मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता

संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता

संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता


१.
आलीया जन्मसी । शरण जावें विठोबासी ॥१॥
तेणें सुफळ संसार । हो का नारी अथवा नर ॥२॥
व्रत करा एकादशी । नाम कथा अहर्निशीं ॥३॥
होय पापांचें निर्मूळ । वंशीं सुखाचे सोहाळे ॥४॥
न लगे योग याग तपें । तुम्हां सांगितलें सोपें ॥५॥
हेचि तुम्हांसी विनंती । म्हणे दासी धरा चित्तीं ॥६॥

२.
आलें व्रत एकादशी । जनी गेली राउळासी ॥१॥
बुक्का घेऊनिया माळा । पाणी भरोनि भोपळा ॥२॥
येतां दुरोनी देखिली । अवधी घामाघूम झाली ॥३॥
होईल देवासी विटाळ । जाले फराळाची वेळ ॥४॥
फुलें - माळा विखुरली । तुंब्याची ते गज जाली ॥५॥
देहीं प्रेमाचें भरीत । देवा जोडी हात ॥६॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । केला संकल्प सारंगधारा ॥७॥
जनी बाहेर घातली । थोर गहिवरें दाटली ॥८॥

३.
जपतप अनुष्ठान । न लगे हेहासी दंडण ॥१॥
तुम्हां सांगते मी खूण । कथे उभा नारायण ॥२॥
कुंचे ढाळा तयावरी । हरुषे नाचतो श्रीहरी ॥३॥
या, रे, घालूं दंडवत । आला थोर लाभ येथें ॥४॥
बाहे उभारूनी टाळी । वाजवितां दोषा होळी ॥५॥
देव कथेसी सांपडे । दासी जनी पाया पडे ॥६॥

४.
टाळ - मृदुंगाची ध्वनी । दिंड्य़ा पताका घेऊनी ॥१॥
संत जाती पंढरीसी । देव सामोरा ये त्यासी ॥२॥
देऊनिया आलिंगन । त्याचा घेतो भागशीण ॥३॥
सर्व तीर्थाचें माहेर । जनी म्हणे पंढरपूर ॥४॥

५.
तुझे पाय माझी डोई । ऐसे करी, विठाबाई ॥१॥
आपुल्या ब्रीदाचा कैवारी । विठ्ठल उभा महागरुडपारी ॥२॥
जनी म्हणे शरण आले । पाय पाहतां निवाले ॥३॥

६.
निस्पृहाची मूर्ती । सखे, जनी ये अव्यक्ती ॥१॥
भक्त वत्सचिये माय । नामा शिंपी त्याचे पाय ॥२॥
म्हणे जनी दासी । माझी सखी आजी होसी ॥३॥

७.
पाणियाचे वाटे । विठो घाली नेटे ॥१॥
घागर घेऊनी हातांत । पाणी ओती हंडियांत ॥२॥
ऐसा येरझारा करी । भरल्या रांजण - घागरी ॥३॥
पाणी पुरे, पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥४॥

८.
पंढरीच्या राया । ज्ञान देई नाम गाया ॥१॥
मी तो मूढ तुझी दासी । ठाव दे, गा, चरणांपासी ॥२॥
तुझे पदरीं पडले खरी । माझा सांभाळ करी, हरी ॥३॥
लक्ष लाविलें चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

९.
वैष्णव कबीर चोखा मेळा महार । निज तो चांभार रोहिदास ॥१॥
सजन पठाणबच्चा तो कसाब । वैष्णव ते शुद्ध एकनिष्ठ ॥२॥
कमाल फुल्लारी मुकुंद झारेकरी । जिहीं देवद्वारीं वस्ती केली ॥३॥
वैष्णवांचा राव सखा ज्ञानदेव । निवृत्तीचा भाव उघड दावी ॥४॥
वैराग्यशिरोमणी वैष्णव अग्रणी । ते माय बहिणी मुक्ताबाई ॥५॥
राजाई, गोणाई आणि नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवीतसे ॥६॥
त्यासी त्रिभुवन सोवळें वर्तन । सदाकाल वाचें वनमाळी अखंडित ॥७॥
धैर्याचें संबळी ज्ञानानें संपुष्टी । पाऊलें गोमटी विठ्ठलाचीं ॥८॥
आवडीच्या तुलसी वाहियेल्या वरी । धूपदीप सारी जाळियेला ॥९॥
सुमन सोऽहं चंदनाचा लेपू । अलक्ष्य तो दीपु उजळिला ॥१०॥
तो अतीत स्वार्थभूत भक्त । अखंड विरक्त डोलताती ॥११॥
तंतुतंत जाणा म्हणोनिया । अखंड स्मरणा करिताती बाई ॥१२॥
त्या वैष्णवाचे चरणी करा ओवाळणी । म्हणे दासी जनी शरीराची ॥१३॥

१०.
संत आले महाद्वारीं । चोर पडले देवावरी ॥१॥
नवल जहालें पंढरपुरीं । अखंड बैसे दासी घरीं ॥२॥
जगामध्यें कीर्ती जाली । दासी जनी प्रकटली ॥३॥

( राजवाडे संशोधन मंदिर, धुळे )
११.
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवांचोन ॥१॥
ऐसा कोण आहेरवासा । पदीं बसवीं आपल्या दासा ॥२॥
ऐसा कोण सरदार । छत्र धरी दासावर ॥३॥
ऐसा कोण आहे धनी । दासी जनीची घाली वेणी ॥४॥

१२.
राजराजेश्वरी अंबा । राजराजेश्वरी ॥धृ.॥
अहो अहो अंबाबाई । जीव प्राण तुझे पायीं ॥१॥
तुझ्या नामाचा महिमा । वर्णू न शके वेद ब्रह्मा ॥२॥
मज घेतले पदरीं । टाकूं नको, माते, दुरी ॥३॥
कृपाळू तू माऊली । चित्त द्यावें बोबड्या बोली ॥४॥
तुझे कृपेचे अंकित । बोलिलें हें मी उचित ॥५॥
जनी म्हणे मापक अंबा । विचरे चराचर हो अंबा ॥६॥

१३.
रामनामावीण अहो तें शरीर । त्याचें जळो थोरपण येथें ॥१॥
जळो त्याचें ध्यान जळो तें बोलणें । पहिल्या वदन स्थान कीजे ॥२॥
नामयाची जनी म्हणे या पुरुषाची । प्रसवली कैसी नेणो त्यातें ॥३॥

( समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे )
बाड क्रमांक ४८९
१४. जोडते लेकरू माता अंगीकारी । मृढ ते अकेरी काय, देवा ॥१॥
नीच पदी दासी संतांच्या घरीची । महिमा सेवेची लाधलीये ॥२॥
थोराचा सेवक गांजिल्या निर्वाणीं । नांवासाठी धनी धांवा घाली ॥३॥
वेद वाखाणिले स्वामीचे पवाडे । अनाथ बापुडे तारियेले ॥४॥
जनी म्हणे आतां न विचारी उणे । लोह परिसानें शुद्ध केला ॥५॥

बाड क्रमांक १६३
१५. दामाजीचा पाडेवार । जाला विठोबा महार ॥१॥
चोखा मेळ्याचिये संगें । मेलें ढोर ओढी अंगे ॥२॥
सेना न्हाव्या उशीर झाला । न्हाईपन अंगी ज्याला ॥३॥
दळी कांडी वाहे पाणी । बोले नामयांची जनी ॥४॥

बाड क्रमांक ८४६
१६.
नरहरी हिरण्यकश्यपास । तोचि श्रीराम रावणास ॥१॥
द्वापारीं कृष्ण माग दास । विठ्ठल कलियुगीं भक्तांसी ॥२॥
तोचि प्रल्हाद दुजा अंगद । तोचि उद्धव भक्त प्रसिद्ध ॥३॥
तोचि हा नामा भाग्य अगाध । विठ्ठल विहार जयासी ॥४॥
पदिमिनी दासी दे त्या घरी । तेचि मंथरा कैकैचे घरीं ॥५॥
तेचि कुब्जा कंस अनुचरी । प्रस्तुत नामा घरीं जनी नामें ॥६॥
एवं जन्मांतर पुरातन । विठ्ठला सांगे स्वमुखें करून ॥७॥
सत्य ज्ञानेश्वरा, तुझी आण । म्हणोनि जनी वाहातसे ॥८॥

बाड क्रमांक १२०९
१७.
पदक काय गेलें निशाणाचें । परी हीनत्व प्रभूचें ॥१॥
तया रणा येणें लागे । काय सर, वो, माझे ॥२॥
करी आलीस तत्त्वतां । कोण मानी त्याची सत्ता ॥३॥
जनी म्हणे, हृषीकेशी । तैसा, देवा, तूं नव्हेसी ॥४॥

बाड क्रमांक ७५६
१८.
पंढरपूर । जग मुक्तीचें माहेर ॥धृ०॥
आषाढी मासीं एकादशी । यात्रा दाटे चारी दिवसीं । शंकर डोलतसे कैलासी । गिरिजावर ॥१॥
भीमा, चंद्रभागा दोन्ही । वाहाती आनंदें करूनी । यात्रा उतरतसे मधुनी । जळ सुंदर ॥२॥
संत सनकादिक येती । टाळ मृदुंग वाजती । घोष अमरपुरीं उमटतीं । बहू गजर ॥३॥
वंदून वेणुनाद भावें । स्नान पद्माळा करावे । दर्शन विठोबाचें घ्यावें । उभा विटेवर ॥४॥
एक वेळ संसार येउनी । पांडुरंग पहावा नयनी । जनी ध्यातसे निशिदिनीं । सारंगधर ॥५॥
जग मुक्तीचें माहेर । पंढरपूर ॥६॥

बाड क्रमांक १२०९
१९.
प्रहर एक रात्र उरलियावरी । येउनिया शेजारीं बैसला जे ॥१॥
उठी, वो जनाई घाली वो, दळण । आवडीचें गाणें गाऊं दोघे ॥२॥
उठविला मानेखालीं घालुनी हात । अंगें नेसवीत लुगड्यासी ॥३॥
दळणाची पाटी अंगें उचलोने । शेजारी बैसोनि दळूं लागे ॥४॥
सुखरूप असावी माझी जनी दासी । अंगें मी सेवेसी करीन तिच्या ॥५॥
माझे सर्व काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥६॥

बाड क्रमांक २९५
२०.
प्रेम क्षमा जया । घडे दंडवत पायां ॥१॥
त्यासी देहभक्ती नुरे । स्वात्ममुख डोईवरी ॥२॥
त्या मग समूळ जाला नाहीं । दंडवत जाला पां पायीं ॥३॥
देहावीत अगुणासी । म्हणे नव्हे जनी दासी ॥४॥

बाड क्रमांक ४८९
२१.
लोह जालं सोनें । परिसाचेनि संगें । तैसा पांडुरंग । जाला मज ॥१॥
युगानयुग मी । तुझी केली सेवा । मोकलीसी, देवा । धन्य तुझी ॥२॥
केली जीवासाठीं । ठाऊक तुम्हांला । जाणोनि, विठ्ठला । नेणसी तूं ॥३॥
जनी म्हणे जोडी । जन्मोजन्मीं माझी । भीड तुझी, देवा । राखियेली ॥४॥

बाड क्रमांक ४६४
२२.
संत आले दारवंटा । आपण वाजवतो घंटा ॥१॥
यापासी देव नाहीं । ऐसें जाण लवलाही ॥२॥
करी दंभाची जो पूजा । नाहीं संताहुनी दुजा ॥३॥
न करी संतासी नमन । देवा नाहीं समाधान ॥४॥
अहंकाराची हे करणी । व्यर्थ जाले म्हणे जनी ॥५॥

२३.
ज्ञानदेव म्हणे नामदेवाप्रती । ऐकावी विनंती एक माझी ॥१॥
पृथ्वीचें हें तीर्थ करावें अंतरीं । पहावे महंत साधुसंत ॥२॥
जीवन्मुक्त तुज नाहीं कांहीं काज । इच्छा आहे मजसाठीं यावें ॥३॥
नामदेव म्हणे पुसावें विठ्ठला । आज्ञा देतां मला मीही येतों ॥४॥
जनी म्हणे ऐसे बोलोनिया नामा । गेले निजधामा राउळासी ॥५॥

( तंजावर महाराज सरफोजी राजे भोसले सरस्वती महाल ग्रंथालय )
२४.
अहो, यशोदेचे घरीं । लीला दाखवी मुरारी ॥१॥
चरणीं नूपुर फणसी वाळे । यशोदेचे घरीं खेळे ॥२॥
सरी वाकी मोहनमाळा । देव देखीला हो डोळा ॥३॥
वाकडा कोडा जडित तोडे । कैसें येउनिया रडे ॥४॥
हातीं घेउनिया नवनीत । तो हा यशोदेचा सुत ॥५॥
दृष्ट लागेल गोविंदाला । जनी म्हणे माझ्या बाळा ॥६॥

२५.
आनंदाचा निधी दाखविला मज । तेणें चतुर्भुज मन माझें ॥१॥
नामयाचे घरीं जन्म जाला । जन्मांतरींचा ठेवा विठो देखिला ॥२॥
संत सनकादिक ज्या सुखें धाले । तें सुख माझ्या हृदयीं राहिले ॥३॥
सार्‍या चराचरा कळलें नाहीं । तें माझ्या हृदयी बिंबलेसें ॥४॥
नामयाचे जनीस जाहलें सुख । देखतां पैं मुख विठोबाचें ॥५॥

२६.
उभा माझा हरी देखियला डोळां । सुकुमार सांवळा भेटियेला ॥१॥
सुखाचें अंतर रंगलें हें चित्तं । सदा हरि पाहात नारायण ॥२॥
कृपादृष्टी केली चारी भुजा माते । शंखचक्र हात दोन्ही माझे ॥३॥
मागें पुढें उभा मीचि नारायण । हातीं सुदर्शन पाहियेला ॥४॥
जनीचिये भेटीमाजीं निरंतर । सदा कृपादृष्टी भक्तांवरी ॥५॥

२७.
ऐक, देवराया, किती विनवूं मी । करुणेचा देवो उडी घाली ॥१॥
भिल्लेणीची बोरें उच्चिष्ट भक्षिली । कृपादृष्टी केली तीजवरी ॥२॥
ऐकोनिया तूं, बा, घातियेली घडी । गजेन्द्र तांतडी सोडविला ॥३॥
रुक्मांगद राजा करी एकादशी । नगरी वैकुंठासी नेली देवें ॥४॥
जनी तुज काय केला, रे, अन्याय । पांडुंरंगा, पाय दावी मातें ॥५॥

२८.
ऐक, बापा हृषीकेशी, मज ठेवी पायांपाशीं ॥१॥
तुझें रूप पाहिन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥
हातीं धरील याची लाज । माझें सर्व करी काज ॥३॥
जनी म्हणे, देवराया । मज कोणी नाहीं, रे सखया ॥४॥

२९.
कोठें गेला होता । उशीर कां जाला । आतां तरी आला । वेळ जाली ॥१॥
कोमेजलें कां मुख । काय चिंता मनीं । सांगा, चक्रपाणी, । मज आतां ॥२॥
कस्तूरीचा टिळा । कशानें पुसला । चंदन कां गेलें । होती उटी ॥३॥
वजयंती माळ । कशानें तुटली । पदक कां भिजलें । घाम आला ॥४॥
जनीसाठीं । घातियेली उडी । येतांना तांतडी । श्रम झाला ॥५॥

३०.
कौसल्या नवस । करिताहे माता । राम, आतां माझ्या । पोटा यावें ॥१॥
नवस पुरवी । शेषशायी देवा, । वैकुंठीचा द्यावा । पुत्र मज ॥२॥
रामचंद्र ऐसा । पुत्र जाल्यावरी । चढे नभीं गिरी । वैकुंठाची ॥३॥
पुरवी मनोरथ । येऊनी देवळा । राहीन मी गळा । आण तुझी ॥४॥
जनी म्हणे आतां । निवतील डोळे । वैकुंठीचा खेळे । राम माझा ॥५॥

३१.
चैतन्याचे डोळे । उघडले आजी । ब्रह्ममयें पीडले जी । एकरूप ॥१॥
हेलावला पर । झाले नामारंभ । जीवें तो पतंग । ज्योती जाली ॥२॥
खुंटली हे मती । ठक पडे मना । नारायण जाणा । उभा राहे ॥३॥
वीराले मी जाला । पडीले मोहना । पांडुरंग झाला । मीचि आतां ॥४॥
जनी अणुहुनी । मौनाचे मस्तकीं । भरे तिहीं लोकी । नारायणा ॥५॥

३२.
ज्योती भरली की जी । आतां नाहीं दुजा भाव ॥१॥
मन ठकासी ठकिलें । कष्ण अक्षरानें लिहिलें ॥२॥
झाला सर्वांगाचा डोळा । हरी नामाची ही लीला ॥३॥
मज एकांतासी नेलें । पुन्हां नाहीं वो, आणिलें ॥४॥
जनी नामयाची दासी । पांडुरंग भीवरेसी ॥५॥

३३.
तानें वत्स जेवी गाउली लागुनी । तैसे माझे मनीं पंढरीनाथ ॥१॥
धन्य माझा जन्म केलें, रे बा, । येणें विटेवरी जेणें वस्ती केली ॥२॥
नामयाचे जनीसी भक्तीचेच वेड । साधलें निधान विटेवरी ॥३॥

३४.
परा मावळली वृत्ती चाळवली । विश्रांतीसी आली माय सखी ॥१॥
मी तो कांहीं नेणे दारवंट्यालागुनी । पाहतांना जगीं मी हारपले ॥२॥
मजला कळेना घातलें अंजन ।  नेलें की निधान ब्रह्मरंध्रीं ॥३॥
अणूहुनी लहान पोकळीचा देठ । तयामाजीं भेटे जीवलग ॥४॥
जनी गेली तेथे उघडली वेळा । कोटी सूर्यकळा जन्मा आली ॥५॥

३५.
परेचें अंतर जाणल्याची खूण । सदा ब्रह्म जाण नारायण ॥१॥
तयापलीकडे शून्याचें देऊळ । पुसूनिया स्थळ दावी आतां ॥२॥
तयापलीकडे नाग, कूर्म दोन्ही । ब्रह्म रुद्रमणी भेदूनिया ॥३॥
तयापलीकडे मौनाचें शिखर । मस्तकीं हा थोर मेरूमणी ॥४॥
जनी गेली तेथें फिरली माघारी । सत्य म्हणे हरी मीचि आतां ॥५॥

३६.
पंढरपुराची होईन मी दासी । लागली आसोसी विठोपायीं ॥१॥
पंढरपुराची होईन मी भोई । विठ्ठल रखुमाई चालतील ॥२॥
पंढरपुराची होईन मी वाळू । खेळती गोपाळू मायबाप ॥३॥
पंढरपुराची होईन मी शेणी । घालोनी अंगणीं विठोबाच्या ॥४॥
पंढरपुराची होईन मी पायरी । येता जातां हरी चरणे लागे ॥५॥
पंढरपुराची होईन मी वाट । येतील अचाट संतजन ॥६॥
संतजन येती विठ्ठल भेटीसी । नामांकित दासी शरणागत ॥७॥

३७.
प्रातःकाळी उठोनि पाहे । वाकळात निजला आहे ॥१॥
काय वाकळाची गोडी । निद्रा लागली, बा, वेडी ॥२॥
उगवला दिनकर । घरी लपलाहे चोर ॥३॥
मुख उघडूनि पाहे । शंख, चंक्र दिसताहे ॥४॥
वेड लागलें मुकुंदा । दासी जनी सोडी धंदा ॥५॥

३८.
फिरली माघारी वृत्ती पाहूं गेली । नारायण झाली येकायेकी ॥१॥
आतां बोलवेना दाटला हे कंठीं । त्याची पडे मिठी प्रेमलोटे ॥२॥
जैसें लवण हें सिंधूसी मिळालें । तैसें मज केलें येकोयेकीं ॥३॥
तेणें चैतन्याचा उघडला डाळा । वैकुंठी सावळा नारायण ॥४॥
नामयाची जने मुकुट देवाचे । पांडुरंगजीचें नांव साजे ॥५॥

३९.
भक्ती मुक्तीचा कौल दिधला । जन्म - मरणाचा धाक तुटला ॥१॥
विठ्ठल नामाचे मांडुनिया केणें । न संग ने घे त्यासि अपार उणें ॥२॥
रामनामाची मुद्रा दिधली । भक्तिभावे कैसी शाश्वत केली ॥३॥
नामयाची जनी पेचेसी आली । केणे भरीती जाली विटेवरी ॥४॥

४०.
माझें मन विठोबाचे पायीं रंगलें । परतोनि पाहतां मीपण गेलें ॥१॥
नामदेव वस्तू दाखविली कैसी । माया प्रपंचासी विसरले ॥२॥
नामदेवें भक्ती शाश्वत केली । विठोबाची मूर्ती हृदयीं राहिली ॥३॥
नामाचे जनीस भक्तीचें वेड । संसाराचें कोडें सोडविलें ॥४॥

४१.
सावळा गोविंद सावळें हें लेणें । सावळ्यानें मन वेडें केलें ॥१॥
सावळ्याच्या कानीं सावळी कुंडलें । सावळी पाउलें आलिंगिलीं ॥२॥
सावळी कस्तूरी सावळी हे शोभा । सावळा का उभा पाहियेला ॥३॥
सावळा तो वेळू सावळी ते गाय । सावळी रखुमाई पाहियेली ॥४॥
जनी म्हणे आतां सावळा भेटून । जावें लिंबलोण केलें आजी ॥५॥
मज सावळ्यानें घातियेली मिठी । आता माझ्या पोटीं, नारायणा ॥६॥
देह माझा देव सावळा गोविंद । उभा, रे गोविंद नारायणा ॥७॥
अंगावरी लोट पूर दाट आला । संत हे लावला नारायण ॥८॥
चैतन्य चेतलें भक्ती मुक्तवली । मुलीची माउली नारायण ॥९॥
जनी नामयाची मूर्ती गोविंदाची । उभी आनंदाची पंढरीत ॥१०॥

४२.
हाचि नेम माझा न फिरे माघारी । राहिले शेजारीं गोविंदांच्या ॥१॥
धन्य माझा जन्म केलें, रे बा, येणें विटेवरी जेणें वस्ती केली ॥२॥
नामयाची जनी भक्तीचें अंजन । लाधलें निधान विटेवरी ॥३॥

( ‘ हिंदी को मराठी संतों की देन ’ ( १९५७ ) मधील अभंग
४३.
धन्य सर्व काळ धन्य तो सुदिन । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥१॥
बारा शतें अठरा दुर्मुख संवत्सर । तिथी गुरुवासर त्रयोदशी ॥२॥
ऋतु कृष्णपक्ष कार्तिक मास । बसे समाधीस ज्ञानराव ॥३॥
नामयाची जनी लागतसे चरणीं । ज्ञानेश्वरी ध्यानीं जपतसे ॥४॥

संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता समाप्त

N/A

References :
( भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय, औंध, जि. सातारा )

Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP