसाला पावुनी ॥

अनंतशयनी भक्ति धरिल जन जसा ।

हा सकल मनोरथ त्यास पावतो तसा ।

भक्तासी उध्दरी हा तरि याचा ठसा ।

भक्ति-मुक्ति सुख शक्ति संपदा याच्या पायीं खरी ।

धरु नये कविरायाला दुरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP