मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
पाहून सख्या मी भुललों ...

रामजोशी - पाहून सख्या मी भुललों ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


पाहून सख्या मी भुललों रमलों अघटित करणी ब्रह्माची ॥ध्रु०॥

नार नवी तरणी काय सांगु रमणी जशी नागिण देवा घरची ।

सद पदरिंचे पातळ जरिचं राव राव कसिद्याची मुस ओतली ।

कुचतटि बळकट कुंचकि चापट ओढि माझे मनिं ही फ़ार रुतली ।

चटपट अपवट जोडव्याची झटपट दाहि बोटीं मेंदी रंगली ।

वदन रदन रंगित मदन तिचे रति सख्या जणू बंद खुलली ।

कोवळ्या ओठाचा रंग पोवळ्यास लाविन ग अंगसंग खुप बनली ।

जडिताचे बाजूबंद कानीं कुसुमाचे गेंद मंद मंद गति चालली ।

सिंहकटी सम रुपचि हौस मोठी कुणाचे पोटी जन्मली ।

नयनाचे मारी बाण सख्या गेला होता प्राण अवचट मनि हे उध्दवली ।

पाहुनी भुल पडली ।

माझे ह्रदयांत जडली ।

बहु झटक्याने नटली ।

जशी हवयी सुटली ।

तशी माझे दिठी पडली ।

पटपट तिची गती पाहुनी मी झटपट गति विसरलो उदमाची ।

तटतट उरावरी लटपट हार करी जसी काय पुतळी कनकाची ॥१॥

पिंवळ चमक नवी धमक अंगामधी भांग टिळ्याची खूबी भारी ।

त्याजवरी बिजवर रुचिर बहु उभी सख्या उजरींत गोरी ।

राखडी जडित वरि हिर्‍याची टिकली दावि ठकडी आकडकडी मुदभारी ।

टकटक तिची मजकडेचि लागतां जणुबरचिं ह्रदयीं मारी ।

अधरी मधुरस सुधेपरिस रस पाहुनी लाजवी करि हारी ।

जाहली लगबग चालली बघून मग मी तर दिशा भुललो दिशाचारी ।

धडड धडड धड धडाके उर मग सुदबुद माझी गेली सारी ।

लागली मनात गोडी कधिं न हिला मी सोडी ।

पाहू चल सखया गुळजारी ॥

॥चाल॥

अरे सख्या नव्हें सुंदरी ।

मदनाची तरवारी ।

घुसली कट्यार उरीं ।

जलदी उपाय करी ।

चल तरी तिचे मंदिरी ।

तन मन धन तिजविण मज उपवनापवन भवन जाची ।

गहन दहन झाली सहन करुं मी किती करी सख्या गतियाची ॥२॥

सजण म्हणे रे तुझे वजन बहुत आतां त्यज न हिंय्या सखया ।

घडिभर धीर धर गडबड नको तुझी तुज आणिन तुझे ठाया ।

वदून तयाचा गडि, साधुन बरवी घडी गेला तिस रिझवाया ।

देऊनि उदंड धन मोहवून तिचे मन नेलि नार रमवाया ।

पाहून तियेस मग झाला गडी डगमग तगमग सुटली तया ।

शयनावरुनि मग मृगनयना नेलि मग मनोरथ पुरवाया ।

अशी पुरविली नार पावला सुखाचा पार गार झाली त्याची काया ।

चालली तिथून नित दोघांची संगत मग जडली बहुत माया ।

॥चाल॥

वंदुनि गुरुराया । केली कविने छंद गाया ।

नागेश भुलवाया । त्याची कलगी उडवाया ।

व्यंकटपती विनवाया ।

शाहीर धोंडीने केली पाहि लावणी अशी बहार कुणा कवीची ।

घडेल तरी मी कच्च्या घड्याने वाहिन पाणी वाहिली शपथ साची ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP