मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कृष्ण जन्म आनंद वाटतो ...

रामजोशी - कृष्ण जन्म आनंद वाटतो ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कृष्ण जन्म आनंद वाटतो गोकुळ अज हे पुणे ॥

श्रीमंताचे मंदिर काही वसुदेवाहुनि उणे ॥ध्रु०॥

अदभुत कविचा वार पहा हो कृतमंदिर चातुरी ॥

काय कल्पना अचाट शोभा बाहेर तसि भीतरी ॥१॥

जिकडे तिकडे रंग कटाडी खिडक्या जाळ्यावरी ॥

ज्याणे जेथे बसुनि पहावे तेथे सुख अंतरी ॥२॥

ठांई ठांई हवुद जलाचे अमृतरसाचे परी ॥

स्नाने करिती संध्या जपतप किति विप्रांच्या हरी ॥३॥

जेथे नरनारायण पूज्या सांबासह आदरी ।

प्रभुच्या हस्ते विप्रभोजने भोजन ऐका तरी ॥४॥

साग्र गर्दळी-दळे तयावरि षडरस साखर पुरी ॥

भात केसरी भक्षुनि वाद्यें सेवे वरपिती खिरी ॥५॥

पकू दळाचे विडे सुवसने ज्या त्यावरि भर्जरी ॥

हार गळ्यामध्यें तुरे लटकती ज्याच्या त्याच्या शिरी ॥६॥

गीत कला नर्तने दिवानिशी सदैव रस माधुरी ॥

राजसु जाहाला येक वेळ हा नित्योसव मंदिरी ॥७॥

ज्या ज्या रुतुचे जसे यथोचित विलास नाना परि ॥

भागवतांचे थवे नवे किति कीर्तनरस या घरी ॥८॥

तळी धरुनिया शिरो मंदिरा पर्यंकहि येकसरी ॥

पडदे फ़ुल रेशमी बिछोने जरबाबी झालरी ॥९॥

कविने मंदिर कमळ म्हणावे जर ही सरसी पुरी ॥

पंकज मंदिर खरे न कमला गती कमलोदरी ॥१०॥

या सदनामध्यें निरंतर श्री दिवाराती साजिरी ।

संध्ये पासुनि निशांत शोभा दीप तिमिर संहरी ॥११॥

फ़ाणस कंदिल पोत दुशाखा हिलाल समया तरी ॥

समया अगणित मेणबत्तिचा प्रकाश अंत:पुरी ॥१२॥

सायंकाळी सुनास लक्ष्मी समा फ़िरती सुंदरी ॥

दांत मंचकी किती कितिक त्या डोले वरि नागरी ॥१३॥

ज्यांच्या दामल मुक्ता सत्कुच कंदुक शोभति उरी ॥

आनंदे क्रीडती नारि निति न कळत या किन्नरी ॥१४॥

सुभोवत्या अप्सरा पहा हो चिन्ह भासते कसे ॥

सूक्ष्म दृष्टीने पाहिल त्याला सत्यचि सर्वहि दिसे ॥१५॥

यास्तव या घरि कृष्णजन्म हे सत्यचि लटिके नसे ॥

टाळविणे किती रबाब भेरी वाद्ये वाजति रसे ॥१६॥

दानधर्म आनंद पहा हो किति निशिदिनि होतसे ॥

जेथे नर नारायण वसले स्वये भक्तिच्या गुणे ॥

ते मंदिर कविराय वर्णितो नको म्हणावे कुणे ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP