मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कारटा तुझा हा द्वाड य...

रामजोशी - कारटा तुझा हा द्वाड य...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कारटा तुझा हा द्वाड यशोदेबाई ।

कां पडला अमुचे ठायी? ॥ध्रु०॥

बैसुनियां यमुनेकांठी डोळे मोडी ।

भलतीची घागर फ़ोडी ।

गरतीला गल्लीत गांठुनि खोडी काढी ।

माजोरी ढंग ना सोडी ।

रांडेच्याला काय शिकविल्या खोडी ।

या वयांत भलतिच गोडी ।

कुंजामध्यें बैसुनि नाजुक मुलगी ओढी ।

चुचकारुनि लुगडें फेडी ।

गेली उलथुन याची मस्ती ।

ही नित्य काय गे कुस्ती ।

सोसावी कुठवर तस्ती ।

कशि टिकल अशानें वस्ती ?

कर याची बंदोबस्ती, ठायिंचा ठायीं ।

कारटा तुझा हा द्वाड यशोदे बाई ॥१॥

इतक्यांत दुसरी गवळण धांवत आली ।

म्हणे गेला उलथुनि कुठें तुझा वनमाळी ।

मेल्यानें माझी सून नागवी केली ।

मुलगीचीं माझ्या कुचचूचूकें धरिलीं ।

पोरीला नकळे त्यासी करितो बोली ।

भलते त्यांला खेळ शिकवितो चाली ।

मैनीची माझ्या साळू नुकतिच न्हाली ।

झोंबला तिला गाइ निथळत होती ओली ।

मातला दांडगा रांड कशाला व्याली ।

कां घालीना आई बहीण आपुल्या खाली ।

भलतीला गवसुन हटकी ।

रांडेच्या आम्हि काय बटकी ।

दारांत वाजवी चुटकी ।

याला बसल एकादी पटकी ।

दैवानें होसिल फ़ुटकी, रडसिल अगाई ।

कारटा तुझा हा द्वाड यशोदेबाई ॥२॥

आलि तिसरी बडवित उर घेत असे तोंडा ।

म्हणे कुठें तुझा तो बांडा ।

मेल्यानें गोकुल केले छिनालवाडा ।

बाटविल्या सार्‍या रांडा ।

तूं करशिल याचें कोड; मोड या बंडा ।

हा घालिल तुजवर धोंडा ।

आम्हि शील आपुलें मिरवीत होतों झेंडा ।

याणे केला गडबडगुंडा ।

पोरिला लांच गे देउनि चिकण्या खांडा ।

वेणीची धरितो गोंडा ।

गरतीला जाउनि हटकी ।

वाइट जे तितुकें पढवी ।

पोरीला चुंबुन रडावी ।

फ़ेडुनिया लुगडी उडवी ।

मी यांवर झालें कडवी, बडविन ग आई ।

कारटा तुझा हा द्वाड यशोदे बाई ॥३॥

मग चवथि पांचवी सहावी झाल्या गोळा ।

गोपींचा जन्मला मेळा ।

कुणि म्हणति ग कोठें सांग तुझा तो काळा ।

लोण्याचा खादला गोळा ।

कुणि म्हणति मुलींचा लाडू नेला बाळा ।

मातीने भरला डोळा ।

कुणि म्हणति याचा ढंग जाइना चाळा ।

आतां तर दिधला टाळा ।

सांपडल्यावर मग त्या म्हणति गोपाळा ।

मेल्याचे तोंड तें जाळा ।

यापरि करितो धिंगाणा ।

तंव तो माजघरांतुनि कान्हा ।

तो रांगत आला तान्हा ।

लाविते यशोदा थाना ।

गोपींच्या लवल्या माना मग कविरायी

कारटा तुझा हा द्वाड यशोदेबाई

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP