TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
राधासखिसंवादे छेकापन्हुत...

रामजोशी - राधासखिसंवादे छेकापन्हुत...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


रामजोशी

राधासखिसंवादे छेकापन्हुति आयका ।

रसिक हो किती चतुर बायका ।

अंबरगत परि पयोधरातें रगडुनि पळतो दुरी ।

काय हा धीट म्हणावा तरी ।

तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हया हरी ।

नव्हे गे मारुत मेघोदरीं ।

सासु सासरा पति यांदेखत अधरामृत माधुरी ।

घेतसे काय वदावे तरी ।

तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हया हरी ।

नव्हे गे मधुकर पंकजहरी ।

पटविघटितकुचतटहि वसंतीं हळूच येउनि उरीं ।

शीतल स्पर्श सुगंधित करी ।

तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हया हरी ।

नव्हे गे मलयज करि चातुरी ।

सुवर्ण पाहुनि तनुवरी वंचक रात्रीं शिरतो घरीं ।

हात टाकतसे अंगावरी ।

तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हय्या हरी ।

नव्हे हा दस्यु समज अंतरी ।

सुंदर रतिजोगता मिळाला पति ही सुभगा खरी ।

दुजीला असा मिळल काय तरी ।

तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हय्या हरी ।

नव्हे गे रतिला मन्मथ वरी ।

॥चाल॥ गुणवंत कुचावरि लोळे अति शोभला ।

तो कृष्ण काय ? नव्हे गे हार कळेना तुला ।

बाइ अंगमर्दनीं अति सुखकर वाटला ।

तो कृष्ण काय ? नव्हे कर दुतीचा भला ।

मज शीतल करितो श्रमि होउनिया भला ।

तो कृष्ण काय ? नव्हे व्यजन सुवंशांतला ।

या परि निजसंतोषे वर्णी, पुसतां यदुनायका ।

लोपवी मुरलीच्या गायका ।

राधासखिसंवादे छेकापन्हुति हे आयका ।

रसिक हो किती चतुर बायका ॥१॥

कंठिं लपेटुनि सदा असावी सुभगा गुणशालिनी ।

वाटते पुष्पवती शोभिनी ।

वृषभानूची सुता काय ती राधा लिकुच स्तनी ।

नव्हे रे माळ आठवली मनी ।

अधरचुंबिनी वंशसंभवा लालसमधुरध्वनी ।

असावी मुखासि मुख लावुनी ।

वृषभानूची सुता काय ती राधा लिकुच स्तनी ।

नव्हे रे मुरली जगमोहिनी ।

सरला ती सदवंशा गौरा अतिशय संयोगिनी ।

येतसे करीं धरुनि जे वनीं ।

वृषभानूची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ।

नव्हे रे यष्टी सहचारिणी ॥

नखक्षतानें मृदुक्वणान्ति ती नवनवगुणरागिणी ।

धरावी ह्रदयीं कवटाळुनी ।

वृषभानूची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ।

नव्हे रे वीणा मृदुभाषिणी ।

विपरीताही तनुवरि घेतां सुदशा सुखदायिनी ।

लहानशि श्यामतनु हारिणी ।

वृषभानूची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ।

नव्हे रे मत्कंबल भोगिनी ।

॥चाल॥ वाकडी दिसे परि बहिरंतरनिर्मळा ।

ती काय राधिका ? नव्हे इंदुची कळा ।

जी चांगट बसली धरुन रसाच्या तळा ।

ती काय राधिका ? नव्हे भुजंगाबळा ।

किति मंजु वसंतीं रसाळजीचा गळा

ती काय राधिका ? नव्हे गड्या कोकिळा

परि हरि राधेला वर्णुन, पुसतां क्षणिं लोपवी ।

चतुर हा यदुकुलपंकजरवी ।

श्रीकृष्णाची सखी संवादे छेकापन्हुति नवी ।

ऐकता जन्म सफ़ल मानवी ।

करी हा कविरायाहुन कवि ।

राधासखी संवादे ।....... ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-02-17T02:00:07.9270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

structural unit

  • रचनात्मक एकक 
RANDOM WORD

Did you know?

कुंभमेळ्याबद्दल माहिती द्या? नजिकचा कुंभमेळा कोठे आहे ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.